
Amravati News : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची (Millet Year) थीम घेऊन यंदाचा जिल्हास्तरीय कृषिमहोत्सव एक ते पाच मार्चदरम्यान सायन्सकोर मैदानावर होणार आहे. कृषी व विविध विभाग, महामंडळे आणि संस्थांकडून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबतची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agricultural Officer) अनिल खर्चान यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, उमेदचे जिल्हा समन्वयक सचिन देशमुख यांच्यासह कृषी व इतर अनेक विभागांचे अधिकारी, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सलग पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा प्रारंभ एक मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महोत्सवात तृणधान्याचे, विशेषत: भरडधान्यांचे महत्त्व सांगणाऱ्या बाबींवर भर देण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी सांगितले.
महोत्सवात विविध विभाग, महामंडळे, कृषी विज्ञान केंद्रे, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता समूह आदींसाठी सुमारे २०० कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारी ४० दालने उपलब्ध असतील.
कृषी सिंचन व तंत्रज्ञानाबाबत अनेक दालने
कृषी सिंचन व तंत्रज्ञान, याविषयावरील ३० दालनांसह कृषी निविष्ठांची ३० दालने असतील. धान्य महोत्सवासाठी २०, गृहोपयोगी वस्तूंची ४० व खाद्यपदार्थांची ४० दालने उपलब्ध असतील.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांच्या उपस्थितीत रोज कार्यशाळा, चर्चासत्रे घेण्यात येतील. त्यात भरडधान्य, प्राकृतिक शेती, गटशेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुसंवर्धन, रेशीम, मत्स्यशेती आदी विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.