Kolhapur Market Committee Election : कोल्हापुरात बाजार समिती बिनविरोधासाठी युतीच्या प्रस्तावावर आघाडीची बैठक

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजप-शिंदे गटाकडून येणाऱ्या संभाव्य प्रस्तावावर रविवारी जिल्हा बँकेत झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली.
Kolhapur Apmc Election
Kolhapur Apmc ElectionAgrowon

Kolhapur News : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Agriculture Produce Market Committee Election) बिनविरोध करण्याबाबत भाजप-शिंदे गटाकडून येणाऱ्या संभाव्य प्रस्तावावर रविवारी जिल्हा बँकेत झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला आमदार डॉ. विनय कोरे यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास त्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. जागा कमी आणि नेते जास्त अशी परिस्थिती झाली आहे.

यावर दोन दिवसांत पुन्हा सर्वांसोबत चर्चा करण्याचे ठरले. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपबरोबर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भय्या माने यांना सर्वाधिकार देण्यात आले.

Kolhapur Apmc Election
Nashik APMC News : निवडणुकीच्या तोंडावर माजी सभापती विरुद्ध पकड वॉरंट

बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, डॉ. कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भय्या माने, आमदार सतेज पाटील यांच्याकडून शशिकांत खोत व बाबासाहेब चौगले, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीत जागा किती आणि कोणाला किती द्यायच्या यावर प्राथमिक चर्चा झाली. ग्रामपंचायत गटातील ११ जागांवर बहुतांश नेत्यांनी दावा सांगितला आहे. हमाल व तोलाईदार गटातील जागा कोणाला द्यायची, राखीव व महिला गटातील जागांवरून प्राथमिक बैठकीतच पेच निर्माण झाले.

त्याच दरम्यान भाजप व शिंदे गटाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आलेल्या संभाव्य प्रस्तावावर प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर शिंदे गटाचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याशीही चर्चा झाल्याचे समजते.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी २० एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. निवडणुकीसाठी तब्बल ७९३ एवढ्या विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.

जागा कमी आणि सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने भाजप-शिंदे गटासोबत जाताना त्यांना किती जागा द्यायच्या आणि आघाडीला किती जागा घ्यायचा यावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com