आगुदर पोटाची लढाई जिकु...

चौथीला असताना एका बाईनं मला तिच्या वावरात खत पांगवायचं काम दिलतं. खरं तर सहलीसाठी २५ रुपये मिळतील म्हणून मीच ते उक्तं घेतलं होतं.
मशागत लेख
मशागत लेख Agrowon

देवा झिंजाड

चौथीला असताना एका बाईनं मला तिच्या वावरात खत पांगवायचं काम दिलतं. खरं तर सहलीसाठी २५ रुपये मिळतील म्हणून मीच ते उक्त घेतलं होतं. कारण आई रोज लोकाच्या बांधावर सहलीला जात असल्यानं पोटापुढं सहल महत्त्वाची नव्हतीच. त्यामुळे आईला न सांगता मी हा उद्योग केला होता.

मी आईची नजर चुकवून सकाळीच झाड्याला म्हणून वढ्याला गेलो कि खत पांगवायचो. अक्षरश: पळूपळू काम करत होतो तरी काम संपत नव्हतं. तसाच घामाघूम अंगानं घरी पळत जायचो तेव्हा आईनं एक दिवस विचारलंच, ‘‘एवढा उशीर का रं व्हतोय झाड्याहून याया?’’ मी म्हणायचो, ‘‘अगं आयावडे, मी पोहूनपन आलो गं’’

असा उशीर रोज व्हायला लागल्यावर एक दिवस आई माझ्या मागं-मागं आली पण ती जेव्हा आली तेव्हा मी खत पांगवत नव्हतो तर पाय आपटीत रडत बसलो होतो. मी तिच्या गळ्यातच पडलो. ती काळजीनं म्हणाली ‘‘काय झालं रं?’’ मला काहीतरी चावलं होतं, पण काय चावलंय हे मात्र कळत नव्हतं. तेव्हा ती म्हणाली, ‘‘तू काय करत व्हता रं इथं?’’ मी कण्हलो, ‘‘खत पांगवीत व्हतो!’’ तेव्हा तिनं इचूकाट्याच्या संशयानं आजूबाजूला पाहिलं तर एक काळाटेणा विंचू तिला दिसला. त्याला वहाणेनं ठेचला अन झटकनं डोक्याचं येन्दूरं सोडून माझा पाय गुडघ्याच्याखाली बांधला. पटकन मला मारुतीच्या देवळात आणलं. अन मग पहिल्यांदा नजरेला जो दिसेल तो दगड उचलला. त्याच वजनाचा गूळ गावात वाटायचा असतो, अशी प्रथा होती. थोड्या वेळानं विंचू उतरला खरा पण तिनं काळजीच्या भरात खूप जड दगड उचलला होता. त्याचं वजन केल्यावर दुकानदार म्हणाला, ‘‘६० रुपयाचा गूळ व्हतोय गं पारे.’’ यावर ती म्हणाली, ‘‘द्या मंग’’ तो म्हणाला, ‘‘मंग पैसं द्या?’’ ती म्हणाली, ‘‘उधार मांड.’’ तो खेकसला, ‘‘एवढी कुठं उधारी असती का?’’

आपलं लेकरू तर नीट झालंय अन आता गूळ घ्याया पैसं नाह्यीत अन शेरणी नाही वाटली तर मारुती नाराज होईल, अशा विचारात आईनं तो दगड पुन्हा देवळामागं टाकून कान पकडून माफी मागितली. पण त्यांनतर माफी मागायची वेळ माझी होती. पण अजिबात न रागावता ती एव्हढंच म्हणाली, ‘‘बाळा, आपुनं आदुगर पोटाची लढाई जिकू, आन मंग तू मोठा झाला की कुठंबी जाशील सैलीला.’’

त्यानंतर आईनं सगळं खत एकटीनंच पांगवलं. २५ रुपये मिळाले, पण त्यादिवशी शाळेची सहल माऊलींच्या खांबांजवळ पोहोचली होती, अन गुरुजी सांगत होते, ‘‘इथंच बसून ज्ञानेश्वरी लिहिली.’’ पण मी मात्र त्या सहलीत नव्हतो. मी आईच्या कष्टाचा मंत्र म्हणत गवऱ्या गोळा करायला गायरानात अनवाणी फिरत होतो डोक्यावर घमेलं घेऊन.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com