बांगलादेशासमोर संकटांची मालिकाच...

द क्षिण आशियातील बांगलादेश हा सर्वांत जास्त लोकसंख्या घनतेचा देश आहे. येथे सुमारे १७ कोटी लोकसंख्या एक लाख ४७,५७० चौ. कि.मी. क्षेत्रावर राहते.
Dr. Nagesh Tekale
Dr. Nagesh TekaleAgrowon

द क्षिण आशियातील बांगलादेश हा सर्वांत जास्त लोकसंख्या घनतेचा देश आहे. येथे सुमारे १७ कोटी लोकसंख्या एक लाख ४७,५७० चौ. कि.मी. क्षेत्रावर राहते. त्यातील तब्बल ५ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. लोकसंख्येच्या या फुगवट्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या कारणाकरिता निसर्ग संपत्तीवर प्रचंड ताण येतो. सूर्याची किरणे पृष्ठभागावर शोषण्यापेक्षा ती जास्त परावर्तित होतात. ही परावर्तित किरणे वातावरणातील मिथेन आणि कर्ब वायू शोषतात.

वास्तविक प्रकाश संश्‍लेषणामध्ये मदत करणारा कर्ब वायू अन्ननिर्मितीमध्ये आणि उबदारपणासाठी मदत करत असल्यामुळे आपला मित्र असला तरी आता शत्रू स्थानावर गेला आहे. कारण त्याच्यामुळे सर्वांत जास्त उष्णतेस कारणीभूत ठरत आहे. या वायूचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी जीवाश्म इंधनाचा नियंत्रित वापर आणि आहे ती घनदाट जंगले जपण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. कारण नवी लागवड वाढून त्यापासून सुरक्षिततेचे कवच तयार होण्यास वेळ लागू शकतो.

Dr. Nagesh Tekale
Crop cultivation : नावीन्यपूर्ण पीक लागवडीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

वाहत्या नद्या कमी होत चालल्या आहेत...

बांगलादेशच्या सीमा भारत आणि म्यानमारशी जोडलेल्या आहेत, तर उर्वरित सीमा बंगालचा उपसागर सांभाळत आहे. हा देश जगामधील सर्वांत मोठ्या त्रिभुज प्रदेशाने समृद्ध आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या नद्या या राष्ट्राला सुपीक करतात. बांगलादेश हा खरेतर नद्यांचा देश म्हणून ओळखला जाई. इतिहासात येथे ७०० ते ८०० नद्या वाहत असल्याची नोंद आहे.

बांगलादेश Water Development Board या संस्थेने देशामधील नद्यांचा अभ्यास करून त्याचे सहा खंड तयार केले आहेत. त्यानुसार, ही नद्यांची संख्या घसरून ४०५ वर आली, नंतर ३१० व आता तर २३० वर येऊन थांबली आहे.आज या राष्ट्रामधील १७ नद्या पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या नद्यांच्या यादीत मुख्य नद्या, उपनद्या, त्यांच्या उपनद्यांचा समावेश आहे.

या एकूण नद्यांपैकी ५४ लहान- मोठ्या नद्या भारतातून या राष्ट्रात येतात, तर ३ नद्या म्यानमारमधून म्हणजे आंतरराष्ट्रीय नद्यांची संख्या ५७ आहे. यातील मेघना, पद्मा, यमुना आणि तेस्ता या चार मुख्य नद्या या राष्ट्राच्या खऱ्या जीवन वाहिन्या आहेत. मुळात या भारतातील ब्रह्मपुत्रा आणि गंगाच आहेत. मधुमती आणि मुहुरी या दोन नद्याही महत्त्वाच्या आहेत. या सर्व नद्या बंगालच्या उपसागरास मिळताना प्रचंड मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण करतात.

जगामधील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश, सुंदरबन आणि तेथील बंगाल टायगर ही या देशाची खरी ओळख. मात्र वातावरण बदल आणि वाढत्या वैश्‍विक उष्णतेमुळे बंगालच्या उपसागरात होणारी मोठ मोठी चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, झपाट्याने वाढत असलेली समुद्र पातळी त्यामुळे या तिन्हीही ओळखी भविष्यात लवकर मिटून जाण्याची शक्यता वाढत आहे.

Dr. Nagesh Tekale
Dr. Anand Karve : ज्ञान आणि संशोधनाच्या मार्गाने वाटचाल करणारी ‘आरती’

बांगलादेशच्या कॉक्स बझार या शहराचा समुद्र किनारा तब्बल १५० किमी लांबीचा आहे, तोही आता संकटात आहे. समुद्र पातळी प्रतिवर्ष ३ मिमीने वाढत असून, ती अशीच राहिली, तर या राष्ट्राचा दहा टक्के भूभाग २०३० पर्यंत पाण्याखाली असेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. हा देश आज नद्यांचे महापूर, मोठ मोठी वादळे, चक्रीवादळे यांच्या तडाख्यात सापडला आहे. अनियमित पाऊस, ढगफुटी, काही भागात दुष्काळ दिसून येत आहेत.

त्यात जंगलाचे सुरक्षा कवचही जेमतेम १७ टक्के, यामुळे वातावरण बदलास अतिशय संवेदनशील राष्ट्र अशी आज बांगलादेशाची नोंद केली जाते. ज्या नद्यांनी बांगलादेशाला सुपीक केले, त्याच नद्या त्याला आता उद्ध्वस्त करत आहेत. १९९८ मध्ये या नद्यांना आलेल्या महापुरात ३/४ बांगलादेश पाण्याखाली गेला होता. त्यामुळे उडालेली त्रेधातिरपिट आजही तेथील लोक विसरू शकत नाहीत. एका अहवालानुसार २०५० पर्यंत हा देश २० टक्के पाण्याखाली असेल. त्यामुळे तब्बल ३ कोटी लोक कायमचे विस्थापित होतील.

वाहत्या नद्यांमुळे राष्ट्राला संपन्नता मिळते, हे आपल्याला ज्ञात आहेच. मात्र बांगलादेशात वाहत्या नद्या कमी होत आहेत, आहेत त्याच नद्या उग्र होत आहेत. वाढत्या लोकसंख्येचा ताण एकूणच निसर्गव्यवस्थेवर पडत आहे. अशा स्थितीमध्ये हवामान बदलाचे संकट, त्यातही वाढत्या समुद्रपातळीमुळे दहा टक्के भूभाग कमी होण्याची शक्यता अशा संकटांची मालिकाच बांगलादेशसमोर उभी राहणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com