Rural story : शहरात कूस बदलत तळमळत राहणारा मास्तर

मास्तर आता कायमचे शहराकडे आलेत. पण सारी हयात वाड्या वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या मास्तरांचा जीव काही इकडे रमत नाही.
Rural story OF teacher
Rural story OF teacher Agrowon

लेखक - ज्ञानदेव पोळ
-----------

मास्तर आता कायमचे शहराकडे आलेत. पण सारी हयात वाड्या वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या मास्तरांचा जीव काही इकडे रमत नाही. वयाने आता थकलेत. "पण माज्या माघारी हातानं करून खाऊ नका! तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय! आपल्या पोरांच्याकडं जाऊन रहावा!" असं अखेरचा श्वास घेताना मास्तरीनबाईनी सांगिल्यामुळे मास्तर शहरवाशी झालेत.

मास्तरांची दोन्ही मुलं जवळ जवळच राहतात. थोरला ईस्टला तर धाकटा वेस्टला. पण रेल्वेलाईनवरचा तो लोखंडी ब्रिज ओलांडताना काळानुसार मास्तरांचे गुडघे आता भरून येतात. चढताना त्यांना धाप लागते. भर गर्दीत एखाद्या पायरीवर बसून राहतात. शहरात आल्यावर मास्तर धाकट्याकडे होते. नंतर नंतर त्या किचन मधली भांडी वाजल्यावर मास्तर आता सकाळचे थोरल्याकडे जेवतात.

संध्याकाळी धाकट्याकडे. थोरला मुलगा मास्तरांशी जास्त बोलत नाही. पण त्याची बायको मास्तरांशी चांगलं वागते. धाकटा पोरगा चांगला आहे पण बायको नाही. तिला आल्या गेलेली घरी नको असतात. सतत धुसपुस करीत राहते. पण मास्तरांचा लेका सुनापेक्षा नातवंडातच जीव रमतो. आता तीच त्यांच्या जगण्याची आधार केंद्रे बनलीत...

पहाटे कंपन्यांचे भोंगे वाजले की मास्तराना जाग येते. ते वाट पहात राहतात. नळाला पाणी टिपकण्याची. नातवंडे शाळेसाठी उठायच्या आत मास्तर नळाखाली देहाला नेऊन अंघोळ घालून घेतात. एखांद्या क्षणी जुन्या काळातली मास्तरीनबाई येऊन त्यांची पाठ घासतेय असा भास त्यांना होतो. कपडे बदलून मास्तर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे पहात खुर्चीत बसून वाट पहात राहतात. लेकाने गॅसवर ठेवलेल्या कपभर चहाची. कधीकाळी मास्तरीनबाईनी सोफ्यातल्या चुलीवर उकळायला ठेवलेला गवती चहा त्यांच्या डोळ्यासमोर येतो. गरम पाणी घशात ओतून मास्तर दारवाजामागच्या चपला घालतात. जायला निघतात. "दुपारी तिकडेच जेवणार ना?" पाठीमागून डोळे चोळत उठलेल्या सुनेचा आवाज कानात घालून एक एक पायरी मास्तर उतरू लागतात. एखांद्या पायरीवर मास्तर क्षणभर थांबतात. "असल्या पायऱ्यावरून पाय घसरतात हळू उतरत जावा!" असं याच पायऱ्यावर कधीतरी मागून आलेला मास्तरीनबाईचा आवाज पुन्हा आल्याचा त्यांना भास होतो. पण क्षणभरच.

Rural story OF teacher
Education Scholarship : शेतकऱ्याच्या मुलाला मिळाली १ कोटीची शिष्यवृत्ती

ते उतरत खाली येतात. पार्किंगमध्ये शाळकरी मुलांच्या नव्या जमान्याच्या सायकली दिसतात. मास्तरांची पावले तिथेच अडकतात. भल्या पहाटे उठून पंधरा किलोमीटर सायकल चालवून सकाळी प्रार्थनेच्या अगोदर गाठलेली माळवाडीची शाळा समोर उभी राहते. वस्तीवरच्या गरीब दामू सुताराचं पोरगं दहावीला पहिलं आल्यावर स्वताच्या पैशाने त्याला तालुक्याच्या कॉलेजात जाण्यासाठी घेतलेली बावीस इंची आटलास सायकल त्यांना आठवते.


