HIV: हॅपी इंडियन व्हिलेजः एचआयव्हीग्रस्त मुलांचं स्वावलंबी गाव

आपल्या आई-वडिलांकडून जन्मत:च एचआयव्ही घेऊन आलेली मुलं कोणती स्वप्नं बघणार? मृत्युच्या छायेत वावरणाऱ्यांनी आनंददायी जगण्याचं स्वप्न तरी कसं बघावं?..जगण्याचीच खात्री नव्हती तिथं स्वप्नं कशी बघणार? हे त्यांच्यासाठी अशक्य होतं.
HIV: हॅपी इंडियन व्हिलेजः एचआयव्हीग्रस्त मुलांचं स्वावलंबी गाव
Agrowon

लेखक - महारूद्र मंगनाळे

दु:ख तुम्हे क्या तोडेगा

तुम दु:ख को तोड दो

केवल अपनी आंखे

किसी के सपनों से जोड दो...

आपल्या आई-वडिलांकडून जन्मत:च एचआयव्ही घेऊन आलेली मुलं कोणती स्वप्नं बघणार? मृत्युच्या छायेत वावरणाऱ्यांनी  आनंददायी जगण्याचं  स्वप्न तरी कसं बघावं?..जगण्याचीच खात्री नव्हती तिथं स्वप्नं कशी बघणार? हे त्यांच्यासाठी अशक्य होतं. पण रवी बापटले या माझ्या तरूण  संवेदनशील, सेवाभावी वृत्तीच्या मित्राने, या मुलांना केवळ जगवलं, सांभाळलं नाही तर,सर्वसाधारण तरूणांप्रमाणे जगायला, स्वप्नं बघायला शिकवलं आणि त्यांच्या स्वप्नांशी स्वत:चं सगळं आयुष्य जोडून टाकलं.

रवी बापटले नावाच्या या ध्येयवादी तरूणाचा हा सगळा जीवनप्रवास माझ्या समोर घडलाय. बहुतेक बऱ्या,वाईट घटनांचा मी साक्षीदार आहे.कधी पत्रकार म्हणून, कधी मित्र म्हणून सगळं जवळून पाहिलयं.अनेकदा त्याच्या दु:ख,वेदनांच्या झळांचा अनुभव घेतलाय. आज भुतकाळात डोकावून, वर्तमानात परततो तेव्हा,मला हे सगळं स्वप्नवत वाटतं.

पत्रकारितेपासून सुरूवात

औरंगाबादला विद्यापीठात पत्रकारीतेची पदवी घेण्यापूर्वी मला भेटलेला रवी मला आजही लख्ख आठवतो. पदवी घेऊन लातूरात दै. संचारचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून रवी रूजू झाला. स्थानिक पत्रकारिता महाविद्यालयात त्याने प्राध्यापक म्हणूनही काम केले. त्याने समवयस्क मित्रमैत्रिणींना घेऊन आम्ही सेवक ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत लातूर शहरात त्याने स्वच्छता मोहीम राबवली. आणि अचानकपणे एचआयव्ही संक्रमित बालकाच्या मृत्युच्या अवहेलनेची घटना पाहून या विषयासाठी आयुष्य पणाला लावण्याचा निर्णय त्याने घेतला. लातूरपासून १२ किलोमिटर अंतरावरील हासेगावात शांतेश्वर मुक्ता या मित्राच्या आजोबांनी सहा एकर जमीन दान म्हणून दिली. तिथे बॅनरच्या कपड्याची राहुटी करून उजाड माळरानावर रवी एकटा राहू लागला. 

