
प्रतापराव पवार
Indian Agriculture : माझ्यावर वयाच्या तेविसाव्या वर्षी ‘अंधशाळे’ची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे समाजातील अंध व्यक्तींचं, मुला-मुलींचं समाजातील अज्ञान, आर्थिक क्षमता वगैरेंशी माझा संबंध यायला लागला. अंधत्व का येतं आणि आलं तर काय करायला हवं याची आपोआपच प्रश्नोत्तरं समोर यायला लागली.
यानंतर सुमारे पाच वर्षांनी शंतनुराव किर्लोस्करांनी (Shantanurao Kirloskar) माझी ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड’ या कंपनीवर संचालक म्हणून नियुक्ती केली. यामुळे किर्लोस्करांशी वैयक्तिक ऋणानुबंध तर वाढलेच, शिवाय खूप शिकायलाही मिळालं.
या कंपनीच्या होणाऱ्या सभा, अनेकदा त्यांच्याकडे काही उद्योजक किंवा तत्सम उच्चविद्याविभूषित लोक आले की आम्हा उभयतांनाही बोलावलं जायचं. अनेकदा सामाजिक, शैक्षणिक (Academic), आर्थिक (Financial) बाबींविषयी चर्चा होत.
शिक्षणाबद्दल सार्वत्रिक नाराजी व्यक्त केली जायची. शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची पदवीधर झाल्यावर असलेली क्षमता, उपयुक्तता यावर भरपूर टीका होत असे. मी पिलानीतून शिकल्यामुळे माझी परिस्थिती त्यामानानं चांगली होती.
कारण, पदवीधर होईपर्यंत आम्हा पिलानीकरांना चार उद्योगक्षेत्रांत घेतलेल्या प्रशिक्षणाचं पाठबळ होतं. महाराष्ट्रात असं कुठंही नव्हतं.
पदवीधराला नोकरीवर घ्यायचं व नंतर वर्ष-सहा महिने प्रशिक्षण द्यायचं; मगच तो औद्योगिक संस्थेत काम करण्याच्या पात्रतेचा होत असे. अशा टीका होई, तेव्हा माझ्या मनात विचार येत असे की, हे मान्य आहे; परंतु ते सुधारण्यासाठी आपण काय करतो?
गरजू, गरीब विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. अच्युतराव आपटे यांनी ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’ स्थापन केली. अनाथ मुलं आणि महिला यांच्या पुनर्वसनासाठी बाबासाहेब जाधव यांनी ‘बालग्राम’ सुरू केलं. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किशाभाऊ पटवर्धन यांनी ‘स्वरूपवर्धिनी’ सुरू केली.
या सर्व संस्थांशी माझी नाळ जोडली गेली होती. ‘बालकल्याण’ संस्था - जी सुमारे पाच हजार अपंग विद्यार्थ्यांना मदत करते - तिथंही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याबरोबरच पालक, शिक्षक यांचंही प्रशिक्षण आम्ही महाराष्ट्रभर केलं. ते या मुलांच्या सामाजिक आणि भावनिक दृष्टीनं महत्त्वाचं होतं.
घरातील अपंग मूल म्हणजे देवाचा कोप किंवा शाप अशी समजूत होती. ‘सकाळ’मध्येही अशा सामाजिक विचारांवर काम करणारे अनेक न्यास आहेत. यामुळे साहजिकच मनात द्वंद्व होत होतं की, शिक्षणाबाबत आपण किंवा समाज काय करतो?
काही काळानंतर चंद्रकांत किर्लोस्करांनी मला ‘मराठा चेंबर्स’च्या कामात गुंतवलं. तिथं काही लोक व्यवसायाबरोबरच शिक्षणक्षेत्रातही काम करत होते. उदाहरणार्थ : अतुर संगतानी, जे सिम्बायोसिस संस्थेच्या प्रथम विश्वस्तांपैकी एक होते. त्यांच्याबरोबरही भेटीगाठी होत. आमचा चांगला स्नेह होता.
या सर्व अनुभवांतून ‘मराठा चेंबर्स’च्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली, तेव्हा मी काही नवीन योजनांची आखणी केली. त्यावेळी व्यवसायात मंदी होती आणि संरक्षणखातं लाखो कोटी रुपयांची सामग्री आयात करत होतं. हे खटकणारं होतं.
आपल्या देशात ही क्षमता निर्माण करून हेच पैसे देशात का ठेवले जात नाहीत हा विचार मनात होता. यातून संरक्षणखात्याशी समन्वय साधण्यासाठी एक कमिटी - निवृत्त झालेल्या; परंतु सामाजिक जाण असलेल्या - संरक्षणखात्यातील एका व्यक्तीला देऊन कामाला सुरुवात केली.
त्यांना आम्ही असं सांगितलं, ‘आमच्या उद्योजकांत अनेक तज्ज्ञ सर्व क्षेत्रांत काम करतात. आमच्याकडे अशा तीन हजार संस्था, सभासद आहेत. त्यांचे तज्ज्ञ तुमच्या कॉलेजमध्ये मोफत शिकवतील.