भल्या सकाळी रस्त्याला एक वृद्ध जोडपे सुवासिक फुलांचा गजरा खरेदी करताना त्यांना दिसतं. मास्तर क्षणभर थांबतात. त्यांच्याकडे पहात दूर कुठेतरी पोहचतात. दुसऱ्याच क्षणी फुलेवाल्याकडून नुसतीच ओंजळभर फुले विकत घेतात. डोळे मिठुन वास घेतात. तालुक्याच्या शिबिराला चार दिवस गेल्यावर कधी नव्हे ते एका सकाळी मास्तरीनबाईंनी गजरा घ्याला लावल्याचे त्यांना आठवतं. हरवून जातात. चालत चालत ते एका इंग्लिश स्कुलजवळ येऊन थांबतात. पिवळ्या धमक बसमधून येणाऱ्या आपल्या नातवंडाची वाट पहात. सारं आयुष्य मास्तरकीत घालवलेल्या मास्तरांना या कॉन्व्हेंट शाळांचे गणित काही कळत नाही.

एवढे पैसे घेऊन नेमकं पोरांना काय शिकवत असतील या विचारात ते गेटवर उभे राहून आतल्या हालचाली पहात राहतात. सुटा बुटातले शहरातले नवीन मास्तर आणि मास्तरनी. टाय घातलेली आणि लहानपणीच डोळ्यापुढे चष्मा लावलेली लालभडक पोरं. "बाय बेटा बाय!" म्हणत पापे घेऊन त्यांना गाड्यामधून सोडणाऱ्या मॉडर्न मम्मा. इतक्यात एका बसच्या बाजूने आलेल्या "बाबाsss" या आवाजाने त्यांची तंद्री भंग पावते. क्षणभर नातवंडात मिसळल्यावर रस्त्यात घेतलेल्या लेमनच्या गोळ्या घरी न सांगण्याच्या बोलीवर मास्तर हळूच त्यांच्या चिमुकल्या हातावर सोडून देतात. आणि पहात राहतात.

गेटमधून "बाबा बाय बायsss" म्हणत आत निघालेले चिमुकले हात. आपल्या दोन्ही पोरांना असेच पांढरे शर्ट आणि खाक्या चड्ड्या स्वतः रात्रभर घरातल्या शिलाई मशीनवर शिवत बसलेली मास्तरीनबाई त्यांच्या नजरेपुढे येऊन फिरू लागते. प्राथनेच्या वेळी स्पिकरवर लावलेली इंग्लिश प्रार्थना मास्तर ऐकत राहतात. कान एकवटून. पण वाड्या वस्त्यावरच्या शाळात आपण शिकवलेली प्रार्थना काळाच्या पडद्याआड गेल्याचं दुःख पचवणं मास्तरांना जड जातं. मास्तर माघारी वळतात. पण कानात पुन्हा तेच जुन्या शिकवल्या गेलेल्या कवितांचे आवाज. "नव्या मुनीतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे..."

मास्तर थोरल्या लेकाकडे पोहचतात. सुनेची धुणी झालेली असतात. कुकरवर शिट्याचा मारा सुरु असतो. टी. व्ही.वर सासू सुनांचा धिंगाणा. आता मास्तरांचा घामाने भिजलेला देह काहीसा भिंतीला विसावतो. थोरली सून तिकडच्या घरातला अंदाज काढण्यासाठी विचारत राहते, "जेवायला वाढती का हो ती पोटभर! तिला अजून वाढू का म्हणून विचारायची सवय नाही!" उभ्या आयुष्यात कोणत्याच माणसाला नावे ठेवण्याची सवय नसलेले मास्तर फक्त हो ला हो देत राहतात. दुपारी तेथेच विश्रांती घेतात. आणि पुन्हा चालू लागतात. ईस्टवरून वेस्टच्या प्रवासाला. रात्री पुन्हा मास्तरीनबाईंच्या आठवणी मास्तरांना छळू लागतात. पुन्हा आपल्या गावकडच्या घरात जाऊन राहता येईल का? मास्तरीनबाईंच्या एकुलत्या एका भिंतीवरच्या फोटोवरील फुलांचा हार आता वाळून गेला असेल का? आपल्याच सारखा. या विचाराने आणि मास्तरीनबाईंच्या जीवघेण्या आठवणीने मास्तरांचा उरलेला सांगाडा रात्रीच्या अंधारात काळासोबत शहरात कूस बदलत तळमळत राहतो...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com