maharudra mangnale: महारुद्र मंगनाळे यांच्या नजरेतून व्हिएतनामची सफर

व्हिएतनाम मधील दनान शहरात येऊन मला सहा-सात तासच झालेत.पण मी या शहराच्या प्रेमात पडलोय.आश्चर्य वाटतयं, इथल्या स्वच्छतेचं. बारकाईने बघतोय कुठचं कचरा दिसत नाही.रस्ते चकचकीत आहेत.
Vietnam
Vietnam Agrowon

मी गेल्या महिन्यात कोकणात (Koakan) नरवणला आशुतोष जोशी कडं गेलो तेव्हाच आमचं परदेश दौरा करण्याचं ठरलं होतं.

आम्ही व्हिएतनाम (Vietnam) हे नावही नक्की केलं होतं.आनंदशीही बोललो. मात्र त्याआधी मला मुक्तरंग प्रकाशनाची आणि माझी पुस्तकांची काम संपवायची होती.

तो अंदाज आल्यानंतर, आनंदला कल्पना दिली.त्याआधी आशुने ईव्हिसा मध्ये व्हिएतनाम मधील हनोई शहर हे प्रवेश करण्याचे ठिकाण दाखवले.

आनंदने मुंबई ते हो चि मिन्ह व परत अशी दोघांची तिकीटं बुक करून पाठवली. आशुने परत हो- चि- मिन्हचा ई-व्हिसा काढला.

काल दुपारी मी पुण्यात पोचलो.आशु सकाळीच आला होता. सायंकाळी कॅबने आम्ही थेट विमानतळावर पोचलो.भरपूर वेळ असल्याने, परिसरात फिरत राहिलो.पहाटे एक वाजता व्हिएतनाम एअरवेजच्या विमानात बसलो.

रात्री अडीच वाजता दाल राईस टाईपचं छान जेवण दिलं. सकाळी आठ वाजता दनान विमानतळावर उतरलो.सगळ्या तपासण्या झटपट झाल्या.

त्रास होईल असं काहीच जाणवलं नाही.हातात रायफली घेऊन फिरणारे जवान नाहीत की,पोलिस अधिकारी. माणसांच्या गर्दीतही जाणवला तो शांतपणा. आमचा पुढचा हो-चि-मिन्ह पर्यंतचा प्रवास डोमेस्टिक फ्लाईटने होणार होता.

त्या फ्लाईटला तीन तासांचा वेळ होता.हो-चि-मिन्ह ही व्हिएतनामची राजधानी.आंतरराष्ट्रीय शहर.तिथं गर्दी असणं अपेक्षीत आहेचं.

त्यामुळं आम्ही तिथं जायला उत्सुक नव्हतो.शिवाय परतीसाठी आम्हाला हो-चि-मिन्हला यावं लागणार आहेचं.आम्ही विचार केला,आज दनान लाच थांबून पुढचा कार्यक्रम बनवायचा.

विमानतळालगतच्या छोट्या कॅफेत शंभर डॉलरचे व्हिएतनामी ड्वांग मध्ये पैसे घेतले.करोडपती झालो आम्ही. हॉटेलचालक महिलेसोबत आशूचा हैद्राबादी इंग्रजीत संवाद सुरू होता.तिच्याकडंच आम्ही लोकल डाटाचे दोन कार्ड घेतले.

ते कार्ड लगेच सुरू झाले.तिनं पाहूणचार म्हणून दोन ग्लास गार चहा पाजला.गवती काड्यासारखी त्याची चव होती.आम्ही दोन ब्लॅक कॉफी मागितली.पुन्हा एकदा तिने दोन ग्लास तो थंड चहा दिला.कॉफीच्या आधी तो संपवला.

काळी कॉफी मस्तच होती.दरम्यान आशुने गुगलवरून सीहॉर्स होस्टेल शोधलं.कालपासून पायी फिरणं झालं नव्हतं.गुगल मॅपप्रमाणे आम्ही निघालो.

बहुतेक गुगललाही आमची पायी चालण्याची आवड माहित झाली असावी.दनान शहरातील फक्त दुचाकी जाऊ शकतात अशा अनेक मध्यमवर्गीय वस्त्यांमधून फिरवत फिरवत त्याने मुख्य रस्त्यावरील सीहार्स वर आणलं.

दिड तासात चार तासांची मस्त रपेट झाली.होस्टेलच्या काऊंटरवर चौकशी केली.दोन कॉट एका दिवसासाठी बुक केल्या.तिथंच स्वागतकक्षात बसलो तोच दोन ग्लास थंडगार शरबत टाईप पेय मिळालं.घोटघोट पित बसलो असतानाच,एक मुलगी तिथं आली.आशूचा तिच्याशी संवाद सुरू झाला.शाना तिचं नाव.ती नेदरलँडची.

समाजशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतेय. तासभर छान गप्पा झाल्या.ती इथं बऱ्याचदा येऊन गेलीय. तिनं आमच्यासाठी मोलाची माहिती दिली.तिचं भारताबद्दलचं मत ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही..इंडीया इज नॉट गुड फॉर ट्रॅव्हल..नाऊ डेज..असं ती म्हणाली. आम्ही विषय बदलला.

Vietnam
Maharudra Mangnale : लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतील?

रूममध्ये एकूण आठ कॉट आहेत.आम्ही दोन ताब्यात घेतले.स्वच्छ चकचकीत रूम.तसंच टॉयलेट, बाथरूम.शॉवरचं गरम पाणी.दोघेही आंघोळ करून जेवणासाठी बाहेर पडलो. एका साध्याच वाटणाऱ्या हॉटेलमध्ये मस्त जेवण केलं.

सोबत दोन प्रकारचा ताजा पाला होता.एकाची चव रानतुळशीसारखी तर दुसऱ्याची करडीसारखी वाटली.मी मसाला भात आणि आशुने नूडल्स खाल्ले. आमच्या रूमपासून दोन मिनीटाच्या अंतरावर तलाव आहे.तलावावर गेलो.शहरातल्या तलावातील स्वच्छ पाणी बघून चकीत झालो.

नकळत आपल्याकडच्या शहरातील तलाव डोळ्यासमोर तरळून गेले.शहरालगतच दूरपर्यंत डोंगराच्या रांगा पसरल्यात.तिथंला मुरूम,दगड काढून ते साफ केले नसल्याचं बघून मी अस्वस्थ झालो.असं चित्र पहिल्यांदा दिसल्यामुळं असं झालं असावं.

व्हिएतनाम मधील दनान शहरात येऊन मला सहा-सात तासच झालेत.पण मी या शहराच्या प्रेमात पडलोय.आश्चर्य वाटतयं, इथल्या स्वच्छतेचं. बारकाईने बघतोय कुठचं कचरा दिसत नाही.रस्ते चकचकीत आहेत.

रस्त्यावर एकाही जागी सांडपाणी आलेलं दिसलं नाही.कुठचं भोंग्याचे आवाज नाहीत.एकही बॅनर नाही.दिसतात ते फक्त राष्ट्रध्वज.हॉटेलात कुठचं जोरात आवाजात संगीत सुरू नाही.रिकामा माणूस कुठं बसलेला दिसला नाही.प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त.कोणाशीही बोला,समोरून हळू आवाजात सभ्यपणेच प्रतिसाद मिळतोय.

मोठं शहर आहे, भरपूर माणसं राहातात पण पळापळ,गर्दी,गोंगाट नाही.जागोजाग पर्यटकांचे ग्रूप दिसतात.अगदी रस्त्यावर बार आहेत.तरूण मुलं,ज्येष्ठ नागरिक निवांतपणे बीअर पित बसलेले दिसत होते.

तिथंही गोंधळ दिसला नाही.बहूतेक व्यवसायाच्या ठिकाणी मुली,स्त्रियाचं दिसताहेत.कुठंच वखवखलेपणा,तणाव,भीती दिसत नाही.सगळं संथ प्रवाहाप्रमाणे सुरू आहे.रस्त्यावर कुठचं शिट्या मारत उभारलेले ट्रॅफिक पोलिसही दिसले नाहीत.

ही सगळी मला दिसलेली,जाणवलेली निरीक्षणं आहेत.स्वच्छता,सभ्यता ही इथली संस्कृतीच असावी.सीहॉर्सच्या स्वागतकक्षाच्या टेबलवर असलेला बुध्दाचा पुतळा मला बरचं काही सांगून गेला.

माझी आणि आशुची पर्यटनाबाबत रास जुळलीय.आमच्या पर्यटनाच्या कल्पना वेगळ्या आहेत.पर्यटक गर्दी करतात तिथं जाण्यात आम्हाला रस नाही.

व्हिएतनामची संस्कृती,शेतीचं जनजीवन आणि निसर्ग अनुभवण्यात आम्हाला अधिक रस आहे.त्यामुळं आमचं पर्यटन आमच्या पध्दतीनेच चालू राहील..पण आमची निवड योग्य आहे ,याची पहिल्याच दिवशी खात्री पटलीय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com