
Amravati News : अमरावती जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व कोट्यवधींच्या उलाढालीने विदर्भात दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत अमरावती बाजार समितीवर (Amravati Market Committee) वर्चस्व मिळवण्यासाठी सहकार नेत्यांसोबत आता राजकीय नेतेही उतरल्याने निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.
त्यासाठी महाविकास व शेतकरी पॅनेल गठित झाले आहे. याच दरम्यान सहकार नेत्याच्या नेतृत्वात तिसरे पॅनेलही मैदानात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सहकार व आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा- प्रकाश साबळे यांच्या शेतकरी पॅनेलची घोषणा झाली आहे.
महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलमध्ये उमेदवारही जवळपास निश्चित असले तरी आघाडीतील तीन पक्षांना मात्र समान जागावाटपाचा हा तिढा सुटलेला नाही. सहकार क्षेत्रात काँग्रेसने वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
यशोमती ठाकूर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शिवसेनेच्या प्रीती बंड असून यावेळी माजी खासदार अनंत गुढेही सोबत आले आहेत.
आमदार रवी राणा यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांचे बंधू सुनील राणा यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांना सोबत घेऊन शेतकरी पॅनेल जाहीर केले आहे.
आता भाजपच्या नेत्यांनीही सहकार क्षेत्रात जम बसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी प्रयत्न सुरू केले असून ते आमदार राणांच्या सोबतीने पॅनेलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
एकत्रित लढल्यास विजय मिळवणे सोपे जाते या सूत्राने महाविकास आघाडी एकसंघ राहण्याचा प्रयत्न करीत आहे. तर या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासाठी भाजपप्रणीत आमदार राणा यांच्या शेतकरी पॅनेलची तयारी सुरू आहे.
दोन्ही पॅनलमध्ये सहभागी नेत्यांनी आपापले उमेदवार पुढे दामटले असून जागावाटप करताना चांगलीच कसरत होणार आहे.
तिसऱ्या पॅनेलचा उदय होणार
विलास महल्ले यांचे गेल्या वीस वर्षांपासून अमरावती बाजार समितीवर वर्चस्व आहे. महल्ले गटाने स्वतंत्र पॅनेल गठित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप व राणा गटाकडून त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात येत आहे.
तर महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यांची प्रतीक्षा आहे. दोन्ही पॅनेलमध्ये जागा न मिळाल्यास उमेदवारांसाठी हा तिसरा पर्याय उपलब्ध असला तरी महल्ले गटाकडे उमेदवारांची वानवा नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.