Monsoon : किमयागार मॉन्सून

गावातले आदिवासी बंधू म्हणतात, “पाऊस येतो तेव्हा सर्वच जिवांची उखरण होते.” उखरण हा किती सुंदर शब्द वापरला त्यांनी. मातीत, दगडात, झाडात जिथे जिथे जिवांचे बीज विखरून असतील ती सर्व मॉन्सून अर्थात पावसाच्या येण्याने जन्म घेतात. माती उकरणे हा शब्दप्रयोग माहीत आहे; पण हीच माती उकरून जीव अस्तित्वात येणे या क्रियेला ‘उखरण’ हा शब्दप्रयोग किती चपखल बसावा.
Monsoon
MonsoonAgrowon

थोडा थांबून, थोडा अनियमित असला तरी शेवटी उशिरा पाऊस बरसला. आतापर्यंत वाळून पाचट बनलेलं गवत दिसेनासं झालं. त्या जागी हिरवे अंकुर दिसू लागले. जिथं म्हणून जागा भेटेल तिथं हिरवं जीवन अंकुरलं. अगदी शहरातल्या रस्त्याच्या कडेनेसुद्धा जिथं माती आहे तिथंही. मस्त हिरवाईने परिसर नटून गेला. आतापर्यंत काजव्यांची जमिनीवर अवतरलेली दुनिया कमी होऊ लागली. तुरळक लख्ख चमकणारे काजवे दिसू लागले. त्यांच्या प्रकाशाची तीव्रता वाढली असली तरी जास्त जमिनीकडे, झाडाच्या खोप्यात किंवा टेकडाच्या मातीत ते आता दिसू लागलेत. इतके दिवस माणसांना चांगलेच नादी लावलेले काजवे बहुदा या वर्षीचा नित्यक्रम उरकून पुढच्या पिढीची तयारी करून गेले असावेत. असे मानले जाते, की नर काजवा मिलनानंतर मरून जातो तर मादी अंडी घातल्यावर मरते. पण मग अजूनही हमखास दिसणारे हे काजवे जिवंत कसे? काजव्यांची ही दुसरी प्रजाती आहे की त्यामागे आणखी काही गुपित? काजव्यांवर अजून संशोधन होण्याची खास गरज आहे.

अजूनही पावसाच्या खूप आठवणी समोर येत आहेत. विशेषतः पावसाच्या सुरुवातीचे हे काही दिवस मला तर खूप अप्रूप वाटतात. आभाळात जसे रंग उधळतात तसेच जीवसृष्टीत अनेक घडामोडी घडत असतात. आपला बाह्य कोलाहल बंद केला की त्या दिसू लागतात.

आम्ही पडवीत बसलो होतो. पाऊस सरीवर सरी याव्यात तसा संथ बरसू लागला. उन्हाळ्यानंतर चांगला झालेला तो पहिलाच पाऊस होता. पडवीच्या समोर पायऱ्यांवर छतावरच्या पागोळ्यांतून पाणी पडू लागले. आणि काय आश्‍चर्य! कुठूनसे दोन अगदी छोटेसे म्हणजे एक सेमी आकाराची बेडके तिथे आले. पहिल्या पावसात माणसं चिंब होत नाचू लागतात, तोंड वर करून पाण्याचे थेंब अंगावर घेतात, तोंडात घेतात, अगदी तसेच हे बेडके पावसात चक्क पाण्याचे थेंब टिपण्यासाठी धडपडत होते. आधीच छोटासा आकार, त्यात त्यांचे तोंड इवलेसे. ते खरेच पावसाचे पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते? त्यासाठी त्यांच्या हालचाली, त्यांचा तो स्वमय नाच पाहणाऱ्याला मुग्ध करणारा होता. बेडकांची ही दुनिया तर खूप मोठी आहे. आजूबाजूला, शेतात, इतकेच काय बाथरूममध्ये देखील विविध आकारांची, रंगांची बेडके पावसाळ्यात दिसू लागतात. शेतात जायला लागल्यापासून तर खूपच वेगवेगळ्या रंगांची बेडके बघितली आहेत. बेडकांचे ‘डराव डराव’ आवाज आले नाही तर पाऊस आलाय असे वाटतच नाही. एखादा पाऊस झाला की लगेचच यांचे गाणे सुरू होते. सुरुवातीला मला प्रश्‍न पडायचा, की पाऊस आला न आला तर लगेच कुठून हे येतात? कारण आमच्या घराच्या समोर मोठी मोकळी जागा आहे. पाऊस पडला की लगेच शेकडो बेडकांचे आवाज एकत्र यावेत, असा त्यांचा आवाज सुरू व्हायचा. नंतर सोसायटीतल्या काही लोकांना इथे असलेल्या गवताचा उगाचच त्रास वाटायला लागला. त्यांनी तणनाशक आणून सगळीकडे फवारणी केली. बेडकांचे काय झाले असेल ते तेच जाणो; पण तेथे उगवलेली ताजी-टवटवीत माठाची फूटभर वाढलेली भाजी त्यानंतर सुकून गेली.

