आंधळ्याचे काठी लागले आंधळे

आपल्या देशात विवाहसंस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तो एक पवित्र संस्कार मानला जातो.
आंधळ्याचे काठी लागले आंधळे
मशागत लेखAgrowon

जयश्री वाघ

आपल्या देशात विवाहसंस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तो एक पवित्र संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचेच नाही तर दोन कुळांचे मीलन असते. कितीतरी नाती या संस्काराने निर्माण होतात. पूर्वीची लग्ने म्हणजे एका घरापुरती मर्यादित नसत. सगळ्या गावाचा त्यात उत्स्फूर्त सहभाग असे. आजच्या इतके फिल्मी सोहळे तेव्हा नसत. कपडे, दागिने, सजावट, डामडौल यावर मोजकाच खर्च होत असे. पारंपरिक रीतीरिवाज धार्मिक कार्ये यावर कटाक्षाने भर दिला जाई. पंधरा-पंधरा दिवस आधीपासूनच लगीनघर पाहुण्यांनी गजबजून जाई. एकंदरीतच साधेपणा त्यात होता. विवाह ही केवळ उरकण्याची गोष्ट नव्हती, तर ती कमावण्याची आणि निखळ आनंददायी बाब होती.

लग्न ही एकमेव अत्यंत खासगी गोष्ट सार्वजनिकरीत्या केली जाते. आपल्या आनंदात आपल्या आप्तेष्टांना सामील करणे गैर नाही; पण त्यावर होणारा अवास्तव खर्च वधुवरांच्या भावी आयुष्याच्या तरतुदीसाठी अथवा समाजकार्यासाठी वळवता येईल. काळानुसार काही बदल होणे आवश्यक आहेत. तसे पायंडे पडायला हवेत.

आजकाल लॉन्स, कार्यालय किंवा इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यानाच सगळेच तोडून दिले जाते. लाखो रुपयांची उधळण दोन दिवसांतच होते. हौसेला मोल नसते. त्यात प्री-वेडिंग फोटोशूट, संगीत, वधुवरांची ग्रँड एन्ट्री, वैदिकविवाह ऑर्केस्ट्रा यांसारख्या कार्यक्रमांची अजून भर पडली. साखरपुड्याचे सोहळेच इतके मोठे होतात, की आणखी लग्नाचा वेगळा खर्च कशासाठी, हा प्रश्‍न पडावा.

पंगतीत किंवा बुफे पद्धतीच्या जेवणात अगणित पदार्थांची रेलचेल वाढली. नुसत्या नजरेनेच पोट भरून जावं इतके पदार्थ ताटात वाढून घेतले जातात. मोठा प्रमाणावर अन्न वाया जाते. प्रकाश योजना इतकी असते, की त्याचंही प्रदूषण वाटावं. ही कृत्रिम झगमग लवकरच कंटाळा आणते. मोठमोठ्याने गायली जाणारी गाणी त्याकडे कुणाचंही लक्ष नसते. खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातेवाइकांशी धड बोलताही येत नाही इतका गोंगाट आणि गर्दी असते. या असह्य वातावरणातून कधी एकदा बाहेर पडेन असं होतं. बरं लग्नाला येणारी लोकं केवळ उपचार म्हणून हजेरी लावतात. त्यात आस्था असेलच असे नाही. गर्दीचा फुगलेला आकडा चारचौघांत फुशारकीने सांगण्याची अभिमानाची गोष्ट असते. गावकीला आणि भावकीला लक्षात राहील असा विवाह सोहळा घडवून आणण्याची एकमेकांत चढाओढच सुरू असते. त्यासाठी कर्जबाजारी झाले तरी चालते. जमिनीचा तुकडा विकला तरी चालते. तुकाराम महाराज आज असते तर नक्कीच म्हटले असते

आंधळ्याचे काठी लागले आंधळे

घात एकावेळे पुढेमागे।

आंधळ्याच्या काठीला धरून जर इतर आंधळे चालले तर घात तर ठरलेलाच आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com