Tur: तूर पिकात कशी जपली प्रयोगशीलता?

सन २०१५ पासून तूर हे दिलीप अलोने यांचे खरिपातील (Kharif Crop) मुख्य पीक झाले आहे. काबुली हरभरा, मूग, उन्हाळी तीळ यातही सातत्य आहे.
arhar
arharAgrowon

गणित, मराठी विषयात उच्चशिक्षित पाटण (जि. यवतमाळ) येथील दिलीप अलोने (वय वर्षे ६५) यांनी प्रयोगशीलतेतून शेतीत मास्टरी मिळवली आहे. आंतरपीक, निवड पद्धतीने वाणनिर्मिती, अभ्यास, अनुभवातून उत्तम व्यवस्थापन या जोरावर तुरीची एकरी १४ क्विंटलपर्यंत उत्पादकता साध्य केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी लघुपट, दिंडी या माध्यमातून त्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.

दिलीप अलोने (वय वर्षे ६५) यांची पाटण (ता. झरी, जि. यवतमाळ) येथे १८ एकर शेती आहे.सन २०१५ पासून तूर हे त्यांचे खरिपातील (Kharif Crop) मुख्य पीक झाले आहे. काबुली हरभरा, मूग, उन्हाळी तीळ यातही सातत्य आहे. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने पुढे घरची मुख्य जबाबदारी दिलीप यांच्यावरच आली.

नागपूर येथे एमएससी (गणित) ची पदवी त्यांनी घेतली. सन १९७९ मध्ये गावी परतले. शेतीशिवाय उत्पन्नाचा स्रोत नव्हता. पारंपरिक शेती (Traditional Farming) होती. सिंचनाची वानवा होती. सन १९८० मध्ये विहीर खोदली. शेतीत वेगळे करण्याचा प्रयत्न होता. त्यावेळी कपाशीचे एक संकरित वाण बाजारात आले होते. प्रत्येक ओळीत लाकडी खांब टाकले. कापसाच्या फांद्या सुतळीने बांधून वरच्या बाजूस नेल्या. हा प्रयोग पहिल्यांदाच परिसरात झाल्याने शेतकऱ्यांनी तो पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी कापसाचे (Cotton) एकरी २९ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचे दिलीप सांगतात.

प्रयोगशीलता जपली

नंतरच्या काळात ऊस, कलिंगड, रताळी, भाजीपाला लागवडीतून मातीशी नाळ अधिक घट्ट झाली. प्रयोगशीलता जपताना शिक्षणात खंड पडू दिला नाही. मराठीतून एम.ए. पीएचडी पदवी प्राप्त केली. गावापासून ४० किलोमीटरवरील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. रोजचा प्रवास करीत नोकरी आणि शेती सुरू ठेवली. त्यावेळी अभ्यासातून तूर हे पीक फायदेशीर वाटले. राज्याच्या काही भागांना भेटी देत अधिक उत्पादनक्षम वाण मिळविले.

तुरीचे व्यवस्थापन- ठळक बाबी

-जमीन काळी. दरवर्षी विविध वाण. सुमारे साडेचार एकर क्षेत्र.

-सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांत त्याचे आंतरपीक. सोयाबीनच्या सहा व तुरीची एक ओळ अशी पध्दत. यंदा ८ बाय २ फुटावर लागवड.

-पैसा देणारे पीक असा तुरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. जास्त दाट न पेरता वाढीसाठी आवश्‍यक अंतर ठेवल्यास वाढ चांगली होऊन उत्पादनही चांगले येते हा अनुभव.

-झाड दीड फूट व अडीच फूट झाल्यानंतर अशी दोनवेळी छाटणी. त्यानंतर २०-२०-०- १३ हे खत एकरी ३० किलो प्रमाणात.

-सुमारे ५० देशी गायी. दरवर्षी एकरी दोन ट्रॉली शेणखत.

