
Nashik Development News : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२२-२३ या वर्षाच्या स्पर्धेचा निकाल बुधवारी (ता. १९) घोषित करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. या अभियानाअंतर्गत १३ पैकी ७ पारितोषिके नाशिक विभागाला मिळाली आहेत. या स्पर्धेत नाशिक विभागाने आघाडी घेतली.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेत राज्यातील सर्व मुख्यालयांच्या कार्यालयातून थेट येणाऱ्या प्रस्तावात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.
तर विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात जिल्हाधिकारी जळगाव यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दहा लाखांचे पारितोषिक मिळविले आहे.
तसेच सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांनी भूसंपादन प्रक्रियेत महाराष्ट्र रिमेट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर, नागपूर यांच्याकडून प्राप्त उपग्रह छायाचित्रांचा वापर करण्यात प्रथम क्रमांक मिळवून ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी बचत गटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
कर्जत (अहमदनगर) तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ शिवाजी म्हस्के यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी महाडीबीटी मेळाव्याच्या माध्यमातून केल्याबद्दल त्यांना द्वितीय क्रमांकाचे ३० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
तसेच शासकीय कर्मचारी गटात तहसील कार्यालय, राहता (अहमदनगर) मंडळ अधिकारी डॉ. मोहसीन युसूफ शेख यांना महसूल अर्धन्यायिक निकालपत्रात क्यूआर कोडचा राज्यातील प्रथम नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रथम क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
तर राजू मोहन मेरड, तलाठी आणि श्रीमती वैशाली सदाशिव दळवी, मंडळ अधिकारी, माणिकदौंडी (ता. पाथर्डी, अहमदनगर) यांनी आदिवासी समाजासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बॅंक पुस्तिका आदी प्रदान केल्याबद्दल द्वितीय क्रमांकाचे ३० हजारांचे पारितोषिक जाहीर झाले. नागरी सेवा दिनी (ता. २१) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.