तो काळ रवीची कसोटी बघणारा होता. नोकरी करीत करीत रवीचं हे काम पुढं नेणं सुरू होतं. शाळा-शाळांमध्ये जाऊन रवीने मुलांकडून त्यांच्या खाऊचे पैसे मिळवले. या निमित्ताने एड्सबाबत मुलांमध्ये जाणीवजागृती केली. त्या काळात रवीचे खाण्याचे बेहाल होते. सकाळी बनवलेली भाकरी रात्री वाळून जायची. तीच भाकरी रात्री खाऊन रवी झोपायचा. ऊन, थंडी, पाऊस, वादळ, वाऱ्यात बॅनरची झोपडी हाच एकमेव निवारा होता. तिथं लाईटही नव्हती. सोबतीला केवळ एक कुत्रा होता. मोटारसायकलवर रात्री, बेरात्री रवीचं  लातूर-हसेगाव ये-जा करणं चालू होतं. पत्रकारितेची नोकरी हेच उपजीविकेचं साधन होतं. तेच पैसे खर्चून संपर्क सुरू होता.

गावकऱ्यांकडून विरोध

थोडेसे पैसे जमल्यानंतर हसेगावातील सहा एकरच्या या उजाड माळरानावर काशी जगद्गूरूंच्या हस्ते भूमिपूजन करून रवीने दोन खोल्यांचं बांधकाम सुरू केलं. पण गावातील हितशत्रुंना इथं एचआयव्ही संक्रमितांसाठी निवारा उभा राहू द्यायचा नव्हता. त्यांनी गावकऱ्यांमध्ये विविध अफवा पसरवल्या. याच्यामुळं गावातील सगळ्या मुलांना एचआयव्ही होईल, ही खोटी माहिती लोकांना खरी वाटली. खोलीचं बांधकाम छतापर्यंत आलं होतं. एका अंधाऱ्या रात्री जेसीबी मशीन घेऊन ४०-५० माणसं आली. रवीला मारहाण करून शिवीगाळ केली. गाव सोडून गेला नाहीस तर जीवे मारू अशी धमकी दिली. जेसीबी मशीनने बांधकाम जमिनदोस्त केलं. तिथलं सगळं सामान घेऊन ते पसार झाले. रवीच्या जागी दुसरा कोणीही असता तर, घाबरून तो निघून गेला असता. कुठल्याही माणसासाठी आपल्या जिवापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणतीच नाही. त्यावेळी मलाही वाटलं होतं की, रवीने हे काम थांबवून निघून जावं. मात्र रवीने या कामासाठी जीवाची बाजी लावायचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला.

या पाडापाडीनंतर रवीच्या दोन खोल्या तयार झाल्या. त्यावेळी त्या सहा एकरावर एक झुडूपही नव्हतं. रवीनं तरूणांचं उन्हाळी सेवाश्रम शिबीर घेऊन आंबा, नारळासह विविध प्रकारची झाडं लावली. हळूहळू सेवालय आकार घेऊ लागलं. काही दानशुर लोकांनी दोन-तीन छोट्या गवती छपराच्या कुट्या बांधून दिल्या. वृत्तपत्रांच्या माध्यमातून एचआयव्ही संक्रमित मुलांसाठी हसेगावात निवासी बालगृह सुरू झाल्याची माहिती परिसरात  कळली. गरजू संपर्क साधू लागले. बालकल्याण समितीच्या परवानगीने मुलं येऊ लागली. खर्च वाढला. रवीने पालकत्वाच्या माध्यमातून लोकांना या कामात सहभागी करून घेतलं. बघता-बघता १५-२० मुलं झाली. त्यांना सेवालयातच अक्षरओळख करून देण्यात आली. मात्र त्यांना रितसर शाळेत घालणं गरजेचं होतं. या मुलांना हसेगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यात आला. मुलांची नियमित शाळा सुरू झाली. 

