Wheat Crop : हवेवरचा गहूः पाण्याची अजिबात गरज नसलेला, नुसत्या हवेवर येणारा गहू

Wheat Crop Variety: या गव्हाची ओळख म्हणजे त्याला असलेली चव. शंकर पवार यांच्या भाषेत सांगायचं तर, "या गव्हाची चपाती किंवा पुरणाची पोळी म्हणजे एक नंबर.
Wheat Crop Variety
Wheat Crop VarietyAgrowon

अभिजित घोरपडे

हवेवरचा गहू... सांगली जिल्ह्यातील विट्याचा माझा एक मित्र विजय लाळे. त्याच्याकडून या गव्हाबाबत (Wheat Crop) पहिल्यांदाच ऐकलं. काहीही न करता नुसत्या हवेवर येतो म्हणून हा हवेवरचा गहू. या गव्हाबाबत उत्सुकता होती.

त्यामुळे सांगली जिल्ह्यात तामखडीच्या भागात फिरलो. हा गहू (Wheat Production) करणारे शंकर महादेव पवार यांनाच थेट भेटलो. खानापूर तालुक्यातील ऐनवाडी हे त्याचं गाव.

त्यांच्या भाषेत हा डोंगरी गहू किंवा शेतगहू. तसा कोणताही गहू थंडीत चांगला येतो, पण या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे याला पाणी अजिबात द्यायला लागत नाही.

मातीत जी काही थोडीफार ओल असते, त्याच्यावर तो पिकतो. आधी पाऊस चांगला झाला असेल आणि थंडी कडाक्याची असेल तर पीक चांगलं येतं.

खरिपानंतर जमिनीत ओल असतेच. रानंही तयार असतात. हा गहू वीतभर खोल पेरला की झालं. काहीच करायचं नाही, शेवटी थेट गहू काढायलाच जायचं. एकरी साधारणत: २० किलो पेरावा लागतो. उत्पादन चार-पाच क्विटलपर्यंत येतं.

शिवाय त्यात काटेरी करडीसारखं आंतरपीकही घेता यायचं. तिचं उत्पादन एकरी दीड-दोन पोती. जमिनीत फारशी ओल नसली तरी हा गहू पिकतो. यंदाच्या वर्षी पाऊस किंवा थंडी नसतानाही पीक आलं.

फार नाही, पण दीड-दोन क्विंटल गहू पिकलाच. हा गहू पिकवणारा परिसर म्हणजे विटा-खानापूर तालुक्यात उंचावर असलेला तामखडीचा भाग. रेवणगाव, धोंडगेवाडी, ऐनवाडी, जाधववाडीपासून ते खाली भिवघाटपर्यंत.

Wheat Crop Variety
Wheat Harvest : गहू काढणीच्या कामांची पूर्व भागात लगबग

या गव्हाची ओळख म्हणजे त्याला असलेली चव. शंकर पवार यांच्या भाषेत सांगायचं तर, "या गव्हाची चपाती किंवा पुरणाची पोळी म्हणजे एक नंबर. पोळ्या मऊ बनतात. चवीच्या बाबतीत तर इतर कशालाच सर नाय..." त्याच्या या गुणांमुळं एका क्विंटलला हजारेक रुपयांचा जास्त दर मिळतो.

पण हा गुणी गहू आता जवळजवळ संपत चाललाय, संपूर्ण पट्ट्यात चार-आठ शेतकरीच तो करतात. त्याला कारणही आहेत. "पूर्वी पाण्याची सोय नसताना हा शेतगहूच केला जायचा.

आता पाणी आल्यामुळं पानगहू (पाणगहू) आला. याला उत्पादन जास्त असतं. त्यामुळे शेतगहू किंवा डोंगरी गहू मागं पडत गेला. काही लोक करतात तो हौसेपोटी..." श्री. पवार सविस्तर सांगतात.

Wheat Crop Variety
Wheat Rate : तिसऱ्या लिलावात ५ लाख टन गव्हाची विक्री

पण हे केवळ या हवेवरच्या गव्हाबाबत नाही. माण-म्हसवडच्या दुष्काळी पट्ट्यात फिरताना असंच पाच महिन्यांच्या बाजरीबाबत ऐकलं.

आता बाजरी तीनेक महिन्यांत येते, पण तिथली परंपरागत बाजरी पाच महिन्यांची असायची. कणसं लागली की घमघमाट सुटायचा. बाजरी लावलीय हे लांबूनच लक्षात यायचं.. परिसरात दरवळणाऱ्या सुगंधावरून.

चवीचं म्हणाल तर विचारायलाच नको.. हेच मावळातल्या मूळ आंबेमोहोर, इंद्रायणी तांदळाबद्दल ऐकलं. संपूर्ण सह्याद्री आणि विदर्भात भाताच्या इतक्या जाती आहेत की कुठंही गेलं तरी वेगळ्या जातीची माहिती मिळते.

