Breed Society : पशूपैदासकार संघटना ः संवर्धनाचे माध्यम
डॉ. प्रवीण बनकर, डॉ.अमोल पाटील
आपल्या आजूबाजूचे जनावरांचे बाजार आणि हौशी पशुपालकांची माहिती ठेवण्याचा छंदातून समविचारी व प्रगतिशील पशुपालकांचे संपर्क जाळे विणले गेले असते. एखाद्या भागातील पशुधनाचे संवर्धन उत्तमपणे आणि प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर करावयाचे असल्यास असे पशुपालकांचा गट संघटित मार्गाने देशी पशुधन पैदासकार संघटनेच्या ( ब्रीड सोसायटी) (Breed Society) माध्यमातून प्रभावीपणे काम करू शकतात.
देशाच्या विविध भागात रंगरूप, गुणधर्म आणि
उत्पादन क्षमतेचे पशुधन पाहायला मिळते. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, कोंबड्या अशा अनेक प्रवर्गात भिन्न रंगरूप, गुणधर्म आणि उत्पादन क्षमता धारण करणाऱ्या विविध भूभागातील पशुधनाच्या समूहाला आपण ढोबळमानाने जाती असे संबोधतो. काळाच्या ओघात नजीकच्या विविध गुणधर्म धारक दोन जातींच्या पशूंच्या संकारातून मिश्र जाती सुद्धा तयार झाल्या आहेत. यांच्यामध्ये दोन्ही जातींचे गुणधर्म संयुक्तपणे दिसून येतात. अनेकदा पशुपालक समाजाच्या भटक्या जीवनशैलीमुळे शुद्ध जातींचे प्रसार आणि त्यायोगे संकरीकरण घडले. मात्र दिवसेंदिवस शुद्ध गुणधर्म असलेल्या जातिवंत पशुधनाची संख्या कमी होत आहे. सर्वसाधारणतः भारतात आज शुद्ध देशी पशुधनाचा एकूण संख्येच्यादृष्टीने प्रमाण २० टक्के आढळते.
पैदासकार संघटनेचे महत्त्व
जागतिक पातळीचा विचार केल्यास, एकूण गायवर्गीय पशुधन १८ टक्के तर म्हैसवर्गीय पशुधन ५६ टक्के भारतात आहे. देशात गोवंशाच्या ५३ तर म्हशींच्या २० जाती शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासून नोंदविल्या गेल्या आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्याअंतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो (NBAGR), कर्नाल (हरियाना) या संस्थेमार्फत देशी पशुधनाची नोंदणी होते. एखाद्या पशुधनाच्या जातीचा शास्त्रीय अभ्यास करताना त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म जसे रंग, शारीरिक ठेवण, बांधा, बाह्यरूप, उत्पादन आणि प्रजोत्पादन गुणधर्मासह पिढीजात इतिहास या बाबी विचारात घेतल्या जातात.
देशात पशुधनाच्या अनेक जातींचा उगम राजाश्रयातून झालेला दिसतो. पशुकल्याण या भावनेबरोबर आपल्या भागाची वैशिष्ट्यपूर्ण पशुधनाची जात हे अस्मितेचे प्रतीक होते. यासाठी उत्तमोत्तम वळूची निवड व जोपासना केली जात असे.
महाराष्ट्रातील चपळ असणाऱ्या मध्यम बांध्याच्या गवळावू गोवंशाला लष्करी मालाची वाहतूक करण्याच्या उद्देशाने नागपूरकर भोसले राजघराण्याचा आश्रय लाभल्याने विकास झाला. गुजरातमधून चराईसाठी येणाऱ्या गीर गायींचा स्थानिक डोंगरी गायींशी संकर करून अनेक वर्षांपूर्वी देवणी गोवंश विकसित झाला. अमृतमहाल आणि हल्लीकर या दाक्षिणात्य गोवंशातून खिल्लार गोवंश विकसित झाला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या पशुधनावरुन एखाद्या भूभागाची प्रसिद्धी आणि ओळख ही त्या भागातील पशुपालकांसाठी अभिमानाचा विषय बनला, सहकार भावनेतून संबंधित पशुधनाचे संवर्धन करण्याचे प्रयत्नही झाले. अशा पद्धतीने लोकसहभागातून झालेल्या पशुधन संवर्धक संघटनेस आज आपण पैदासकार संघटना म्हणतो. भारतात विविध जातींच्या अशा संघटना पूर्वीपासून कार्यरत आहेत. मात्र, अद्याप देखील अनेक पशुधन जातींना अशा संघटनेतून जोपासण्याची गरज आहे.
गुजरात मधील सहजीवन संघटना किंवा तमिळनाडू राज्यातील सेवा, मदुराई ही संघटना. रात्रीच्या वेळी चराई करणाऱ्या गुजरात मधील प्रसिद्ध बन्नी जातीची ओळख बन्नी म्हैसपालक संघटनेच्या माध्यमातून झाली आहे. केरळ राज्यात नामशेष होत चाललेल्या वेचूर जातीच्या खुज्या आकाराच्या गोवंश संवर्धनासाठी वेचूर संवर्धन ट्रस्ट, केरळ स्थानिक गोपैदासकार संघटना, कासारगौड ड्वार्फ कॉंझर्वेशन सोसायटी आणि वाडकरा गोसंवर्धन ट्रस्ट अशा काही संघटना कार्यरत आहेत. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला या संस्थेने बेरारी शेळी पैदासकार संघटना स्थापनेसाठी स्थानिक शेळीपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.
पशूपैदासकार संघटनेची भूमिका
पशुधनाच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धनासाठी पशुपालक, पैदासकार, शास्त्रज्ञ आणि प्रणालीकर्ते यांच्यात सहसमन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.
