पांढरा कांदाः अलिबागच्या मातीत मोत्यांची माळ

शंभरहून अधिक वर्षांपासून अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुद्ध बियाणे जतन करून पांढरा कांद्याच्या लागवडीची परंपरा जपली आहे. त्याआधारे अर्थकारण बळकट केलं आहे.
White Onion
White OnionAgrowon

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला (Alibaug's White Onion) भौगोलिक निर्देशांक (जीआय) (GI For White Onion) प्राप्त झाला आहे. मोत्यासारखा पांढरा शुभ्र, मोदकासारखा आकर्षक आकार, गोड स्वाद, औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) युक्त आणि कलाकौशल्यातून वेणीप्रमाणे माळेत केलेली गुंफण अशा वैशिष्ट्यांनी हा कांदा (Onion) नटलेला आहे.

शंभरहून अधिक वर्षांपासून अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुद्ध बियाणे जतन करून पांढरा कांद्याच्या लागवडीची परंपरा जपली आहे. त्याआधारे अर्थकारण बळकट केलं आहे. या कांद्याला जीआय मिळाल्यामुळे देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या कांद्याचं स्थान बळकट होण्यासाठी मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग म्हटलं, की मांडवी जेट्टी, मुरूड- जंजिरा गड आणि एकाहून एक नितांत सुंदर समुद्रकिनारे खुणावू लागतात. पण केवळ पर्यटन केंद्र, रिसॉर्ट, अस्सल कोकणी मत्स्याहार एवढीच अलिबागची ओळख नाही बरं का! देशातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे अलिबागची नवीन ओळख तयार होऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे मोदकाच्या आकाराचा गोड पांढरा कांदा.

अलिबाग शहरालगत असलेलं कार्ले नावाचं छोटं गाव पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. इथले रंजन व सतीश म्हात्रे बंधू या पिकातील मुरब्बी शेतकरी. त्यांचं एकत्रित कुटुंब आहे. त्यांचा दरवर्षी दोन ते अडीच एकर कांदा असतो. या कांद्याविषयी ज्ञान- अनुभवाचा खजिनाच त्यांच्याकडे आहे. सतीश सांगतात, की कुठल्याही कृषी सेवा केंद्रात किंवा बियाणे कंपनीकडे पांढऱ्या कांद्याचं बियाणं तुम्हाला मिळणार नाही. हीच त्याची खासियत आहे. आम्ही अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजोबा-वडिलांच्याही आधीपासून म्हणजे शंभर वर्षांहून अधिक काळ हे पारंपरिक वाण जपले आहे.

White Onion
‘जीआय’ पुढे काय?

घरटी सफेद कांदा

कृषी विभागाच्या माहितीनुसार अलिबाग तालुक्याचे लागवडीखालील एकूण क्षेत्र १४ ते १५ हजार हेक्टर आहे. पैकी पांढऱ्या कांद्याखाली २२० ते २३० हेक्टर क्षेत्र आहे. ते वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बॉम्बे प्रेसिडेन्स- कुलाबा’ गॅझेटच्या सन १८८३ च्या मूळ प्रतीत व सन २००६ च्या ‘ई-बुक’ आवृत्तीत अलिबागमध्ये पांढरा कांदा होत असल्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. तालुक्यातील पाच किलोमीटर परिघातील कार्ले, वाडगाव, तळवली, सागाव, खंडाळा, रुळे, पवेळे, नेऊली अशी सात- आठ गावे पांढऱ्या कांद्याच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. म्हात्रे बंधूंव्यतिरिक्त दयानंद पाटील, स्वप्नील पाटील, विकास पाटील, पंढरीनाथ पाटील, संदीप राऊत, विजय नाईक, जयेश पाटील, रोहिदास कवळे, प्रभाकर नाईक, अविनाश भगत, सतीश पाटील अशी या भागांतील काही ठळक नावं घेता येतील. पांढरा कांदा उत्पादकांची एकूण संख्या सहाशेपेक्षा जास्त आहे. यात कार्ले गाव अग्रस्थानी असून येथे उत्पादकांची संख्या दोनशेपर्यंत असावी. कुणी १० ते १५ गुंठे, तर कुणी अडीच- तीन एकरांत पांढरा कांदा करतो.