दु:खाची बाब म्हणजे या जाती नष्ट झाल्याची किंवा हरवत चालल्याची व्यथाही त्यासोबतच ऐकायला मिळते. कमी पावसाच्या पट्ट्यात हेच मटकी, हुलग्याबाबतही ऐकायला मिळतं.

Wheat Crop Variety
Wheat Harvesting : गव्हाची पिके काढणीच्या अवस्थेत

हे निव्वळ धान्यांबाबतच नाही, तर आंबा-पपईपासून सर्व भाज्यांपर्यंत सगळीकडंच दिसू लागलंय. साधं गाजराचं उदाहरण घ्या. गोड गाजरं उरलीच नाहीत. आता बाजारात हातभर लांबीची गाजरं दिसतात, पण चव नसलेली!

पूर्वीची गोडी असलेली गाजरं बघायलापण मिळत नाहीत. तेच गवारीचं. कूस असलेली गवार आता चुकून कुठंतरी तालुक्याच्या, नाहीतर गावच्या बाजारात दिसते.

इतरत्र उदंड पीक वाढलंय ते पोपटी, चकचकीत गवारीचं.. चव नाही, नुसताच चोथा! मेथी, भेंडी, टोमॅटो... कोणतीही भाजी डोळ्यासमोर आणा, सगळ्यांच्या बाबतीत हेच घडलंय. हल्ली पपई विकत घेणं हा जुगारच झालाय. कारण चवीला कशी असेल हे वरून समजत नाही.

Wheat Crop Variety
Wheat Management : गहू उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे

पिवळी असो, मऊ असो नाहीतर आणखी कशीही, चवीची खात्री देता येत नाही. लहानपणी आजोळचे दिवस आठवतात- चुलत मामांचा मुलगा सुट्टीत पेठेला पपया विकायला बसायचा.

ही मोठी पपई. कापली की बियाच बिया.. पिवळी झाली की डोळे झाकून घ्यायची, गोड असणारच. त्याच वेळी आम्ही पाटीत आंबे घेऊन बसायचो.

वेगळ्या झाडाचा वेगळा आंबा. त्याच्या दिसण्यावरून, चवीवरून आपणच नावं द्यायची- गोटी, केशरी, लोद्या, केळ्या, शेपू, तोंडआवळ्या... असंख्य जाती, असंख्य नावं. खराब असला तर वरून समजायचं. वरून आकर्षक आणि आतून खराब हा अगदीच अपवाद. आता आंब्यातही ती खात्री उरली नाही.

Wheat Crop Variety
Wheat Production : सलग दुसऱ्या वर्षी गहू उत्पादन घसरणार?

या साऱ्याचा अर्थ काय? विविधता संपली आणि सारं एकसुरी बनू लागलंय. अर्थात हे सारं केवळ भावनिक म्हणून मांडत नाही. हे खरंय की या बदलामागे कारणं असतील आणि आहेतही. उत्पादन वाढावं म्हणून नवी संकरीत वाणं आली.

पण ही वाणं विकसित करताना आपल्या परंपरागत वाणांचं उत्पादन वाढावं यासाठी किती प्रयत्न झाले? किंवा ते शेतात टिकवण्यासाठी सरकारी, सार्वजनिक प्रयत्न झाले का? त्याला प्रोत्साहन दिलं गेलं का?.. खरंतर याचं उत्तर नकारार्थी आहे. जे काही टिकून आहे ते शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळं किंवा परिस्थितीमुळं.

या जाती टिकवायच्या कशासाठी? असा मुद्दा कदाचित उपस्थित होईल. याची अनेक कारणं आहेत. याच जाती अधिक कसदार होत्या, आहेत. त्या त्या भागात जगण्यासाठी लागणारी पोषणमूल्य त्यातून मिळतात. इतर वाणांमुळं जास्त उत्पादन मिळेल, पण त्यात कस (पोषणमूल्य) किती असतो, हा प्रश्नच.

चवीचंही तसंच. गोडी, खमंगपणा, गंध याबाबतीत हीच वाणं सरस ठरतात. बरं, स्थानिक जाती असल्याने इथल्या वातावरणात टिकून राहतात. रोगाला बळी पडत नाहीत.

अमूक खतं, तमूक कीटकनाशकं, इतकं पाणी... असे चोचले नाहीत. त्यामुळे मशागतीचा खर्च कमी. बियाण्याचाही वेगळा खर्च नाही. शिवाय जात जाता विविधताही टिकून राहते.

आता म्हणाल तर याबाबत जागकरूकता वाढली आणि अशा उत्पादनाची मागणीही वाढलीय. शेवटचं गिऱ्हाईक साध्या केळीसाठी डझनाला तीस-चाळीस रुपये मोजतं, तर देशी केळीसाठी दीडपट भाव द्यायला तयार असतं... मग आता तरी या जाती टिकवाव्यात का?

त्यासाठी दोन प्रश्नांची उत्तरं देता आली तर पाहा- हे कशासाठी करावं? आणि करायचंच तर मग कसं? आणि जमलंच तर तुमच्या भागातल्या संपलेल्या किंवा संपत चाललेल्या जातींची नावंसुद्धा कळवा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com