सेवालयाचे नाव महाराष्ट्रभर गेले

सेवालयाचे हितशत्रु मात्र शांत नव्हते. त्यांनी इथेही खोडा घातला. सेवालयातील मुलांमुळे गावातील निरोगी मुलांना एचआयव्ही होईल, अशी अफवा त्यांनी पसरवली. घाबरलेल्या ग्रामस्थांनी, संक्रमित मुलांसोबत आमची मुलं शिकणार नाहीत, अशी भूमिका घेऊन मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं. मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. या मुलांसाठी वेगळी शाळा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने रवीसमोर ठेवला. हा प्रश्न एचआयव्ही संक्रमित बालकांच्या जन्मसिद्ध हक्काचा असल्याने रवीने तो नाकारला. माध्यमांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला. देशभरात या विषयावर उलटसुलट चर्चा झाली. बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या विषयावर चर्चा घडवून आणली. एचआयव्ही हा संसर्गजन्य रोग नसल्याने, या मुलांनाही इतर मुलांसोबतच शिकता येईल, असा अध्यादेश केंद्र सरकारने काढला. मात्र हा गुंता सुटण्यासाठी हे पुरेसं नव्हतं. रवीने हसेगाव ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेटून हा विषय समजावून सांगितला. सगळी जबाबदारी स्विकारली. शेवटी सेवालयातली आणि गावातली मुलं एकत्र शिकू लागली. रवीने ही मोठी तात्विक ,कायदेशीर लढाई जिंकली. हसेगावच्या सेवालयाचं नाव महाराष्ट्रभर पोचलं. मात्र  शारीरिक, मानसिक त्रासाच्या रूपाने रवीने याची किमत मोजली.

HIV: हॅपी इंडियन व्हिलेजः एचआयव्हीग्रस्त मुलांचं स्वावलंबी गाव
Rural Wedding : आवाज वाढीव डीजे....अर्थात गावाकडची लग्नं

दरम्यान इथं खासदार फंडातून सभागृह, काही खोल्या बांधण्यात आल्या. पाण्याची गरज भागविण्यासाठी श्रमदानातून एक  छोटं शेततळं उभारण्यात आलं. त्यावर सेवालयातील मुलं व झाडांची पाण्याची गरज भागू लागली. परिसरात हिरवाई वाढली.

हॅपी इंडियन व्हिलेजची सुरूवात

सुरुवातीला असं वाटायचं की, ही मुलं काही दिवसांचीच सोबती आहेत. त्या काळात दहा - बारा वर्षांत मुलं दगावायची. मात्र दिवसेंदिवस अधिक चांगली औषधं येत गेली. सेवालयात मुलांना  सकस आहार आणि आरोग्यदायी, कौटुंबिक वातावरण लाभल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारली. अनेक मुलं-मुली दहावीत गेली. दहावी पास झाली. त्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली. ती सज्ञान झाली. बालगृहात १८ वर्षे वयापर्यंतच्याच मुला-मुलींना ठेवता येतं. मग या सज्ञान झालेल्यांना पाठवायचं कुठं? समाजात त्यांच्यासाठी अशी कुठंच जागा नव्हती.

तुम्ही कुठंही जा, असं सांगणं धोकादायक होतं. शेवटी याचं करायचं काय? या प्रश्नाच्या चिंतनातून Happy indian village (HIV) ही कल्पना रवीला सुचली आणि या दुसऱ्या प्रकल्पाची सुरूवात झाली.

प्रश्न जागेचा आणि पैशाचाही होता. नवी जमीन विकत घेण्यासाठी लोकांना पैसे मागणं सोयीचं नव्हतं. दुसरा मार्ग शोधणं गरजेचं होतं. त्यातून सेवालय म्युझिक शोची कल्पना समोर आली. सेवालयातील ४० मुला-मुलींचा म्युझिक शो तयार झाला. पहिलाच शो २०१५ मध्ये पुण्याच्या बालगंधर्व सभागृहात सादर झाला. एचआयव्ही संक्रमित मुलांच्या नृत्याला, अभिनयाला, कलेला प्रेक्षकांनी उचलून धरलं. पैशाचा एक नवा स्त्रोत निर्माण झाला. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे मुलांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्यांचा सीडीफोर (पांढऱ्या पेशींची संख्या) वाढला. महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरू झाले. सेवालयापासून जवळच असलेल्या डोंगरावर अनेकांचे जमिनीचे छोटे तुकडे पडून होते. जमीन लागवडीयोग्य नव्हती. बहुतेकांना त्यांच्या जमिनीच्या चतु:सीमाही माहिती नव्हत्या. 

