Women Empowerment : ..अन् तिच्यावर पुन्हा 'ओझं' वाहायची वेळ आली

रानाकडं येणारं कुणी दिसत नव्हतं. अंधार जवळ यायला लागला होता. मी धडपा पसरला. काढून ठेवलेल्या गवताचं कवळं आणून त्याच्यावर टाकलं. जाम आवळून ओझं बांधलं.
Grass
GrassAgrowon

कल्पना दुधाळ

रोजच्यासारखं मी गवत काढायला गेले होते. घरून कुणीतरी येईल म्हणून वाट बघत होते. गवत काढता काढता दोन तिनदा उठून वाटंकडं बघीतलं. रोज मीच गवताची ओझी आणते. (Grass)

आज पोराला सुट्टी होती. तो येईल असं वाटत होतं. पण तो आला नाही तरी निदान दुस-या कुणीतरी उचलू लागायला  यावं अशी माझ्या जिवाला आशा होती.

झावळ पडत आली होती. पण रानाकडं येणारं कुणी दिसत नव्हतं. अंधार जवळ यायला लागला होता. मी  धडपा पसरला.

काढून ठेवलेल्या गवताचं कवळं आणून त्याच्यावर टाकलं. जाम आवळून ओझं बांधलं. ढकलत ढकलत कडंला नेलं. लिंबाच्या बुडख्याला टेकवलं. तालीवरनं खाली उतरून  ओझ्याला डोकं दिलं.

लिंबानं ओझ्याला हात दिल्यागत ओझं उचलू लागितलं. ओझं डोक्यावर घेऊन मी झपाझपा घराची वाट उरकू लागले. अंधार माझ्यासोबत घरी आला.

मला अंगणात आलेली बघून गाय हंबरली. ते हंबरणं आनंदाचं होतं. मी ओझं गोठ्यापाशी टाकलं. ओझं सोडलं तसं गवताचे दबलेले वास मोकळे झाले.

एकेक कवळा झटकताना गवताची मूळं धरून आलेली माती, दोनचार ढेकळं इकडंतिकडं पडली. झटकलेला एक कवळा गायीपुढं टाकला.

कान, शेपटी हलवू हलवू गाय गवत खायला लागली. जडावलेली मान हलकी करत मी घरात आले. सगळेजण टीव्ही बघत होते. सगळ्यांना लवकर चहा पाहिजे होता.

मी हातापायावर पाणी घेतलं. चहा उकळायला ठेवला. तांब्याभर पाणी प्यायला घेतलं. सगळ्यांना भूक लागली म्हणून मला लवकर स्वयंपाक करायला  सांगितला.

मी पटापट स्वयंपाक केला. टीव्ही बघता बघता जेवून सगळेजण आपापल्या मार्गी लागले. मला मनातल्या मनात संताप येत होता. आपणच कुठवर मर मर मरायचं, आपल्या कष्टाची कुणालाच जाणीव नाही.

एक झालं की दुसरं काम वाट बघत असतं. रोज ओझी वाहून वाहून मानंचा तुकडा पडायला लागलाय. माझ्या मढ्याला कहारंय सगळा. तरी गवताला जाताना उचलू लागायला या असं सांगून गेल होते...

Grass
अशी करा मारवेल गवताची लागवड ! | Multicut Marvel Grass | ॲग्रोवन

टीव्ही चालूच होता. मी बटण बंद करायला गेले. तर एक बाई गोड आवाजात बोलत होत्या, आपण सगळे आपापलं आयुष्य जगत असतो.

आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. जसे की, आपला जन्म कधी, कुठे व्हावा हे आपल्याला ठरवता येत नाही.

आपण स्री असावं की पुरुष हेही आपल्याला ठरवता येत नाही. अशा आणखीही कितीतरी गोष्टी असतात. पण आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपण ठरवायचं.

आपलं आयुष्य हे आपल्याला ओझं न वाटता आनंदानं जगता आलं पाहिजे. ओझं कुणाला चुकतं? या धरतीच्या डोक्यावर पण ओझं आहेच की. आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमचा आहे.

मनापासून जगा. जगण्याला जीव लावा. आयुष्याकडं सकारात्मकतेने बघा. तक्रारी कधीच संपत नसतात. तक्रारीत गुंतून जाऊ नका.

तुमचा आनंद तुम्ही शोधा. तो कुणीही तुम्हाला देणार नाही. तुम्ही बदला, जग बदलेल. असं बोलून शेवटी गाणं लागलं-

तू खुद को बदल, तू खुद को बदल 

तब ही तो जमाना बदलेगा

मला ते गाणंपण आवडलं. त्या बाईंचं बोलणं पुन्हा पुन्हा कानात घुमत राहिलं. खरंच का आपलं आयुष्य आपल्याला ओझं झालंय ? आपण इतक्या तक्रारी केल्या पण संपल्या का कधी ? रोज कशावरून ना कशावरून आपण वैतागतो, चिडतो.

