Rural Society : मशिदीत नमाज झाली की मारुतीच्या देवळा समोर खीर खायला बसायचं!

Indian Diversity : रमजान ईदला शिरकुर्मा गावातला प्रत्येक घरी पोहचायला. दिवाळीचा फराळ इकडे यायचा. दसऱ्याला आपट्याचं सोनं द्यायला, आजोबांच्या भेटीला प्रत्येक माणूस घरी यायचा.
Rural Society
Rural SocietyAgrowon

पै.मतीन शेख

Rural Story : दुपारी मशिदीत जुम्माची नमाज अदा करायची अन् संध्याकाळी शाळा सुटली की मारुतीच्या देवळात खेळायचो आम्ही. पार मारुतीला वेढे घेवून दमायचं. जवळपास भितींला भिंतच कि देऊळ अन् मशिदीची. पहाटेची आजान झाली की लोकं लगबगीने उठायची. घरासमोर झाडलोट व्हायची, सडे पडायचे.

सकाळी ग्रामदैवत रोकडाई च्या देवळातून देवीची गाणी लागायची. दुपारी परत आजान व्हायची. रात्री मारुतीच्या देवळात स्पिकर वरुनच पोथी वाचली जायची. कधीच कुणाला कोणाचा त्रास झाला नाही. ना भौंग्यांचा, ना माणसांचा, ना कुणाला कुणाच्या धर्मांचा. गावात, गावकऱ्यांच्यात ऐकोपा होता.

रमजान ईदला शिरकुर्मा गावातला प्रत्येक घरी पोहचायला. दिवाळीचा फराळ इकडे यायचा. दसऱ्याला आपट्याचं सोनं द्यायला, आजोबांच्या भेटीला प्रत्येक माणूस घरी यायचा. मी प्रत्येकाचे पान सुपारी देवून स्वागत करायचो. कधी कुणाचा काय तंटा झाला तर लोकं तुराब भई अर्थात आजोबांकडे वाद मिटवायला यायची. आजोबा न्यायी भुमिका घेत तंटा रोखायचे.

शिखर शिंगणापूरला जाणारी महादेवाची काठी गावात मुक्कामी असायची. संध्याकाळी याच मारुतीच्या मंदिरासमोर भल्या मोठ्या कलईत खीर केली जायची. मी मशिदीतून निघायचो अन् मंदिरासमोर खीर खायला बसायचो. मज्जा यायची. त्या खिरीची चव अजून जिभेवर रेंगाळते.

Rural Society
Rural Maharashtra Story: हंडरगुळी बाजारचं नातं संपलं!

शेजारीच तालीम होती. आज्जी दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात नारळ फोडायला सांगायची. समोरच्या तुळशीच्या कट्ट्यावर गावातली तरुणाई गप्पा ठोकत बसायची. ग्रामपंचायतीच्या समोर कधी आट्यापट्या तर कधी क्रिकेटचा सामना रंगायचा. गावची यात्रा जोरात भरायची.

प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा, तमाशा गावात बोलावला जायचा. मारुतीच्या देवळा समोरच फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी व्हायची. रोकडाईची पालखी निखायची.

यात्रेचा आकर्षणाचा भाग म्हणजे सोंगांचा कार्यक्रम. रामायण, महाभारतातील पात्रांचा वेश घेतला जायचा. समोरासमोर बैलगाडीतून एकमेकांवर त्या महाकाव्यातल्या घडामोडींवर आवेशपूर्ण संभाषण व्हायचं.

गावकरी कलाकार पार त्या पात्रात घुसून आपली कला सादर करायचे. विशेष म्हणजे गावची मुस्लिम लोकं पण सहभागी होत पात्र साकारत होते. त्यांच्याविना हा सोंगांचा कार्यक्रम होणे शक्य नसायचं. कोण चांगला संवाद साधतो, याची चढाओढ लागायची. अगदी या लोकांना आवरायला मागे माणसे उभा राहायची.

इतकं तो अद्भुत खेळ व्हायचा. गावात कायम पैलवानकीचा नाद असल्याने कुस्त्या फड ही जंगी व्हायचा. मोहरमला मुस्लिमांना सह हिंदू बांधव एकत्र येत कार्यक्रम पार पाडयचे. एकत्र लेझीमचा खेळ व्हायचा.

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातलं सापटणे (भोसे) हे माझ्या मामाचं छोटसं गाव. अधिकचं बालपण माझं इथंच गेलं. गावात मुस्लिम 'काझी' समुदाय. सोबतीला मराठा, रामोशी, कोल्हाटी, न्हावी, परिट, सुतार, दलित असा अठरापगड समाज छोट्याशा गावात सुखात नांदत होता. आजही नांदतो.

Rural Society
Rural Economy : खेडोपाडी आर्थिक आणीबाणीचे चित्र

मामा पै.आस्लम काझींच्या कुस्ती कारकिर्दीमुळे गावाचं नाव राज्यभर झालं. गावचं एकहाती नेतृत्व सरपंच गणपत (आप्पा) गिड्डे करायचे. आप्पांच नेतृत्व सकलजनवादी होतं. ते सर्वांना सोबत घेवून चालायचे. न्याय भुमिका घ्यायचे.

आप्पांच्या सत्तेला अधिमान्यता होती. ते लोकनेते होते. काही वर्षांपुर्वी आप्पा अपघाती गेले अन् गाव बदललं. टोकाचा सत्ता संघर्ष सुरु झाला. वर्चस्ववादी राजकारणाची सुरुवात झाली.

नाती - गोती, मैत्री, एकमेकांची मन ही तुटली. गाव दुभंगलं. शेवटी कुणाच्याच हाती काही लागलं नाही. इर्षा सोडून गाव परत एक झाला. मामाचा गाव भारी होता, आजही आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com