बेडकांचे आवाज शिगेला पोहोचतात तेव्हा त्यांना सोबत असते ती रातकिड्यांची. एरवी रात्रीच येणारा रातकिड्यांचा आवाज दाट कारवीच्या जंगलात दिवसादेखील तेवढाच येतो. गावाकडे पावसाळ्यात असे किड्यांचे किरकिरणे सुरू होते, तेव्हा त्यांना ‘वाजंत्री’ म्हटले जाते. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांत गावातील वाद्य वाजवणारे वाजंत्री येतात. त्यांचे ठरावीक सुरात वाजवणे सुरू झाले की समारंभात उत्साह वाढतो. पण या निसर्गातल्या किरकिऱ्या वाजंत्र्यांचा त्रासच जास्त होतो. रात्री घरात उजेड केला की अनेक छोटाले-मोठाले कीटक प्रकाशावर झेप घेताना दिसतात. अगदी बल्ब बंद करून बसावे, असेच आमच्या अन्नराई या शेतावर होत असते. रात्रीचे बाहेर ओट्यावर येऊन बसले, की हमखास एखादा बेडूक,

काडीकिडा नाहीतर प्रार्थना कीटक दिसणारच. कधी कधी काळा विंचू म्हणजेच इंगळी सुद्धा येते. ती बिचारी धक्का लागला तर आपली तीक्ष्ण दिसणारी नांगी उभारून तयार असते. पण स्वतःहून माणसांच्या मागे पळत चावायला येत नाही. तुम्ही तिला धक्का दिला, तिला इजा केली तरच ती तुम्हाला चावते.

चुकून एखादा पतंग उजेडाच्या आशेने घरात शिरतो. एरवी बाहेर असणारे हे पतंग आपल्याला शोधणे अवघड; पण अशावेळी ते घरात येतातच. असाच एकदा मोठ्या आकाराचा सुंदर टस्सर सिल्क मॉथ घरात आला. यापासून निघणारे तंतू हे साडी बनवण्यासाठी वापरतात, हे ऐकून त्या सुंदर पतंगाची फारच कीव आली. उबेला बसलेले हे पतंग तासन् तास भिंतीला चिकटून बसतात. मागच्याच रविवारी आमच्या एका मैत्रिणीच्या शेतावरच्या घरी राहायला गेलेलो. जुने सागवान, जुन्या घराचे दगड, बांबूचे छप्पर, त्यावर माती आणि मातीत उगवलेले गवत. असे देखणे घर. बहुदा सर्व घटक निसर्गातलेच. अगदी छप्पर सुद्धा बांबूचे बनवलेले. तेथे दारावर अनेक पतंग आपापली जागा पकडून बसलेले. त्यात होता तो आकर्षक, पांढऱ्या रंगाचा आणि सुंदर गोल ठिपके असणारा ‘लुना मॉथ.’ याच भागात मागेही एकदा मी तो पाहिला होता. रात्रीचे थोडे बाहेर निघालो तर रस्त्याच्या मध्यात काहीतरी चमकताना दिसले. थांबून बघितले तर तो ‘ग्लो-वर्म’ नावाचा जीव होता. काजवे जसे प्रकाश सोडतात तसाच हा पार्श्‍वभागावर अर्धवर्तुळाकार चमकत होता. असे प्रकाश सोडणारे मासे, बुरशी, वनस्पती असल्याचे वाचले होते; पण हा ग्लोविंग वर्म पाहायला मिळाला.