पण कुणाला काही फरक पडत नाही. बाई सांगत होत्या ते बरोबरच आहे, आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे.

विचाराच्या तंद्रीत घरातलं आवरुन उशिरा मी अंगणात भांडी घासत होते. तिथल्या सिताफळाची एक फांदी खाली वाकली. फांदीनं माझ्या पाठीवर हात फिरवला.

मिटून झोपी गेलेली पानं हळूच जागी होऊन बारीक झुळूक माझ्या अंगावर सोडली. ती झुळूक मला गोड वाटली. गाय बसून रवंथ करता करता माझ्याकडं बघत होती.

पुढचे दोन पाय पसरून त्यावर डोकं ठेवून मोत्या माझ्याशेजारी बसला होता. उंब-यावर बसून मांजर माझं उरकायची वाट बघत होती. मी गोधडी टाकली की मुटकुळा करून मांजरीला रोज माझ्यापाशी झोपायचं असतं.

Grass
Grass Cultivation : सकस चाऱ्यासाठी बहुवार्षिक गवतांची लागवड

मला वाटलं, वेडीच आहे ना मी ! आपला आनंद आपल्या माणसांत, संसारात तर आहेच पण झाडाझुडूपात, मुक्या जिवांतसुद्धा आहे. ज्याची त्याला कामं असतात. आपण आपलं काम करत रहावं.

गोधडीवर पडल्या पडल्या मी माझ्या आयुष्याचा विचार करत होते. लहानपणापासून अशी किती ओझी मी आणली असतील त्याला माप नाही.

पोरीची जात, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे म्हणून आईच्या, आजीच्या हाताखाली हलकीफुलकी कामं करता करता जडापीची कामं करायला शिकले.

हापशाचं पाणी कळशीनं पळूपळू आणून रांजण भरला की सगळे कौतुक करायचे. मग मला अजूनच हुरूप यायचा. एक कळशी आणता आणता मी दोन कळशा आणायला लागले.

घरचे अजून कौतुक करायला लागले. भरलेल्या रांजणात डोकावलं की मीच मला दिसायचे मग विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवून अजून एखादं रिकामं भांडं भरायला मी दुस-या खेपंला जायचे.

नीट चुंभळ करून मग हंडा डोक्यावर आणायला लागले. मग हळूहळू त्या हंड्यावर एक कळशी मांडायला लागले.

मग डोक्यावर हंडा कळशी, एका हातात अजून एक कळशीपण आणता लागली. केसातनं घामाच्या धारा लागायच्या, पाण्यात मिसळायच्या. पण पाणी वाहणं थांबलं नाही.

आईनं गवताचं मोठ्ठं ओझं बांधलं की बारकं ओझं माझ्या डोक्यावर यायचं. मेथीच्या, कोथिंबीरीच्या पेंड्या बांधलेली ओझी मी रानातनं घरी आणायचे. घरून बाजारात पोचवायचे.

सरपणाचं ओझं आणून चुलीपुढं टाकायचे. बारीक हातांनी चुटूचुटू कामं करता करता मोठी कामं कधी हातात आली ते कळालंच नाही. अशी ओझीच ओझी वाहिली. दप्तराचं ओझं मात्र लवकरच उतरलं.

Grass
Animal Care : जनावरांतील गोचीडांचे नियंत्रण कसे कराल?

संसारात पडल्यावर तर कशालाच मागं सरायचं नाही म्हणून जे येईल त्या ओझ्याला डोकं दिलं. कामाची सून मिळाली म्हणून कौतुक झालं.

नऊ महिने लेकरू पोटात वाढवलं ते ओझं वेगळं, लेकराला पाय फुटेपर्यंत त्याची केलेली प्रेमळ उठाठेव वेगळी, बोटाला धरून चालता चालता लेकरांनी मागं पाय रोवलं की त्यांना कडंवर घेऊन वाट उरकतानाचं ओझं वेगळं, दोन्ही हातात दोन जड पिशव्या घेऊन बाजारातून सामान आणतानाचं ओझं वेगळं. अजून किती आठवावीत...

कुस बदलूनही झोप येत नव्हती. माझं मन जागं झालं, म्हणालं माझ्या ओझ्याचा कधी विचार केला का तू ? या अशा दिसणा-या ओझ्यांनी आयुष्यभर सोबत केली.

पण न दिसणारी किती ओझी माझ्यावर असतात त्याचं मोजमाप कोण करणार ? कळत्या वयापासून माझ्यावर ओझीच ओझी आहेत. असं केलं तर कोण काय म्हणेल, तसं केलं तर काय होईल याचाच विचार केला सतत.

सगळ्यांचा विचार करता करता माझा विचार नेहमी लांबून लांबून निघून गेला. नात्यागोत्याची ओढाताण, काही चुकलंमाकलं तर हे असं होईल, ते तसं होईल. हे ओझं कधी उतरणार आहेस तू ?

