
ॲग्रोवन वृत्तसेवा ः एकनाथ पवार
सिंधुदुर्गनगरी ः कोवळ्या वयात विद्यार्थ्यांच्या मनात उद्योगशीलतेची बीजे पेरली जावीत या हेतूने एस. के. पाटील शिक्षण संस्था (S. K. Patil Education Institute) गेल्या सहा वर्षांपासून नेरूर माड्याचीवाडी आणि एस. एल. देसाई पाट या दोन विद्यालयांतील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासोबत (Agriculture Education) उद्यमशीलतेचे धडे देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवीत आहे. या विद्यालयांमधून कौशल्याधिष्ठित शिक्षण घेतलेले अनेक तरुण स्वयंरोजगाराच्या (self-employment ) वाटेवर धाडसाने पावले टाकत आहेत.
शासन सध्या कौशल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली राबविण्यावर विचार करीत आहे. परंतु या विचारावर आधारित शिक्षणप्रणाली राबविण्याचा संकल्प सहा-सात वर्षांपूर्वी कुडाळ येथील एस. के. पाटील शिक्षण संस्थेने केला. तत्पूर्वी प्रचलित शिक्षणपद्धतीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी आणि किमान कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यातूनच हा प्रयोग संस्थेच्या नेरूर (ता. कुडाळ) येथील माड्याचीवाडी विद्यालयात राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाकरिता सावली ट्रस्ट, मुंबई यांनी अर्थसाह्य करण्याची हमी दिली. भगीरथ प्रतिष्ठानसह विविध संस्थांनी पूर्णतः सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्यानंतर प्रत्यक्षात या उपक्रमाला सुरुवात झाली.
प्रात्यक्षिकांवर भर; मार्केटिंग स्कीलचा मंत्र
कृषिप्रधान देशात कृषी शिक्षण अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह कृषी शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. शेती करताना जमिनीची मशागत कशी करावी, भाजीपाला लागवड कशी करावी यासह शेतीकरिता पूरक सेंद्रिय खत, कंपोस्ट खतांची स्वंयनिर्मिती कशी करावी, याचे धडे तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मिळू लागले.
पालेभाज्या, भोपळा, भेंडी, गवार, दोडका, पडवळ, वाल, कारली, कोबी, झेंडू, काकडी, मका, भातपीक, फळझाडे लागवड यांसह विविध प्रयोग प्रात्यक्षिकांसह होऊ लागले. लागवड आणि उत्पादन एवढ्यावरच न थांबता संस्थेने विद्यार्थ्यांना मार्केटिंग स्कीलचा मंत्रदेखील शिकविला. हजारो रुपये किमतीचा माल विद्यार्थ्यांनी हातोहात विक्री केला.
त्यातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. शेतीसोबत कुक्कटपालन, मधमाशीपालन, या शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षणदेखील देण्यात येते. रोपवाटिका निर्मितीचे प्रशिक्षणदेखील येथे दिले जाते. त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षणही देण्यात येत आहे. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडे कोणते ना कोणते कौशल्य असावे यासाठी हे धाडसी पाऊल उचलण्यात आले.
अनुभवी प्रशिक्षक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन ः
येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुतारकाम, इलेक्ट्रिक वर्क, वेल्डिंग, इलेक्ट्रॉनिक काम, गवंडीकाम, सेंट्रिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फ्रबिकेटर्स, स्वयंपाक, विणकाम, शिवणकाम, सेंद्रिय खतनिर्मिती, रक्तगट तपासणी असे विविध कौशल्य विकास प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह दिले जाते. अनुभवी प्रशिक्षक, तज्ज्ञ शेतकरी, शिक्षक प्रशिक्षण देतात. शिक्षण घेतलेले विद्यार्थी टिकाऊ लोखंडी शिड्या, कार्यालयीन वापरात येणारे रॅक, स्टॅन्ड बनवितात आणि त्यांची विक्रीदेखील करतात.
नेरूरप्रमाणे या संस्थेमध्ये कला अकादमीसारखा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. दैनंदिन शिक्षणासोबत नृत्य, नाट्य, चित्रकला, रंगकाम यांसह विविध कलांचे शिक्षणदेखील दिले जाते. माड्याचीवाडी विद्यालयात हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी शिक्षक दीपक सामंत, तर पाट विद्यालयात कला अकादमी हा अभिनव उपक्रम राबविण्याची जबाबदारी शिक्षण संदीप साळसकर हे पार पाडतात.
कृषी आणि किमान कौशल्यावर आधारित शिक्षण हे ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. रोजगारक्षम विद्यार्थी घडविणे हाच या उपक्रमामागील हेतू असून, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळाला आहे. हेच या प्रकल्पाचे यश आहे.
- सुधीर ठाकूर, सचिव, एस. के. पाटील शिक्षण संस्था, पाट, ता. कुडाळ
कौशल्य हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. कोवळ्या वयातच विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले, तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची वेळच येणार नाही. माड्याचीवाडी विद्यालयातील कौशल्य विकास उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविला गेला पाहीजे. पेन-वहीसोबत जगण्यासाठी आवश्यक शिक्षण शाळांमधून देण्याची गरज आहे.
- डॉ. प्रसाद देवधर, अध्यक्ष, भगीरथ प्रतिष्ठान, झाराप
* आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांना दिले जाते शिक्षण * आतापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण * शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी सुरू केलेत व्यवसाय * नृत्य, नाट्य, रंगकाम शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शहरात रोजगार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.