
Nagpur Market Committee : विदर्भात शेतीमालासाठी प्रसिद्ध म्हणून नागपूरची बाजार समिती ओळखली जाते. त्याचबरोबर अमरावती बाजार समितीचीही आपली विशेष ओळख आहे. तिच्या नियंत्रणामध्येच फळे- भाजीपाला बाजाराचे संनियंत्रण होते. शहराच्या मध्यवस्तीतच बाजार परिसर असून, क्षेत्रफळ आठ एकर १४ गुंठे आहे.
सन १८७२ पासून ही जागा शासनाकडून कायमपट्ट्याने मिळाली असून, पूर्वी येथे कापूस बाजार भरायचा. त्यामुळे यास जुना कापूस बाजार आवार म्हणून संबोधले जाते. सन १९७८ पासून येथे फळांचे व १९८८ पासून भाजीपाला (बटाटे, कांदे, मिरची व अन्य) यांच्या व्यवहाराला मान्यता देण्यात आली.
सहकार महर्षी (कै.) भाऊसाहेब भोकरे, वीर (कै.) वामनराव जोशी, दादासाहेब खापर्डे, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे या बाजाराच्या उभारणीत मोठे योगदान आहे. अमरावती बाजार समितीचे भातकुली, अमरावती या दोन तालुक्यांत कार्यक्षेत्र विस्तारले आहे. यात २३७ गावे असून फळे- भाजीपाला बाजारात कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या २८ आहे.
बाजारातील सुविधा
-शेतीमाल लिलावासाठी ओटे, सिमेंट काँक्रीट शेड, प्लॅटफॉर्म, अडते दुकाने, गोदाम, बॅंका, शेतकरी भवन, चाळणीची सुविधा.
-शेतकऱ्यांसाठी विनामूल्य एसएमएस सुविधा. त्याद्वारे बाजार दर कळविले जातात.
-बाजार समिती आवाराच्या नियमित स्वच्छतेवर भर. त्यासाठी स्वतंत्र संस्थेची नेमणूक.
-भाजीपाला बाजारात २२५ तर फळ बाजारात अडत्यांची संख्या ९३.
- सात अडते पान विक्री व्यवहारात. खरेदीदार- भाजीपाला ४६, फळे- ३४.
आंब्याची आवक
सध्या बाजारात दशहरी, तोतापुरी, नीलम, बदाम आदी जातीच्या आंब्यांची मोठी आवक आहे. हैदराबाद, तेलंगण भागातून १५ ते २० ट्रक आंबा दररोज येथे आंबा येत असल्याचे व्यापारी शेख जावेद सांगतात. गुजरातहून केसर, कर्नाटकातून हापूसची आवक आहे.
चरकुलस नावाचा आंबाही येतो. प्रति किलो बदाम २५ रुपये, तोतापुरी १५, नीलम २२, दशहरी ५० रुपये असे दर आहेत. येथून विविध भागात किरकोळ विक्रेत्यांकडे आंबा जातो.
भाज्यांची आवक
सध्या कोहळ्यांचा हंगाम सुरू असला तरी जिल्ह्यात त्याचे लागवड क्षेत्र घटल्याने आवक कमी असल्याचे व्यापारी पप्पू खडके व संजय बनकर यांनी सांगितले. धामंत्री (ता. तिवसा) येथील भास्कर पुंडलिक डाखोरे दरवर्षी एक एकरांत कोहळा घेतात. यंदा हे क्षेत्र अर्धा एकर आहे.
त्यांना किलोला १० ते सहा रुपये दर मिळतो आहे. अमरावतीच्या काही भागातून वांगी, ढेमसे, फणस, कांदा आदींची आवक होते. १५ ते १८ किलोच्या प्लॅस्टिक पन्नीतून वांगी विक्रीसाठी आणली जातात. ढेमसे २० रुपये, तर फणस १० ते १२ रुपये प्रति किलो दर आहे.
अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर फणसाची लागवड आहे. तीच फळे विक्रीसाठी येत आहेत. पुदिना उत्पादकांची संख्याही जिल्ह्यात आहे. पाणीपुरी, चिकन बिर्याणी व घरगुती खाद्यान्नात त्याचा वापर वाढला आहे. त्याचीही आवकही नियमित होते. पाच रुपये प्रति गड्डी असा त्याचा दर आहे.
लिंबाची मोठी उलाढाल
अमरावती जिल्हयात नांदगाव खंडेश्वर, परतवाडा, चोर माहूली, नांदगाव पेठ आदी भाग लिंबासाठी प्रसिद्ध आहेत. विदर्भासह देशाच्या विविध भागात येथील लिंबू पाठवला जातो. मे महिन्यात त्याचे दर ५५ ते ६० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठतात.
यंदा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मागणी विस्कळीत झाली. सध्या दर २५ ते ३० रुपयांवर स्थिरावले आहेत असे व्यापारी इमामभाई यांनी सांगितले.
रसवंतीच्या उसाला मागणी
श्री छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून रसवंतीसाठी लागणाऱ्या उसाची दररोज एक गाडी (१२ ते १५ टन) अशी आवक होते अशी माहिती व्यापारी दिलीप वाट यांनी दिली. किरकोळ रसवंतिधारक येथून माल खरेदी करतात. सध्या सहा हजार ते सात हजार रुपये प्रति टनाप्रमाणे विक्री होत आहे.
आवक व उलाढाल
प्रातिनिधिक व निवडक वार्षिक आवक. (क्विंटल)
- कांदा ६७ हजार २६७ क्विंटल, बटाटे ८३,०००, वांगी २६ हजार ५००, कोथिंबीर १७ ,५००, कोहळे १८ हजार, गाजर १३,०००. फळांमध्ये संत्रा ४,६००, मोसंबी ६,०००, डाळिंब ८,१००, आंबा कैरी १९००, लिंबू १०,३००.
- मुख्य आणि उपबाजार आवार मिळून वार्षिक १५ कोटी ९६ लाख ४७ हजार रुपयांची उलाढाल.
-येत्या काळातील प्रस्तावित कामे- ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती. शेतीमालासाठी गोदाम, शीतगृह उभारणी. फुलांच्या बाजारांचे अधिकृतरीत्या नियमन, कापूस, कडधान्यांसाठी प्रक्रिया उद्योग, सौरऊर्जा प्रकल्प, बाजार सुशोभीकरण, प्रशस्तीकरण.
संपर्क - विवेक पटके (बाजार समिती निरीक्षक - ९९७५४३६६५९
प्रवीण पवार, ९४२०७२०१०४, सहसचिव, विभाग प्रमुख
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.