
Kolhapur News : संयुक्त राष्ट्र संघाने भारताच्या मागणीवरून हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ (Millet Year) म्हणून घोषित केले आहे. स्थानिक नाचणी उत्पादकांना याचा लाभ घेता यावा आणि नाचणीची (Ragi) मागणी वाढावी यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत.
याचाच एक भाग म्हणून आता शासकीय कार्यालयांत चहाऐवजी नाचणीचे आंबिल दिले जाणार आहे. याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेखावार म्हणाले, की नाचणी हे पौष्टिक तृणधान्य आहे. समाजात याची मागणी वाढावी म्हणून पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना चहाऐवजी नाचणीचे आंबिल देण्यात यावे, असे सूचविण्यात आले आहे.
याची कोणावरही सक्ती नसेल, मात्र अधिकाधिक लोकांनी हा उपक्रम राबवावा यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. या शिवाय शासकीय कार्यालयात पुष्पगुच्छ भेट देण्यापेक्षा १ किलो नाचणी भेट म्हणून द्यावी, असेही सुचवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद येथे आठवड्यातून एक दिवस नाचणीचे विविध पदार्थ बनवून त्यांची विक्री केली जाणार आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाईल. त्यानंतर हा उपक्रम तालुकास्तरावरही राबवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक हॉटेलमध्ये ‘मिलेट मेन्यू कार्ड’ ठेवले जाईल. तसेच तृणधान्यांची माहिती सांगणारे फलकही येथे ठेवले जातील.
आंगणवाड्यांमध्ये पोषण आहारात नाचणीच्या पदार्थांचा समावेश केला जाणार आहे. रुग्णालयांच्या जेवणातही या पदार्थांचा समावेश केला जावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक रवींद्र पाठक, नाचणी संशोधन प्रकल्पाचे डॉ. योगेश बन, वनिता डोंगरे, आदित्य बेडेकर आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.