उदाहरणार्थ : ‘सकाळ’मध्ये काम करणाऱ्या अकाउंट विभागाचे प्रमुख - जे सीए आहेत किंवा खरेदीविभागाचे प्रमुख, मार्केटिंगचे प्रमुख - तुमच्या कॉलेजमध्ये आठवड्यातील काही तास सहजपणे शिकवू शकतील. यामुळे तुम्हाला अनुभवी प्राध्यापक मिळतील आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर सुपरिणाम होईल. ही कल्पना सर्वांना आवडली आणि कामाला सुरुवातही झाली. मी स्वतः या कमिटीच्या सभांना हजर राहत असे.
माझ्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर येणारे अध्यक्ष साहजिकच वेगळ्या विचारांचे असू शकतात, त्यामुळे मी सुरू केलेल्या दोन्ही कमिट्यांना - शिक्षण आणि संरक्षण कमिट्यांना - दुय्यम स्थान दिलं गेलं.
दरम्यान डॉ. निगवेकर विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष झाल्यानं दिल्लीला गेले. त्यांची मुदत संपल्यावर ते मला व अभिजितला भेटायला आले आणि ‘मराठा चेंबर्स’च्या शिक्षण कमिटीचं काम कसं सुरू आहे याची विचारपूस त्यांनी केली. मी अर्थातच त्यांना वस्तुस्थिती आणि माझ्या मर्यादा यांची माहिती दिली.
ते म्हणाले : ‘‘उद्योजकांबरोबर घालवलेल्या वेळेचा मला चांगला उपयोग झाला. खरं म्हणजे, हे देशपातळीवर समजायला हवं. तशी चर्चासत्रं आपण ‘सकाळ’तर्फे शिक्षणसंस्थांमध्ये घडवू या आणि त्यासाठी मी वेळ द्यायला तयार आहे.’’ मला एकंदर संकल्पनेच्या उपयुक्ततेबद्दल खात्री होती; पण यशाबद्दल नव्हती, परंतु आमच्या सर्वांचं एकमत होऊन ‘एज्युकॉन’चा जन्म झाला.
पहिलीच कॉन्फरन्स गोव्यात झाली. त्या वेळचे केंद्रीय शिक्षणमंत्री अर्जुनसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ती अतिशय यशस्वी झाली. मग ‘एज्युकॉन’नं मागं वळून पाहिलंच नाही. यात नंतर परदेशांतील विद्यापीठांशी भेट, संपर्क या गोष्टी सुरू झाल्या आणि उपयुक्तता आणि व्यापकता खूप वाढत गेली. शिक्षणक्षेत्राशी माझा संबंध वाढतच गेला तो आजतागायत!
‘एज्युकॉन’च्या अनुषंगानं जगातील अनेक देशांतील सर्वोत्तम विद्यापीठांबरोबर भेटी, चर्चा झाल्या. शिक्षणक्षेत्रातील लोकांची दृष्टी, विचार, आधुनिक आणि सर्वोत्तम शिक्षणसंस्थांमुळे बदलावी, व्यापक व्हावी, प्रेरणा मिळावी ही उद्दिष्टं प्रामुख्यानं आहेत. शिवाय, त्या सर्वांना भारतातीलच शिक्षणक्षेत्रातील विविध तज्ज्ञांबरोबर चर्चा करणं शक्य झालं आहे.
हेसुद्धा एक शिक्षणच आहे. ‘प्रोफेसर इन प्रॅक्टिस’ ही योजना ‘एज्युकॉन’मुळेच डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी देशभर अमलात आणली. ती माझ्या मते, ‘एज्युकॉन’च्या सिंगापूर इथल्या भेटीनंतरच प्रत्यक्षात आली. यामुळे विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञ शिक्षणसंस्थांशी जोडला जातो. सिंगापूरमध्ये गेलो असताना वेगळाच पैलू लक्षात आला.
तो अगदी छोटासा देश; परंतु विख्यात आंतरराष्ट्रीय कंपन्यांची संशोधनकेंद्रं सिंगापूर विद्यापीठात आहेत. या ठिकाणी उद्योगक्षेत्राला कोणत्या अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे याची चाचपणी केली जाते. त्यानुसार अभ्यासक्रम ठरवला जातो. त्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि करिअरच्या दृष्टीनं जगभरात संधी मिळतात.
भविष्यकाळाची पावलं काय असतील याचा अंदाज ‘एज्युकॉन’मुळे स्पष्ट होत होता. याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हेही महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ‘एज्युकॉन’च्या सातत्यानं आणि वाढत्या प्रतिसादामुळे आमचा हेतू सफल होत आहे याचं मनस्वी समाधान आहे. त्यामुळे पुढील पिढी अधिक सक्षम झाली तर देशभर त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील.
प्रत्येक देशातील, विशेषतः प्रगतशील देशांमधील भेटीगाठींतून त्यांचं देशप्रेम पावलोपावली जाणवतं. आपल्या देशाच्या गरजेसाठी काय आणि कसं करायला हवं हे विचारमंथन अनुभवायला मिळतं. काळाच्या पुढं राहण्याचा अट्टहास तिथं ठायी ठायी दिसत होता. हे सर्व खूप शिकण्यासारखं आहे. आपण जे पटतं, योग्य वाटतं त्यासाठी योगदान द्यावं एवढंच सुचवावंसं वाटतं.
(संपर्कासाठी व्हॉट्सॲप क्रमांक : ८४८४९ ७३६०२)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.