स्वावलंबी गाव

रवीने नव्या प्रकल्पासाठी जमीन मागितली तेव्हा ते शेतकरी तयार झाले. २०१५मध्ये पहिली ९ गुंठे जमीन संस्थेने घेतली. आज संस्थेकडं या माळरानावर सुमारे १४ एकर जमीन झाली आहे. हळूहळू इथंही झाडं लावण्यात आली. मुलांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या. बहुउद्देशीय सेवाभवन,  त्यातच स्वयंपाक घर, उभारण्यात आलं. बाहेरून काळी माती आणून दोन-तीन एकर जमीन तयार करण्यात आली. तिथं भाजीपाला उत्पादन सुरू झालं. टोमॅटो, कारले विक्रीतून काही उत्पन्नही मिळू लागलं. खाण्यासाठी मका, ज्वारी, भुईमूग, ऊस यांची लागवड आलटून-पालटून सुरूच आहे. व्हिलेजवर जनावरांसाठी गोठा आहे. दुधासाठी तीन म्हशी, पाच गायी आहेत. मुलांना दुध, दही खायला मिळतयं. या जनावरांचं शेण शेतीसाठी उपयुक्त ठरतंय. मुलांसाठी म्हणून दोन-तीनशे कोंबड्या पाळल्यात. त्याला लागूनच मुलांसाठी जीम उभारलीय. तिथं १५-२० मुलं नियमित  व्यायाम करतात.

सेवालयातील केसर आंबा विक्रीतून काही पैसे मिळू लागलेत. पर्यावरणपुरक गणपती निर्मिती, जुन्या साड्यांपासून पिशव्या, पायपुसण्या यातूनही काही खर्च भागू लागला. सेवालयात रोपवाटिकेत रोपं बनवणं सुरू आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारची फुलांची व शोभेची रोपं बनवली जात आहेत. परिसरात डाळिंब, पेरू, लिंबू ,सीताफळ यांची नव्याने लागवड केलीय.

जगातलं अशा पध्दतीचं असं हे पहिलंच गाव वसलंय. लाभार्थ्यांनी स्वत:च्या आर्थिक स्त्रोत आणि कष्टातून उभारलेलं. पहिल्या दिवसापासूनच हे गाव स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने प्रत्येक उपक्रम राबवला जातोय. तरीही नवे नवे प्रश्न समोर येतच आहेत. वय झालेल्या मुला-मुलींच्या लग्नाचा विषय पुढे आला. त्यांची लग्नं करणं गरजेचं होतं. बालपणापासून सेवालयात वाढलेल्या मुला-मुलींची आपापसात लग्न करायची नाहीत, हा धोरण म्हणून आम्ही निर्णय घेतलाय. एचआयव्ही संक्रमित इतर संस्थांतील विवाहोत्सुक मुला-मुलींची माहिती घेऊन, परस्पर संमतीने विवाह जुळवण्यात आले. आतापर्यंत या संस्थेमार्फत कालबाह्य रूढी-परंपरा टाळून, एचआयव्ही बाधित १६ जोडप्यांचे विवाह नोंदणी पध्दतीने झाले आहेत. ही लग्नं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं आदर्श उदाहरण आहे. एचआयव्ही संक्रमितांचे असे जाहीर विवाह, हेही एकमेव उदाहरण असावे. या जोडप्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. या जोडप्यांना जे मूल होतं ते निगेटिव्ह म्हणजे एचआयव्ही मुक्त असते. त्यासाठी गरोदर मातेला औषधं दिली जातात. रवी बापटले अशा आठ-नऊ एचआयव्ही मुक्त बालकांचे  आजोबा बनले आहेत. त्यांचाच असा एक मोठा परिवार बनलाय. यातील बरीचशी कुटुंबं व्हिलेजबाहेर स्वतंत्रपणे जगत आहेत. 

