छोट्या बदलातून यशाचा नवा मार्ग

त्रिपुराचा कृषी विभाग शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटाविषयी जागृत करत आहे. बदललेल्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये स्थलांतरापेक्षाही सामोरे कशा प्रकारे जायचे, यासाठी सकारात्मक प्रयोग केले जात आहेत. छोट्या छोट्या यशकथा या वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये आपणास दीपस्तंभासारखा मार्ग दाखवतात.
छोट्या बदलातून यशाचा नवा मार्ग
Climate ChangeAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

आपल्या शेजारचा देश बांगलादेश वातावरण बदलाच्या (Climate Change) प्रभावाखाली आलेल्या बंगालचा उपसागर आणि पुराचा थैमान घालणाऱ्या आठ नद्यांची भीषणता अनुभवत आहे. येथील बिकट अवस्थेचा परिणाम भारताच्या आपल्या देशाच्या त्रिपुरा या राज्यावरही होतो. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम त्रिपुरावरही होतो. तशा स्थितीतही या राज्यांमधील शेतकरी शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात.

राज्याचा कृषी विभाग शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटाविषयी जागृत करत आहे. सोबतच बदललेल्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये स्थलांतरापेक्षाही सामोरे कशा प्रकारे जायचे, यासाठी सकारात्मक प्रयोग केले जात आहेत. त्यातून छोट्या छोट्या वाटणाऱ्या यशकथा वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये आपणास दीपस्तंभासारखा मार्ग दाखवतात.

त्रिपुरामधील शेतकऱ्यांसाठी कृषी शास्त्रज्ञांनी केळीची (Banana) चंपा ही नवीन जात विकसित केली. लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून मनरेगा अंतर्गत मदतही केली गेली. शेतकऱ्यांना फळबागेतून चांगले उत्पादन मिळू लागले. पारंपरिक पिके, त्यावरील नैसर्गिक आपत्तीचे आक्रमण यामुळे कमी उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. स्वतःची शेती असूनही शासकीय सार्वजनिक धान्यपुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये बैचेनी होती.

जे शेतकरी या नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी पुढे आले, ते यशस्वी झाले. त्यातील पंचानन डेबारम्मा यांनी मनरेगा योजना व कृषी विभागाच्या मदतीने अर्धा हेक्टरवर केळी बाग लावली. आज त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. कृषी विभागाच्या मदतीने अनेक गावात केळीच्या अशा यशकथा तयार झाल्या. काही शेतकऱ्यांनी केळी उत्पादनाबरोबरच केळी रोपवाटिकाही केल्या.काही शेतकऱ्यांनी मनरेगाच्या मदतीने संत्र्याच्या बागा उभारल्या.

पानमळा पक्का झाला...

तपन घोष हे पूर्वी विड्याच्या पानांचे उत्पादन घेत. वारंवार येणाऱ्या चक्रीवादळात त्यांचे पीक उद्ध्वस्त होई. मात्र कृषी उत्पादन विभागाने या पिकासाठी नावीन्यपूर्ण पद्धत शिकवली. शेती सोडण्याच्या विचारापर्यंत आलेले तपन आज दर आठवड्याला दहा हजारापर्यंत पानांचे उत्पादन घेतात. आणि पाच हजार रुपये नफा कमावतो. पारंपरिक शेतीही सुरूच असली तरी यामुळे अर्थाजनात भर पडली आहे. आपण शेतकऱ्यांनी छोटे छोटे बदल जरी स्वीकारले तरी मोठ्या यशकथा निर्माण होऊ शकतात, हेच यातून दिसते.

अशीच गोष्ट आहे, ती दिगेंद्र देबनाथ यांची. पाच वर्षे वयाचा पानमळा सोडण्याचा त्यांचा विचार पक्का झाला होता. नवीन काय करावे, यासाठी कृषी विभागाला भेट दिली, तर त्यांनी त्यातच काही बदल आणि नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुचवले. त्यांचा मळा दिमाखाने उभा राहिला. एखादा शेतकरी शेत पद्धतीत, पीक बदलाचा विचार करत असेल, तर त्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. काही वेळा नवीन पिकाकडे वळण्यापेक्षा आहे त्यामध्ये थोडे बदलही त्याची शेती फायद्यात आणू शकतात. विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचले तरच ते शक्य आहे.