White Onion
कृषी सल्ला (पांढरा कांदा, मधुमका, आंबा, काजू, सुपारी)

...अशी होते कांद्याची शेती

लागवडीचे नियोजन सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होते. बी टाकून नर्सरी तयार केली जाते. एक महिन्यात रोपांची पुनर्लागवड होते. सुमारे ९० दिवसांत कांदा पक्व होतो. त्याचे आंतरपीक घेतले जात नाही. काढणीनंतर थेट पुढील खरीप हंगामातच भात घेतला जातो. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. पुढे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्‍न बिकट होतो. मग विहीर व बोअरवेलचीच काय ती साथ मिळते. म्हात्रे यांनी ठिबकवर कांदा घेण्याचा प्रयत्न केला. पण जमिनी काळ्या व खोल आहेत. त्यामुळे पाटपाण्यावरील सिंचन अधिक फायदेशीर ठरते, असा त्यांचा अनुभव आहे. गादीवाफ्यावर लागवड केली जाते. लाल मातीत हा कांदा फारसा चांगला होत नाही. जेवढी थंडी चांगली तेवढा कांदा चांगला पोसतो.

प्रत्येक शेतकरी स्वतःसाठी रब्बीत बीजोत्पादन घेतोच. पुढील मार्च- एप्रिलमध्ये त्याचे बी मिळते. शुद्ध बियाणं तयार व्हावं यासाठी योग्य विलगीकरण अंतरही ठेवलं जातं. पूर्वी यंत्रे, वीज नव्हती. तरीही तेव्हापासून बी काढणी, वाळवणी, मग ते बाटलीत भरून योग्य रित्या जपणे या प्रक्रियेत कुठेही खंड पडता वर्षानुवर्षे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं बियाण्यांचं संवर्धन केलं आहे. त्यात आजपर्यंत कोणतीही भेसळ झालेली नाही. अलीकडील काळात या कांद्याला मागणी वाढल्याने क्षेत्रही वाढलं आहे. पूर्वी वडीलधारी मंडळी १०० वाफे लावायचे. आता तरुण पिढी ५०० वाफे लावते. एकरी दोन ते अडीच किलो बियाणे लागते. बियाणे वजनाला हलके असते. गरजेनुसार शेतकरी बियाण्याची देवाणघेवाणही करतात. ७०० ते ८०० रुपये प्रति शेर असा दर असतो.

माळा बांधण्याचं वैशिष्ट्य

अलिबागच्या कांद्याचं जगात एकमेवाद्वितीय असलेलं वैशिष्ट्य म्हणजे हा कांदा कधीच सुटा विकला न जाता माळेच्या रूपातच विकला जातो. कलाकौशल्य पणास लावून अत्यंत आकर्षक व रचनाबद्ध पद्धतीने ही माळ तयार केली जाते. अनुभवाच्या शिदोरीवर अलिबागचे शेतकरी आणि स्थानिक मजूर त्यात पारंगत झाले आहेत. माळ तयार करणं हे काही एक-दोन दिवसांचं काम नाही. ती संपूर्ण प्रक्रिया आहे आणि तिचं विशिष्ट तंत्र आहे. काढणीनंतर कांदा पंधरा दिवस शेतात वाळवला जातो. ऊन लागून तो हिरवा पडू नये म्हणून त्यावर पात्या पसरवून तो व्यवस्थित झाकला जातो. कांदा हिरवा झालाच तर त्याचे मार्केट खाली आलेच म्हणून समजा. पंधरा दिवसांनी मग कांदा पोत्यात भरून आणला जातो. माळा बांधण्याचं काम पहाटेच सुरू होतं. सकाळी जे दव पडतं त्या ओलाव्यावर लहान मुलींच्या वेण्या बांधाव्यात तशा पाती व त्याच्यासोबतचा कांदा एकमेकांत खुबीने गुंफण्याचं काम केलं जातं. या प्रक्रियेत चूक झाली तर पातीचा तुकडा पडतो. माळ फसते. सुकलेली पाती वापरली तर बांधणी नीट होत नाही.

कांद्याचा गोडवा कशामुळे?

गंधक हा मुख्य घटक असलेले ‘अलिल प्रोफाइल डायसल्फाइड’ हे संयुग कांद्यात असते. म्हणून त्याला तिखटपणा येतो आणि डोळ्यांत पाणी येते. अलिबाग भागातील जमिनींमध्ये गंधकाची कमतरता आहे. त्यामुळेच या मातीतील कांदा गोड लागतो. तिखटपणाशी संबंधित आणखी एक घटक म्हणजे पायरुविक ॲसिड. अलिबागच्या विशेषतः ओल्या कांद्यात त्याचेही प्रमाण कमी असते. साठवणुकीत त्याचे प्रमाण थोडे वाढते. येथील बियाणे व रोपे नेऊन या कांद्याची लागवड रोहे भागात करून बघितली. पण तिथे कांद्याला तिखटपणा आल्याचे आढळले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com