कोव्हिडचे आव्हान

कोव्हिडचा दहा महिन्यांचा कालावधी सगळ्यांचीच कठोर परीक्षा बघणारा होता. आधीच रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या या मुलांना कोव्हिडची लागण होऊ नये, याची पुरेपूर दक्षता संस्थेच्या वतीने घेण्यात आली. सेवालय व व्हिलेजवर बाहेरील लोकांना प्रवेश बंद करावा लागला. सेवालय म्युझिक शोचे नियोजित आठ-दहा कार्यक्रम रद्द झाले, पुढचे थांबले. आगंतुकांच्या व्हिलेज, सेवालयाच्या भेटी थांबल्या. एवढेच नाही तर नियमित दरमहा काही पैसे देणाऱ्या पालकांची संख्याही रोडावली. सगळे आर्थिक स्त्रोत कमी झाले. तरीही या संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांनी, या संकटाचं संधीत रूपांतर करून घेतलं. वीस-पंचवीस तरूण मुला-मुलींना सोबत घेऊन, व्हिलेजवर शेततळं, रस्ते व आवश्यक बांधकामं करून घेतली. ही कामं बघितली की माणूस थक्क होऊन जातो. मुलांसोबत शारीरिक कष्ट करून, त्याला प्रतिष्ठा दिली. मुलांमध्ये कष्टाचं मोल रूजवलं. यामुळे सगळ्या मुलांची प्रकृती खणखणीत राहिली. एकाही मुलाला दवाखान्यात न्यावं लागलं नाही.

कोव्हिडच्या सुरूवातीच्या काळात मास्कची मोठी मागणी होती. पुरवठा कमी होता. हॅपी  व्हिलेजवरील आठ-दहा मुली शिलाईचं उत्तम काम करतात. रवी बापटले यांनी या मुलींना तातडीने कापड उपलब्ध करून दिलं. रात्रंदिवस काम करून या मुलींनी सुती कपड्याचे हजारो मास्क तयार केले. सुमारे एक लाख रूपयांच्या मास्कची विक्री करण्यात आली. पोलिस, महसूल व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना, गरजुंना मोठ्या प्रमाणात मोफत मास्क वितरित करण्यात आले.

ही संस्था लोकांच्या देणग्यांवर, मदतीवर चालते. तरीही वेळोवेळी या संस्थेने समाजाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळात हसेगाव ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत होते, तेव्हा संस्थेने आपल्या टँकरमार्फत लोकांना मोफत पाणी पुरवठा केला. भाजीपाला भरपूर पिकला तेव्हा हसेगाव आणि लातूरमधील सेवालय मित्र, हितचिंतकांपर्यंत तो पोचवला. गरजुंना मोफत मास्क दिले. समाजाच्या संकटांत धावून जाण्याची आपली परंपरा त्यांनी कायम ठेवलीय.

HIV: हॅपी इंडियन व्हिलेजः एचआयव्हीग्रस्त मुलांचं स्वावलंबी गाव
Village Farmer : बैलाची रिकामी दावण पोळ्याला डचत राहते

आज सगळीकडं नैराश्याचं, नकारात्मक वातावरण आहे. अशा काळात रवी बापटले नावाचा एक उच्चशिक्षित तरूण आपलं सुखवस्तू आयुष्य नाकारून, एचआयव्ही संक्रमितांच्या पुनर्वसनासाठी स्वत:ला झोकून देतो... उजाड माळरानावर नंदनवन फुलवतो... ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे. आर्थिक अपयशापोटी उठसुठ आत्महत्येची भाषा करणाऱ्यांनी, जन्मजात मृत्युच्या छायेत वावरणारी मुलं किती आनंददायी जगतात, ते पाहायला हवं. विशिष्ट ध्येयानं प्रेरित झालेला एक तरूण किती सकारात्मक काम उभं करू शकतो, ते एकदा प्रत्यक्ष पाहायला हवं. म्हणजे आपण किती खोट्या दु:खांना कवटाळून बसलोय ते लक्षात येईल.

या  सेवाभावी प्रकल्पाबाबत अधिक जाणून घ्यायचं असेल, भेट द्यायची असेल तर, रवी बापटले (९५०३१७७७००) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com