Fruit Crop : जाधव यांच्याकडील पेरूची सर्वोत्तम गुणवत्तेसाठी ओळख

पुणे शहरापासून जवळ असलेले काळेवाडी- दिवे (ता. पुरंदर) येथील गजानन जाधव यांनी उत्तम गुणवत्तेच्या पेरू उत्पादनात नाव कमावले आहे.
Fruit Crop
Fruit CropAgrowon

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका पेरू, सीताफळ, अंजीर आदी फळपिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील काळेवाडी, दिवे येथील गजानन अंकुश जाधव यांनीही या पिकांमध्ये (Crop) चांगले नाव कमावले आहे. त्यांची सुमारे चौदा एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकरांवर मोठ्या आकाराचा पेरू, तीन एकरांवर अंजीर व तेवढ्याच एकरांत सीताफळ आहे.

Fruit Crop
Crop Insurance : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

शासकीय मान्यताप्राप्त नर्सरी आहे. गजानन यांना त्यांची मुले दिनेश व युवराज यांची शेतीत मोठी साथ आहे. दिनेश यांचे बीएस्सी हॉर्टिकल्चर तर युवराज यांनी बीएस्सी ॲग्री केले आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या शेती करण्याचा प्रयत्न असतो.

पेरूची सुनियोजित शेती

पुरंदर ही तीव्र पाणीटंचाई असलेला पट्टा आहे. जमिनी मुरमाड आहेत. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या, उष्णता सहन करणाऱ्या व चांगले उत्पादन देऊ शकतील अशा पेरूची लागवड करण्यासाठी जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार मोठ्या आकाराच्या वाणाची २०१३ मध्ये लागवड केली. त्यातील १२०० झाडांपैकी ९३५ झाडे उत्पादनासाठी ठेवली असून उर्वरित झाडे नर्सरीसाठी ठेवली आहेत.

पुणे जिल्ह्यात हे वाण सर्वप्रथम आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही असल्याचे दिनेश सांगतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असल्याने पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते. त्यासाठी शेतात विहीर आहे. ठिबक सिंचन आहे. बागेतील सर्व झाडांना एकसमान प्रमाणात पाणी मिळावे म्हणून तशी यंत्रणा बसवून घेतली आहे.

Fruit Crop
Sugar Factory : आर्थिक विकासाचे माध्यम : साखर कारखाने

चांगल्या दर्जाच्या फळाचे उत्पादन

जुन्या बागेचे लागवड अंतर १० बाय ८ फूट आहे. तर नव्या दोन हजार झाडांची लागवड आता होणार असून, हे अंतर ११ बाय ७ फूट ठेवले आहे. दिनेश सांगतात, की पेरूचे वर्षातून दोन हंगाम घेता येतात. मात्र आम्ही केवळ एकच बहर घेतो. त्यामुळे गुणवत्ता जपता येते. छाटणी फेब्रुवारीच्या दरम्यान करतो.

ऑगस्ट- सप्टेंबर काळात म्हणजे सणासुदीच्या काळात फळे बाजारपेठेत येतात. उत्पादित फळे चांगल्या दर्जाची मिळावीत म्हणून डागरहित उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो. बहर धरल्यानंतर फळे लिंबाच्या आकाराची असताना संरक्षणासाठी फोम व पॉलिथिन बॅगेचे आवरण बांधले जाते. झाडांचे वय राहता एकरी १० टन व त्यापुढे उत्पादन मिळत असल्याचे दिनेश सांगतात.

प्रतवारी

सकाळी सात वाजेच्या दरम्यान काढणी होते. त्यानंतर आकारानुसार व वजनानुसार प्रतवारी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने लहान, मोठे आणि मध्यम आकाराचे आणि अति पिकलेले पेरू असे वर्गीकरण केले जाते. मध्यम ते मोठ्या आकाराच्या पेरूला चांगली मागणी असली तरी पिकलेल्या पेरूलाही कमी- अधिक मागणी राहते. दहा किलोच्या बॉक्समधून माल बाजारपेठेत पाठवला जातो. आवक जास्त असल्यास २० किलोच्या क्रेटमधून मालाची पाठवणी होते.

दिनेश जाधव ९०११६४७०००, ७७०९२०३०४९

बाजारपेठ

पुणे बाजारपेठ जवळ असल्याचा फायदा मिळतो. मुंबई बाजारपेठेलाही माल पाठवला जातो. त्यास किलोला ६५ रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत दर मिळतो. निवडक व ए ग्रेडच्या फळांना आघाडीच्या चार मॉल कंपन्यांकडून मागणी असते. ते बांधावरून माल घेऊन जातात. त्यास किलोला १०० ते १२० रुपयांपर्यंतही दर मिळतो.

पेरूचा हंगाम तसा डिसेबरपर्यत चालत राहिला तरी खरी मागणी ऑगस्ट ते ऑक्टोबर कालावधीत सर्वाधिक राहते. काही वेळेस जास्त माल निघाल्यास पुणे बाजारपेठेत विक्रीची हमी असल्याने फारशी अडचण येत नाही. सर्व परिस्थिती अनुकूल राहिल्यास एकरी सात लाख रुपयांपर्यत उत्पन्न व खर्च वजा जाता तीन ते चार लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते.

Fruit Crop
Crop Insurance : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

पेरूचे वैशिष्ट्य

दिनेश म्हणाले, की आम्ही घेत असलेल्या पेरूची टिकवणक्षमता चांगली आहे. झाडावर सुमारे ८ ते १० दिवस तो चांगल्या स्थितीत राहू शकतो. फळाचे वजन ३०० ते ७०० ग्रॅमपर्यंत असते. त्यात बियांचे प्रमाण कमी आहे. स्वाद चांगला गोड आहे.

अंजीर, जांभळालाही चांगली मागणी

पेरूव्यतिरिक्त अंजीर शेतीतही जाधव यांनी चांगली ओळख तयार केली आहे. आपल्या बागेत निवड पद्धतीने त्याचे वाण विकसित झाल्याचा दावा दिनेश यांनी केला आहे. ते म्हणाले, की सन २०१२ मध्ये आम्ही अंजिराच्या मोठ्या आकाराचे फळ असलेल्या वाणाची लागवड केली आहे. नेहमीच्या अंजीर फळाची एका पेटीत १२ फळे व अशा चार पेटींचा एक झोटा असतो.

त्या तुलनेत या वाणाच्या अंजिराची एका पेटीत सातच फळे बसतात व एका झोट्यात २८ फळेच बसतात. अडीच किलोचा झोटा गृहीत धरला, तर त्याला साडेतीनशे रुपये दर मिळतो. जांभळाचे उत्पादनदेखील आमचे एप्रिल-मेच्या दरम्यान येते. त्या काळात अन्य ठिकाणांहून आवक फारशी नसल्याने दर किलोला २०० रुपये ते त्याहून अधिक मिळतात. मेच्या पुढील काळात आवक झालेल्या जांभळास हे दर ६० ते ६५ रुपये असे मिळतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com