Farmers Issue : कार्यकर्त्याच्या नजरेतून शेतकरी आत्महत्यांचा वेध

Shetkari Aatmhatya : उस्मानाबाद (आता धाराशिव) जिल्ह्यातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यासाठी शिवार हेल्पलाइन ही संकल्पना राबवली. आत्महत्येच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या १९८ शेतकऱ्यांना त्यापासून रोखण्यात यश आले.
Farmers Issue
Farmers IssueAgrowon

Indian Agriculture : कोणाही एका माणसाने आत्महत्या करणे, ही त्यामागील कारण कितीही व्यक्तिगत किंवा वैयक्तिक असले तरी संपूर्ण मानवतेसाठी कलंक असणारी बाब. शेतकरी हाही प्रथम एक माणूसच आहे. त्याच्या एकामागोमाग एक या प्रमाणे होत चाललेल्या आत्महत्या कोणत्याही संवेदनशील माणसाला हेलावून टाकतात.

त्यातही सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आत्महत्येसाठी तो करत असलेली शेती, निसर्गाची अवकृपा आणि एकूण कृषी क्षेत्रासाठी राबवले जाणारी धोरणे कारणीभूत असल्याचे दिसून येते. ही धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश व्यक्ती या आपल्याच समाजातून आलेल्या आणि स्वतःला शेतकऱ्यांची पोरं म्हणविणाऱ्या आहेत, हे विशेष.

त्यामुळे शेतकरी आत्महत्या ही बाब व्यक्तिगत राहत नाही. जर ही समस्या एकूणच समाजाच्या पातळीवर निर्माण होत असेल, तर ती सोडविण्याची जबाबदारी पण संपूर्ण समाजाची असली पाहिजे.

किमान कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने ही जबाबदारी आपली मानली पाहिजे. कृषी पदवीधर झाल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेती समजून घेण्याचा प्रयत्न करताना विनायक हेगाणा यांना या समस्येने आव्हान दिले.

तेव्हाच्या उस्मानाबाद (आता धाराशिव) जिल्ह्यातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यासाठी शिवार हेल्पलाइन ही संकल्पना राबवली. आत्महत्येच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या १९८ शेतकऱ्यांना त्यापासून रोखण्यात यश आले.

राज्यातील १४ जिल्हे, त्यातही मराठवाडा व विदर्भातील ३५० गावांतील सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन, प्रबोधन आणि समुपदेशना करण्यात आले धाराशिव जिल्ह्यातील ७३४ गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू आहे.

Farmers Issue
Farmer Suicide : उपाययोजनानंतरही वाढल्या शेतकरी आत्महत्या

ही बाब एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आत्महत्येमुळे विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात त्या भागातील उस्मानाबादी शेळीपालन आणि तिच्या दुधापासूविविध उत्पादनांच्या निर्मितीला चालना मिळाली.

त्यातून २५० पेक्षा जास्त महिलांच्या जीवनामध्ये आशेचा किरण बघायला मिळाला. अशा प्रकारे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याने घेतलेला हा शेतकरी आत्महत्येचा शोध आणि बोध आपल्यापर्यंत या पुस्तकाच्या स्वरूपात आलेला आहे.

पुस्तकाचे दोन भाग पडतात.

पहिल्या भागामध्ये आत्महत्येचा शोध घेताना एकूणच भारतीय समाजामध्ये शेतकरी कसा शोषित होत गेला, त्याला कारणीभूत असलेले घटक, हरितक्रांती, अर्धवट मुक्त झालेली अर्थव्यवस्था, जागतिकीकरणाचे परिणाम, निविष्ठांवरील खर्चात प्रचंड वाढ होऊनही अनेक कारणांमुळे घटत चाललेले उत्पादन, शासनाचे केवळ ग्राहकांचे हित विचारात घेणारे धोरण अशा अनेक बाबींचा ऊहापोह करण्यात आलेला आहे. या भागाला डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे उद्बोधक प्रस्तावना आहे.

दुसऱ्या भागामध्ये एकूण अभ्यासातून मिळालेल्या बोधातून कशा प्रकारे काम करता येईल, कोणत्या उपाययोजना उपयुक्त ठरतील याविषयी भाष्य करण्यात आले आहे. त्यात नैराश्यापासून सकारात्मक विचारांकडे नेणारी मानसिकता तयार करणे, व्यसनाधीतनेवर उपाय शोधण्याचे प्रयत्न कशा प्रकारे करता येतील ते मांडण्यात आले आहे. या भागाला डॉ. हमीद दाभोलकर यांची प्रस्तावना आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंबंधी संवेदनशील असलेल्या प्रत्येक माणसाने, ग्रामीण भागामध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. एका कार्यकर्त्याचे विचार आणि अनुभव त्यांना अत्यंत महत्त्वाची अशी अंतर्दृष्टी देतील, यात शंका नाही.

शेतकरी आत्महत्या - शोध आणि बोध

लेखक - विनायक हेगाणा

प्रकाशक - भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

पाने - २१६

मूल्य - २५० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com