गावातले आदिवासी बंधू म्हणतात, “पाऊस येतो तेव्हा सर्वच जिवांची उखरण होते.” उखरण हा किती सुंदर शब्द वापरला त्यांनी. मातीत, दगडात, झाडात जिथे जिथे जिवांचे बीज विखरून असतील ती सर्व मॉन्सून अर्थात पावसाच्या येण्याने जन्म घेतात. माती उकरणे हा शब्दप्रयोग माहीत आहे; पण हीच माती उकरून जीव अस्तित्वात येणे या क्रियेला ‘उखरण’ हा शब्दप्रयोग किती चपखल बसावा.

कुजलेल्या पाला-पाचोळ्यात रंगीबेरंगी इवलेसे भुंगे (बीटल). चकाकत्या निळ्या पंखांच्या सुंदर दिसणाऱ्या माश्या डीन्नीच्या फुलांवर हमखास दिसतात. तिच्या त्या निळ्या रंगाचा परीसारखा एखादा ड्रेस बनवता येईल का? पण छे, ती रंगछटा माणसाला बनवता येणे जमायला हवे.

याच दरम्यान कुजलेल्या झाडाच्या फांदीवर. पालापाचोळ्यात किंवा गवतात, शेताच्या बांधावर अनेक आकर्षक अळंबी दिसू लागतात. यांचे रंग, आकार इतके आकर्षक असतात, की ‘ ये कौन चित्रकार है?' असे आपसूक मनात यावे. ज्यांना आपण कुत्र्याच्या छत्र्या म्हणून ओळखतो, त्या अळंबी निसर्गात मोठे काम करत असतात. यात जशा विषारी अळंबी असतात, तशा काही खाण्यायोग्यदेखील असतात.

हिरव्या डोंगरावर निघाले, की मग सापडू लागतात त्या रानभाज्या. मरून रंगातले वेलीचे कोंब निघालेले दिसले की जरा थांबून पाहावे लागेल. कारण ही चाईची भाजीदेखील असू शकते. मग असे एक एक ठोंब शोधत रानात फिरले की भाजीसाठी मूठभर कोंब जमा होतात. लहान-थोर, पोरं-पोरी सर्व आवडीने बनवून खातात ती ही भाजी. बनवायला सोपी, चवीला एकदम झकास. हळूहळू रानभाज्यांची संख्या वाढू लागते. लुतीची कोवळी लुसलुशीत पाने गोळा करायला स्त्री-पुरुष सर्वच धाव घेतात जंगलात. कारण आता ही भाजी मुबलक असते. एकदा का जून झाली, की निबरून जाते. शिवाय आता काही प्रक्रिया करून वाळवून ठेवली तर वर्षभर बनवता येते. सुकवलेल्या भाजीची चव जरा जास्तच छान लागते. दिवा, बडदा, टाकळा अशा अनेक भाज्या दिसू लागतात, ज्यांचा हमखास आहारात वापर आजही आदिवासी करतात.

पेरलेली रोपे वाढली, की अवणीची लगबग सुरू होते. मग शेतकरी राण्या आणि राजे कामात गढून जातात. मॉन्सून या वर्षातून एकदाच येणाऱ्या काळात अखंड जीवसृष्टी निसर्गाच्या मायेने मोहरून जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com