US Agriculture Market : अमेरिकेतील शेतकरी बाजाराचा फेरफटका...

अमेरिकेतील विविध राज्यात शेतकरी बाजार ‘नॅशनल फार्मर्स मार्केट डिरेक्टरी‘च्या माध्यमातून शेतकरी, ग्राहक, समुदाय आणि व्यवसायिकांना एकत्र जोडण्यात आले आहे. हे बाजार वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थांचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील टॉरेन्स येथील मान्यताप्राप्त शेतकरी बाजाराचा फेरफटका...
US Agriculture Update
US Agriculture UpdateAgrowon

US Agriculture Market : शेतकरी बाजाराच्या इतिहासात डोकवायचे झाले तर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये शेतकरी बाजारास सुरवात झाली. नाईल नदीच्या काठी हे बाजार भरवले जात असतं. नाईल नदीतून प्रवास करणारे व्यापारी, प्रवासी हे या बाजाराचे ग्राहक होते.

सन १६०० पर्यंत हे सर्व चालू होते. अमेरिकेच्या बाबतीत पहिला शेतकरी बाजार १६३४ मध्ये मॅसाच्युसेटस (बोस्टन) येथे सुरू झाला. त्यानंतर १६४३ मध्ये हार्टफोर्ड, १६८६ मध्ये न्यूयॉर्क आणि १६९३ मध्ये फिलाडेल्फिया येथे शेतकरी बाजार सुरू झाले.

त्यानंतर आजमितीस अमेरिकेत आठ हजारांपेक्षा जास्त शेतकरी बाजार आहेत. २००८ नंतर ७६ टक्यांनी या शेतकरी बाजारामध्ये वाढ झाली.

साधारणपणे प्रति ३८,००० लोकांमागे एक बाजार आहे. हे सर्व बाजार ‘नॅशनल फार्मर्स मार्केट डिरेक्टरी‘च्या माध्यमातून शेतकरी, ग्राहक, समुदाय आणि व्यावसायिक यांना एकत्र जोडलेले आहेत. आता स्मार्टफोनमुळे संपर्क सोपा झाला आहे.

वर्षानुवर्षे अनेक गोष्टी बदलत गेल्या, पण हे सर्व बाजार अमेरिकेच्या इतिहासाशी जोडले गेल्यामुळे त्या त्या स्थानिक पातळीवर उत्पादित खाद्यपदार्थांचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून त्यांचे महत्त्व आजही आहे.

US Agriculture Update
Agriculture Warehouse : गोदामातील मापाड्या, सॅम्पलर, ग्रेडरसाठी नियमावली

शेतकरी- ग्राहक थेट भेट

१८०० ते १९०० च्या शतकात शेतकरी बाजार हे आर्थिक उलाढालीच्याबरोबरीने शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना एकत्र भेटण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण होते.

त्यातून मग एकमेकांच्या गरजा, आवडीनिवडी त्याचबरोबर ग्राहकांना अन्न सुरक्षेच्यादृष्टीने उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित उत्पादने घेण्याच्या पद्धती, उत्पादन खर्च, खतांचा वापर या बाबतीत थेट विचारता येत असल्यामुळे एक विश्वास निर्माण व्हायचा. त्याचप्रमाणे उत्पादन घेणे, पुरवठा करणे या गोष्टी साध्य करता येत असतं.

लहान शेतकरी, अन्न व खाद्य विक्रेते आणि स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये थेट सकारात्मक संबंध निर्माण व्हावेत आणि ते वृद्धिंगत व्हावेत म्हणून एकाच ठिकाणी स्थानिक कृषी व खाद्य संस्कृतीला एकत्र आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आठवड्यातून दोन दिवस सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत किंवा दुपारनंतर बाजार भरतो. कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हे बाजार महत्त्वाचे आहेत. कमी विकसित भागातील बाजारांना शासनामार्फत प्रोत्साहन दिले जाते. वर्षानुवर्षे अनेक कुटुंबे ही उत्पादक शेतकऱ्यांच्या पिढ्यांशी जोडलेले आहेत.

शेतकरी बाजाराचे नियोजन

शेतकरी बाजारात सहभागी होण्यासाठी जागेची विशिष्ट फी आकारली जाते. बाजारात एक व्यवस्थापक असतो, तो बाजाराचे व्यवस्थापन आणि विक्रेत्यांमध्ये समन्वय साधून प्रोत्साहन देतो. शहराच्या मध्यवर्ती भागात ( टाऊन स्क्वेअर किंवा डाउनटाउन स्ट्रीट) या ठिकाणी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शेतकरी बाजार भरतो. काही बाजार सकाळी तर काही दुपारनंतर भरतात.

गेल्या काही वर्षांत शेतकरी बाजारातून रसायन अवशेषमुक्त आणि सेंद्रिय उत्पादनांची विक्री वाढली आहे. या ठिकाणी शेतातून स्वयंपाकघरात (फार्म टू फोर्क) ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजलेली दिसते. या शेतकरी बाजारासाठी उपलब्ध केलेली जागा आणि स्वच्छता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

शेतीमाल आणि प्रक्रिया उत्पादने कशा पद्धतीने आणि कशी विकायची याचे नियमन संबंधित राज्य सरकार करीत असते. सर्व बाजारांना राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून मान्यता मिळणे आवश्यक असते.

राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन शेतकरी आणि ग्राहक करतात. बाजारात विक्री करण्यासाठी आलेला शेतकरी हा शक्यतो स्थानिक असावा. मान्यता प्राप्त विमा आणि सहभाग शुल्क भरलेले असावे.

या शेतकरी बाजारात व्यापारी शेती उत्पादने विकण्यासाठी नसतात. सर्व काही शेती उत्पादने आणि घरगुती उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतात. व्यापाऱ्यांना या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली जात नाही, असे शासकीय नियम आहेत.

बाजार बंद झाल्यानंतर आपल्या सर्व शिल्लक शेतीमालासह उभा केलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यासह हे सर्व शेतकरी आपापल्या जागा स्वच्छ करून गावी निघून जातात.

US Agriculture Update
Indian Agriculture : शेतजमिनी जिवंत करूया...

विविध भाज्या, फळे, फुलांची रेलचेल

अमेरिकेतील शेतकरी बाजारामध्ये हंगामाप्रमाणे मिरची, थाई चिली, टोमॅटो,भेंडी, कारली, वांगी, ढोबळी मिरची, कोबी, कांदे, लसूण, चवळीच्या शेंगा, कोथिंबीर, नवलकोल, मक्याची कणसे, काकडी, लाल माठ, हिरवे टोमॅटो, रताळी,बीट, ब्रोकोली तसेच इतर स्थानिक भाज्या विक्रीसाठी उपलब्ध असतात.

पेरू, सफरचंद, वेगवेगळ्या तुती, चेरी, कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी,लिंबू यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. याचबरोबरीने वेगवेगळ्या कुंड्यांमधून शोभेची झाडे, निवडुंग येथे पाहायला मिळतात.

या बाजारात मधमाशीपालक देखील मधाची विक्री करण्यासाठी येतात. ताजी बेकरी उत्पादने या बाजारात पाहायला मिळतात.

काही स्टॉलवर अंडी, ऑलिव्ह तेल, मोमोज, घरगुती तयार केलेली बिस्किटे, केकचे विविध प्रकार याचबरोबरीने विविध फळांची लोणची, वाइन, सुकवलेली फळे, मक्याच्या लाह्या विक्रीत उपलब्ध असतात. दुग्धजन्य पदार्थांपैकी फक्त चीज हे वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवलेले दिसले. काही स्टॉलवर घरी तयार केलेले आइस्क्रीम विक्रीसाठी उपलब्ध होते.

शेतीमालाचे विक्री नियोजन

१) शेतकरी बाजारातील किमती या हंगामानुसार कमी जास्त होतात. साधारणपणे उत्पादन आणि आवक यावर अवलंबून असते. फळे, भाजीपाल्याच्या स्टॉलवर वजनापेक्षा वाट्यावर जास्त विक्री होते.

२) स्टॉलवर मॉलमधील भाजपाल्यांपेक्षा किमती थोड्याशा जास्त असतात. उत्पादक आपले एकूण उत्पादन पाहून दर ठरवतो. या ठिकाणी सर्व शेतीमाल हा ताजा आणि सेंद्रिय मिळत असल्यामुळे ग्राहकांचा ओढा शेतकरी बाजाराकडे असतो.

३) या ठिकाणी ग्राहक शेतकऱ्यांशी अत्यंत आदराने बोलतात, चर्चा करतात. अनेक ठिकाणी किंबहुना सर्वच ठिकाणी प्रत्येक स्टॉलवर नवरा-बायको हे शेतीमाल विक्री करताना दिसतात. या ठिकाणचे व्यवहार रोखीने तर काही ठिकाणी ग्राहक ऑनलाइन करताना दिसले.

४) शेतकरी बाजारामध्ये सहभागी होण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून वार्षिक फी आकारली जाते किंवा काही ठिकाणी बाजाराच्या दिवसापुरतीच फी आकारून त्यांना विक्री करण्यासाठी परवानगी दिली जाते. अनेक ठिकाणी शेतीमाल विक्रीच्या रकमेवर सुद्धा फी आकारली जाते.

शेतकरी बाजाराचा उद्देश

१. स्थानिक शेतकरी, प्रक्रिया उद्योजकांना थेट विक्रीसाठी जागेची उपलब्धता.

२. ग्राहकांसाठी ताजा, आरोग्यदायी आणि स्थानिक पातळीवर उत्पादित शेतीमालाचा पुरवठा.

३. शाश्वत शेती पद्धती आणि पर्यावरणास अनुकूल शेती पद्धतींना प्रोत्साहन.

४. लहान शेतकरी आणि उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांची वाजवी किंमत मिळण्याची सोय.

५. रहिवाशांना भेटण्यासाठी आणि स्थानिक उत्पादकांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी एकत्र येण्याचे ठिकाण विकसित करणे, सामुदायिक संपर्क आणि सामाजिक संवाद वाढवणे.

६. ग्राहकांना थेट शेतकऱ्यांच्याकडून खरेदीच्या फायद्यांबद्दल शिक्षित करणे.

७. ताज्या स्थानिक उत्पादनांच्या वापरास प्रोत्साहन देऊन अन्न सुरक्षा वाढवणे, अन्न कचरा कमी करणे.

८. प्रदेशाच्या परंपरा आणि वारसा प्रतिबिंबित करणाऱ्या उत्पादनांची श्रेणी प्रदान करून सांस्कृतिक आणि स्वयंपाकासंबंधी विविधतेला चालना.

( लेखक निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com