सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

लाकडी निंबोडी योजनेस प्रशासकीय मंजुरी
सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
IrrigationAgrowon

इंदापूर : तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या ३४८ कोटी ११ लाख इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील १० गावांमधील ४३३७ हेक्टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील ७ गावांमधील २९१३ हेक्टर क्षेत्र असे एकूण ७२५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्यातील दुष्काळी गावातील जिरायती शेती बागायती पिकांखाली येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३४८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आभार मानले आहेत. मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता. यासाठी भरणे यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

लाकडी-निंबोडी ही योजना बारामती व इंदापूर या दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. ही योजना ३० वर्षांपासून रखडली होती. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी योजनेची माहिती घेत ती पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न शासन दरबारी पोहोचविला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात योजनेबाबत संकेत दिले होते. यासाठी प्राथमिक मंजुरीदेखील घेण्याचे काम, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. त्यानंतर आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही, असे कळविले आहे.

शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

लाकडी निंबोडी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले आहे. कुंभारगाव परिसरातून साधारण ७६५ हॉर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडेच्या सीमेवर टाकले जाईल. ६४० हॉर्स पॉवरचे ३ पंप व ५७० हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे या योजनेतून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेती ओलिताखाली येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com