-तुरीच्या दोन तासांत सरी पाडून पाट पाणी. सप्टेंबर अखेर व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी असतो. त्याचवेळी पीक फुलोरा अवस्थेत राहते. अशावेळी पाणी न दिल्यास उत्पादकतेवर परिणाम होतो.

-अधिकाधिक फुटवे येण्यासाठी बायोस्टिम्युलेंटचा तर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रतिबंधक निंबोळी अर्क वा अन्य जैविक घटकांचा वापर.

-दाणा चांगला भरावा व दर्जा योग्य मिळावा याकरिता पोटॅशची फवारणी. दाणा भरण्याच्या अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात

सरासरी एक ते दीड क्‍विंटलची वाढ शक्‍य असल्याचे दिलीप सांगतात.

उत्पादन, उत्पन्न

-दरवर्षी एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन. एकरी १२ हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च.

-अलीकडील वर्षांत क्विंटलला सातहजार, नऊहजार रुपये दर मिळाले. मागील वर्षीची तूर अलीकडेच ७१०० रुपये दराने विकली.

वाण विकसित केले

सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर तुरीचे निवड पध्दतीने वाण विकसित केले असून एकरी २१ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचा दावा दिलीप यांनी केला आहे. संपदा असे त्याचे नामकरण केले आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंधप्रदेशातून त्यास मागणी आली आहे. नेहमीच्या वाणांपेक्षा हे वाण एक महिना उशिरा पक्व होत असल्याचे दिलीप सांगतात. कर्जत येथील दत्तात्रेय गाढवे यांना या वाणापासून चांगली उत्पादकता मिळाली. त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी आपल्या मुलीचे नामकरण संपदा असे केले आहे. आठपर्यंत दाणे असलेल्या शेंगांचे झाडही शेतात मिळाले आहे. निवड पद्धतीने हे वाणही विकसित करणार असल्याचे दिलीप सांगतात.

शास्त्रज्ञ सल्ला

दरम्यान, शेतकऱ्यांनी निवड पद्धतीने कोणतेही वाण विकसित केले असल्यास कृषी विद्यापीठातील संबंधित विभागाच्या शास्त्रज्ञांना ते दाखवावे. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या त्याची पडताळणी व अभ्यास करणे शक्य होईल असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

दिलीप यांच्या शेतीतील ठळक बाबी

-दरवर्षी काबुली हरभऱ्याचे एकरी १२ क्‍विंटलपर्यंत उत्पादन. एकरी १५ हजार रुपये उत्पादन खर्च. अलीकडील काळात क्विंटलला १०, २०० ते १३ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले.

-चर्चासत्र, मेळाव्यांमधून दिलीप यांचे कार्यक्रम. कमी खर्चात तुरीचे अधिक उत्पादन घेण्याबाबत करतात मार्गदर्शन.

-२००७ मध्ये कृषी विभागाकडून शेतीमित्र पुरस्काराने गौरव.

शेतकऱ्यांचे वाढवले मनोबल

शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दिलीप यांनी गर्भात मातीच्या दिस सोनियाच हा लघुपट तयार केला. तो शासनाच्या मदतीने विविध ठिकाणी दाखवला. तत्कालीन मुख्यमंत्री (कै..) विलासराव देशमुख यांच्या हस्ते या लघुपटाचे विमोचन झाले होते. शेतकरी आत्महत्येच्या पार्श्‍वभूमीवर जनजागरणासाठी २०१६ मध्ये वणी ते दाभाडी ३५० किलोमीटर दिंडीही दिलीप यांनी काढली. त्यांना २०११ चा सांस्कृतिक लोककला पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी काही चित्रपटांमधून कलाकार म्हणून कामही केले आहे. त्यांची दोन मुले डॉक्टर (एमडी व एमएस) असून मुलगी एमडी करीत आहे. पत्नी देवयानी यांनी समर्थ साथ दिलीप यांना आहे.

दिलीप अलोने, ९८२२९२९६२९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com