
बाळासाहेब पाटील
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत भाजपचे आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांनी एकेरी उल्लेख केल्यावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Mla Jitendra Awad) यांना प्रत्युत्तर देताना सातपुते यांनी पवार यांचा एकेरी उल्लेख केला. दरम्यान, भाजपचे आशिष शेलार यांनी दिलगिरी व्यक्त करत, सातुपते यांनाही दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी उद्योग, अरबी समुद्रातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, ओबीसी, मराठा आरक्षण आणि अन्य विषयांवर भाष्य केले.
या वेळी आरक्षणावर बोलत असताना भाजपने केवळ ओबीसींच्या कोपराला गूळ लावला आहे. पुढे काहीच केले नाही, असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला सनातन धर्म हवा आहे, असे वक्तव्य केले आहे.
आम्हाला त्यांचा सनातन धर्म मान्य नाही. ज्या धर्माने आम्हाला पाच हजार वर्षे मागे ढकलले, शिक्षणापासून वंचित ठेवले तो धर्म आम्हाला मान्य नाही, असे म्हणताच राम सातुपते, देवयानी फरांदे, संजय कुटे यांच्यासह भाजपचे आमदार आक्रमक झाले.
देवयानी फरांदे यांनी हरकत घेत, पुरोगामी महाराष्ट्रात जातीजातींत अशी दुफळी निर्माण करणे बरोबर नाही. आव्हाड यांची वक्तव्ये पटलावरून काढून टाकावीत, अशी मागणी केली.
त्यानंतर आव्हाड यांनी सनातन धर्म आणि संविधान याबाबत भाष्य करताना राम सातपुते यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुमचा मतदार संघ आरक्षित झाला आहे. त्यामुळे तुम्ही आमदार म्हणून इथे आला आहात, अन्यथा कुणाची तरी चाकरी करत बसला असता’, असे म्हणताच भाजपचे आमदार आक्रमक झाले.
आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना सातपुते यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रोहित पवार, आदिती तटकरे, बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्वच आमदार प्रचंड आक्रमक झाले.
रोहित पवार, आदिती तटकरे, अण्णा शेळके, संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य आमदार धावत वेलमध्ये आले. सातपुते यांनी माफी मागावी, अशी मागणी करत प्रचंड घोषणाबाजी केली.
तालिकाध्यक्ष योगेश सागर यांनी शांततेचे आवाहन करूनही दोन्ही बाजूंचे आमदार आक्रमक झाल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
त्यानंतर गोंधळात सभागृहाचे कामकाज सुरू झाले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यांनी सातपुते यांनी केलेले विधान तपासून ते आक्षेपार्ह असल्यास सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोवर मागे हटणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घेतला.
जयंत पाटील म्हणाले, ‘सातपुते काय म्हणाले हे रेकॉर्डवरून काढून टाकण्याचा प्रश्न नाही. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे त्यांनी माफीच मागितली पाहिजे. वक्तव्य तपासून पाहून सांगेपर्यंत नवीन पायंडा पाडत आहात का?’ असा सवालही केला.
तरीही अध्यक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर सभागृहात आलेल्या अजित पवार यांनी, ‘सर्वच पक्षाचे ज्येष्ठ नेते त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदरस्थानी असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी वक्तव्ये करणे चूक आहे.
जर आमच्या नेत्यांबद्दल तुम्ही एकेरी भाषा वापरून बोलणार असाल आणि रेकॉर्ड तपासून नंतर काढून टाकणार असाल तर आम्हीही तसा उल्लेख समोरच्या आमदारांच्या नेत्यांबद्दल काढू. नंतर ते वक्तव्य कामकाजातून काढून टाकायचे की ठेवायचे हे तुम्ही ठरावा.
हे नवीन पायंडे पडतील. अनावधानाने चुकीचे काही बोलले गेले तर माफी मागितली जाते. मीही अनेकदा माफी मागितली आहे. पण कुठल्याही पातळीवर एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही.’ असे सांगितले.
आशिष शेलार यांची मध्यस्थी
राष्ट्रवादीचे आमदार माफीवर ठाम राहिल्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मध्यस्थी करत, दिलगिरी व्यक्त केली. तसेच सातपुते यांनीही माफी मागावी, असे आवाहन केले. त्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार रिकाम्या जागेत सातपुते यांच्या दिशेने पाहत उभे होते.
सातुपते यांनी केलेल्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागत, आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. आव्हाड यांनी सनातन धर्मावर चुकीच्या पद्धतीने टिप्पणी केल्याने मी असे बोललो. मी पहिल्या टर्मचा आमदार आहे.
बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, या माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा पडला आणि कामकाज सुरळीत सुरू झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.