आईच्या हातचा मार...

पूर्वी गावात जर कुणाला बरं नसलं की सर्रास गावठी इलाज केले जायचे. त्यातल्या त्यात 'दाकतरला लै पैसं लागात्यात' म्हणून लोकं तिकडं जात नसत. माझी आईसुद्धा गावठी इलाज करायची
आईच्या हातचा मार...
मशागत लेखAgrowon

पूर्वी गावात जर कुणाला बरं नसलं की सर्रास गावठी इलाज केले जायचे. त्यातल्या त्यात 'दाकतरला लै पैसं लागात्यात' म्हणून लोकं तिकडं जात नसत. माझी आईसुद्धा गावठी इलाज करायची. जखमेला पारूश्याचा चीक किंवा उन्हाळीचा पाला, दात घासायला तरवडाच्या सालीच्या पावडरीचं दंतमंजन, कोंड्याला 'हिंगणं'लावायची. सर्दीला गावरान ओवा तव्यावर टाकून वास घ्यायला लावायची. एकदा मी व संपतनंही असा प्रयोग केला. आम्ही तुफान सर्दीनं नाक शिकरून वैतागलो होतो. मी संप्याला बोललो, "संप्या, एक इगुत करायची का रं?" तो म्हनला, "काय?"

"याक काम कर, तू फक्त ववा घेवून ये घरून." मी जुन्या वहीच्या पानांच्या चार बिड्या करून त्यात ओवा भरला. बिड्या पेटवून बसलो अंधारात गुपचूप वढीत. तोंडानं धूर आत वढून नाकानं बाहेर सोडायचा कार्यक्रम रंगला होता. सवय नसल्यानं जोराचा ठसका लागला अन् नेमकं त्याचवेळी तिथून चाललेल्या संप्याच्या आज्जीनं सहज विचारलं, 'काँची गाभडी बिड्या वढीत्यात रे?' आम्हीही लगेच 'वव' दिली. तिनं आवाज ओळखला. झालं सगळ्या गावात 'संप्या आणि देव्या चोरून बिड्या पित्यात.' अशी खबर पांगली. मग आमच्या आयांनी आम्हाला दिसेल त्या वस्तूंनी निबार रेमसावलं. पाठी व लवण्या काळ्यानिळ्या पडल्या. खाली पडू पडू हात जोडून विणवू लागलो की 'आम्ही तंबाखूच्या नाही तर वव्याच्या बिड्या वढीत व्हतो.' पण आमचं कुणीच ऐकलं नाही.

दुसऱ्यादिशी शाळेत प्रार्थना झाल्यावर मुळे गुरुजीनी काहीच न विचारता निर्गुडीच्या फोकानं आम्हा दोघांना सडकून काढलं. आठ दिवस मांडी घालून बसता येईना.

त्या रात्री आईशी न बोलता भाकर खाऊन गोधडीवर लवंडलो. आई माझ्या वळांवर तेल लावताना कंठ दाटल्या स्वरात म्हणाली, "बाळा, तुला लै मारलं रं म्या, पन याक लक्षात ठिव, मपल्या लेकराला क्वानी येसनी म्हनल्याव माह्या काळजाला किती इंगळ्या डसल्या आस्तिल बरं?" "आगं आई, पन मी वव्याची बिडी पेत व्हतो गं." "आज वव्याची पेला, मोठा झाल्याव खरी बिडी प्याया लाग्ला म्हंजे?; पण आज बस्लेला मार तुला वाईटापास्न कायम लांब ठिविल बघ."

"नाहयी गं आई मी कधीच कुठली बिडी पिनार नाहयी गं." मला मायेनं जवळ घेतलं. चिमनी विझली होती त्यामुळे तिच्या डोळ्यातलं पाणी मला दिसलं नाही. ती मुसमुसु लागली. त्यानंतर मात्र कुठलंच व्यसन जवळ फिरकलं नाही. आईच्या हातचा मार माझ्या जिवाचं सोनं करून गेला. असं सोनं ज्याचा भाव कधीच कमी झाला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com