विशिष्ट पशुधनाचे संवर्धन
पशुधनाची गुणवैशिष्ट्य ही निवड पद्धतीने पैदास झाली तरच जोपासली जाते. प्रक्षेत्रावर संवर्धन म्हणजे पशुपालकांच्या पुढाकारातून प्रयोगशाळेच्या बाहेर झालेले संवर्धनाचे प्रयत्न. व्यापक अर्थाने संवर्धन करण्यासाठी लोकसहभागाची गरज असते.
पशूपैदासकार संघटनेमध्ये संबंधित पशुधनावर संशोधनाचा अनुभव असलेले शास्त्रज्ञ आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक यांचा समावेश असतो. त्यामुळे एखाद्या भागातील जातिवंत पशुधनास असलेले धोके आणि त्यानुसार करावयाच्या उपाययोजना याबाबत पशुपालकांना समग्र माहितीचा लाभ होवू शकतो.
शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केल्यास संबंधित पशुधनास जोपासण्याची प्रक्रिया सुलभ होते.
संबंधित जातीच्या पशुधनाच्या पशुपालकांचा विकास
सध्या दिसणारे पशुधन हे अनेक वर्षांच्या संबंधित पशुपालक समाजाच्या निरीक्षणपूर्वक प्रयत्नातून जोपासल्याचे फळ आहे. पिढीजात व्यवसाय म्हणून एखादे पशुधन सांभाळणारे पशुपालक खऱ्या अर्थाने त्या जातिवंत पशुधनाचे शिल्पकार असतात. म्हणून त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्यांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून निरसन व्हावे या हेतूने पशू पैदासकार संघटना महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
पशुपालकांना रोजगार, माहितीचे प्रसारण तसेच जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय किंवा बिगर शासकीय योजनांची माहिती आणि आर्थिक मदत या दृष्टीने पशू पैदासकार संघटना उपयुक्त ठरते. पशुधनाचे कल्याण,चारा पाण्याची व्यवस्था, आनुवंशिक सुधारणा, उत्पादन क्षमतेत वाढ, पशुपालक समाजाचा सर्वांगीण विकास या पैलूबरोबर सांस्कृतिक आणि भौगोलिक वारसा म्हणून पैदासकार संघटना महत्त्वाच्या ठरतात.
पैदासकार संघटना स्थापन करण्याची प्रक्रिया
पैदासकार संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीने विशिष्ट पशुधन जात किंवा उपजात आपल्या भागात असणे गरजेचे आहे. याशिवाय सक्रिय आणि उत्साही पशुपालक, पैदासकार (ब्रिडर), विषयतज्ञ (पशुवैद्यकीय अधिकारी), प्रगतिशील शेतकरी, महिला बचत गट यांच्या संयुक्त सहकार्यातून उत्तम दर्जाची संघटना आकाराला येवू शकते.
व्यक्तीगत किंवा संस्थात्मक पातळीवर नजीकच्या शासकीय रजिस्टर कार्यालयात सोसायटी रजिस्ट्रेशन कायद्यांच्या नियम व अटींची पूर्तता करत एखादी व्यक्ति किंवा समूह रीतसर नोंदणी करू शकते. यादृष्टीने संबंधित पशुधनाची जात, संघटनेचे ध्येय धोरणे, कार्यक्षेत्र आणि उद्दिष्ट्ये यांचा मसुदा करणे आवश्यक ठरते. नोंदणी कायद्यांतर्गत नियमावली, सदस्य, कार्यकारी मंडळ तसेच उपक्रमाची माहिती इत्यादीबाबत माहितीचे संयोजन करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनातून बेरारी शेळी पैदासकार संघटना आकाराला येत आहे. देवणी, लाल कंधारी, डांगी गोवंश व इतर पशुधनाच्या पैदासकार संघटनांना तांत्रिक मार्गदर्शन नेहमीच सहाय्यभूत होत आहे.
पशू पैदासकार संघटनेचे फायदे
पशुधन आणि पशुपालक यांचा परस्पर परिचय होतो. कित्येकदा आपल्या गोठ्यातील पशुधनास असलेले नाव पशुपालकास माहिती अभावी ठावूक नसते. अनेकदा आपण गावरान असे नामकरण करून मोकळे होते. मात्र विविध भागात एकाच जातीच्या अनेक उपजाती सुद्धा पाहायला मिळतात जसे, देवणी गोवंशाच्या शेवरा, बाळंक्या आणि वानेरा असोत किंवा नागपुरी म्हशीच्या आर्वी, गौळणी, एलिचपुरी, चांदा/ शाही वगैरे.
वैशिष्ट्यपूर्ण जातिवंत जनावरे ही त्या भागाची शान असतात. जसे, कांकरेज गाय, उस्मानाबादी शेळी. पशुधनावरून एखाद्या गावाची ओळख आणि महत्त्व वाढते.
पशुधनात आणि उत्पादनात होणारी वाढ, प्रचार आणि प्रसार यातून संबंधित पशुपालकांना आर्थिक सुबत्ता लाभते.
पशुपालकांच्या अडचणी संघटितपणे सोडवता येवू शकतात. नेतृत्वाने सामाजिक आणि राजकीय तोडगा काढणे सोयीचे होते.
पशुधनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी घेण्यात येणारे पशुमेळावे, चर्चासत्रे, बाजार, पशुधन सौंदर्य स्पर्धा इत्यादी मार्फत विषय तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त होते. नियोजन प्रक्रियेस लोकसहभाग झाल्याने संवर्धन अधिक बळकटीने करता येते.
- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९
(डॉ.प्रवीण बनकर हे पशू आनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे सहाय्यक प्राध्यापक आणि
डॉ. अमोल पाटील हे पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय,परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.