मी विचार करत होते, परिस्थितीनं, समाजानं लादलेलं ओझं, परकेपणाचं ओझं, आपलेपणाचं ओझं किती फोड करावी या ओझ्यांची तर ओझीच निघतात अजून.

घरातल्या नात्यातले समज, गैरसमज त्यातून होणारी कुचंबणा. सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड.

जाणूनबुजून दिला जाणारा किंवा आपण स्वतः करून घेतलेला मानसिक त्रास.  अशी ओझी पेलून वाकून गेल्यावरही मागच्या आयुष्याचं ओझं.  या सगळ्यातून निखळ मोकळं कधी होणार आहोत  आपण ? 

या जाणिवेनं अस्वस्थ केलं. बास्स, आता ही ओझी उतरायची म्हणजे उतरायचीच असं ठरवून मला कधीतरी डोळा लागला. सकाळी उठले. पारोसं काढायला लागले. मला छान वाटत होतं.

का बरं आज इतकं मस्त मोकळं वाटतंय ? तर  आयुष्य म्हणजे ओझं नाही, हे आठवलं. मोकळं मस्त रहायचं ठरवलेलं आठवून माझ्यात उत्साह आला. कधीपासून हे मन पारोसंचय म्हणत मी एक मोठ्ठा आळस दिला.

सूर्याला हात जोडले तर एक लख्ख किरण थेट माझ्या मनावर जाऊन थांबला. मी कधीच सूर्यकिरण माझ्या अंतःकरणापर्यंत पोचू दिला नाही. बाहेर लख्ख उजेड असूनही मी माझ्या आतल्या उजेडाचा कधी विचारसुद्धा केला नाही.

मग मनावरच्या ओझ्याचा एकेक थर ढिला होऊ लागला.  मोठे मोठे श्वास घेऊन त्या सजग श्वासातला खोल गारवा अनुभवला. आरशासमोर उभी राहिले तर माझं मला हसू आलं. हसताना मी किती छान दिसत होते.

Grass
Animal Feed : दुभत्या जनावराचा आहार कसा असावा?

मग आनंदात स्वयंपाक केला. गरम गरम भाजी भाकरी खाल्ली. बाहेर आले. मला बघून कोंबड्यांनी गलका केला. कोंबड्या माझ्याभोवती गोळा झाल्या. मी ओंजळभर दाणे कोंबड्यांपुढं फिसकारले.

गायीला बादली भरून पाणी ठेवलं. चरचर करत गायीनं पाणी संपवलं. बादलीत अजून पाणी ओतलं. अर्धी बादली संपल्यावर गायीनं तोंड वर काढलं. मी पाण्याची बादली उचलली.

लिंबोणीच्या बुडाला ओतली. तहान लागल्यागत मातीनं पाणी शोषून घेतलं. मला माझंच पोट भरल्यागत वाटलं. दुपारी दळण करायला घेतलं. टुणटुण उड्या मारत दहाबारा चिमण्या आल्या.

पाखडताना सुपातनं उडून पडलेला दाणा दाणा त्या पटकन टिपून घेत होत्या. चोचीत दाणा घेऊन उडून जात होत्या. पिलांच्या चोचीत भरवून पुन्हा उत्साहानं येत होत्या.

मी चिमणी झाल्याचा मला भास झाला. एक मन सांगत होतं, तू मोकळी झाल्यानं सगळ्यांना आनंद होईल असं नाही. दुसरं मन सांगत होतं, कदाचित ते तुला वेड्यात काढतील पण तू तुझा आत्मविश्वास कायम ठेव.

रोज आदळआपट करणारी मी आज गाणं गुणगुणत होते.  कोंबड्यांवर खोड खोड करून खेकसणारी मी आज आनंदानं दाणे टाकत होते. दळण उरकून गवताला आले.

फराफरा गवत काढायला लागले. आज मी कुणाचीच वाट बघणार नव्हते. मला उचलेल एवढं ओझं बांधून घरी आले. बाकीची कामं करत राहिले. छोट्या छोट्या गोष्टी आनंदानं केल्या, मन लावून केल्या की जगणं सुंदर होतं, याचा मी अनुभव घेत होते.

एका साध्या गोष्टीनं आपलं इतकं ओझं कमी केलं याचा आनंद मनात मावत नव्हता. पण आता ही मनाच्या मोकळेपणाची अवस्था टिकवायची जबाबदारी घेताना मन म्हणालं, हा तुझा एकटीचा विचार झाला.

पण असंख्य माणसं आहेत, ज्यांना त्यांच्या ओझ्याची जाणीव नाही. ते ओझ्याखाली दबून जगतात आणि ओझ्यासहित एक दिवस मरून जातात. त्यांचं ओझं उतरवण्यासाठी काय करणारेस तू ? मग वाटलं, फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपण आपलं ओझं उतरण्याचा प्रवास का लिहू नये?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com