ॲन्थुरीयम, जरबेराकडे वळले शेतकरी

त्रिपुरामध्ये अननसाची शेतीही मोठ्या प्रमाणात होते. पश्‍चिम त्रिपुरातील पुलाशीकार तालुक्यांमध्ये अननस शेतीमध्ये सातत्याने नुकसान होऊ लागल्यामुळे हे शेतकरीही पीक पद्धतीमध्ये बदल करावयाचे ठरवत होते. या वेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतास भेटी देत योग्य ते मार्गदर्शन केले. अननस पीकही यशकथेच्या यादीत समाविष्ट झाले. अर्थात, यात मनरेगाचा मोठा वाटा आहे. याच तालुक्यात शेतकऱ्यांनी अँन्थुरियम शेती यशस्वी केली.

पूर्वी पहाटे आदिवासी लोक ही फुले घनदाट जंगलातून गोळा करून शहरामध्ये विकत. मात्र वृक्षतोड, वाढत्या तापमानामुळे या फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला. परदेशाप्रमाणेच हरितगृहामध्ये अँन्थुरियम आणि जरबेराची शेती होऊ लागली. तात्पर्य एवढेच की मूळ शेतीला शाश्‍वत उत्पन्नाची जोड द्यायलाच हवी.

Climate Change
ॲक्टिव्हेटेड कार्बनमुळे नारळ व उत्पादनाच्या निर्यातीत ४१ टक्क्यांची वाढ

शेततळी भरली...

दक्षिण त्रिपुरात मॉन्सूनच्या पावसावर शेती होते. नंतर रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी नेहमीच पाणी टंचाई भासते. राज्याच्या वातावरण बदल अहवालात या भागातील पाणी टंचाई आणि त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी शेततळ्यांची निर्मिती करावी. त्यातील संरक्षित पाण्याचा वापर रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी होऊ शकतो. शेततळ्यांच्या निर्मितीसाठी शासकीय योजना आणण्यात आली. सुरुवातीला अनुदानावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यात फायदा दिसल्यावर स्वखर्चाने शेततळी उभारली आहेत. भाजीपाला उत्पादनाबरोबरच या तळ्यामध्ये मत्स्य उत्पादन होत आहे.

ॲपल बेरमधून यश

वातावरण बदलाच्या प्रवाहात शेतकऱ्यांनी स्वतः बदलणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्रिपुरामधील विक्रमजीत चकमा या शेतकऱ्याकडे वाडवडिलांपासून बटाटे, मुळे असे उत्पादन होत असे. उत्पादन व उत्पन्न कमी असल्याने त्यांनी सुपारी आणि शेवगा लावला. मात्र फारसा फरक पडत नसल्याचे दिसल्याने बांगलादेशामध्ये प्रसिद्ध असलेल्या ॲपल बेरची १३०० झाडे लावली. एका झाडापासून २० किलो बोरे मिळतात. एका हंगामात ७० ते ८० किलो उत्पादन मिळते. या पिकाला सरासरी १०० रुपये असा दर मिळाला. थोडक्यात, या फळशेतीमधून त्यांना ५ ते ६ लाखांचे उत्पन्न मिळू लागले. या पिकांने त्यांचा चांगला हात दिला. ही यशोगाथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. त्यांच्या हस्ते विक्रमजित यांचा सत्कारही झाला.

शिकण्यासारखे काही...

वातावरण बदलाचा मार खाणाऱ्या त्रिपुराच्या शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग धावला. त्यांनी आहे त्या पिकांमध्ये सुधारित, आधुनिक तंत्र शिकवले. काही ठिकाणी पिकामध्ये बदल करायला लावले. नव्या प्रयोगांना प्रोत्साहन दिले. म्हणूनच येथे मोहरीची शेती फुललेली दिसतात. बटाटा शेतामध्येही आधुनिक पद्धती आल्या आहेत. आता येथील शेतकरी स्वतःहून कृषी अधिकाऱ्यांना गावात बोलवतात. नवीन योजना, नावीन्यपूर्ण प्रयोग समजावून घेतात. असे प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांना भेटी देतात. यशोगाथा प्रत्यक्ष पाहतात. आणि मगच स्वतःच्या शेतात प्रयोग करतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com