Anna Karenina : प्रेम कर भिल्लासारखं...

लौकिकार्थानं ज्याला व्यभिचार म्हटलं जातं ती वाकडी वाट माणूस का निवडतो, याचं उत्तर नितिशास्त्र कदाचित देणार नाही. मानसशास्त्र आणि जीवशास्त्र मात्र याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतं. माणूस हा कितीही समाजशील असला तरी शेवटी प्राणीच आहे. त्याच्या जनुकांत मुक्त संबंधाचा हुंकार सातत्यानं गुंजत असतो.
Anna Karenina
Anna KareninaAgrowon

‘प्रत्येक आनंदी कुटुंबाच्या आनंदाची कारणं सारखीच असली तरी प्रत्येक दुःखी कुटुंबाच्या दुःखाची कारण मात्र वेगवेगळी असतात!’

- लिओ टॉलस्टॉय

(प्रख्यात रशियन साहित्यिकाच्या

‘ॲना कॅरेनिना’ या कादंबरीतील एक अवतरण)

जागतिक वाङ्‍मयात रशियन साहित्याचं स्थान अव्वल आहे. फ्योदोर दोस्तोवस्की, लिओ टॉलस्टॉय, अंतोन चेकॉॅव्ह, अलेक्झांडर पुष्कीन, निकोलाई गोगोल ही नुसती नावं घेतली तरी भलेभले कानाच्या पाळीला हात लावतात. आपल्याला अमेरिकेचं, तिथल्या साहित्यिकांचं कोण कौतुक! रशियासारखा खंडप्राय आणि गूढतेचं वलय सांभाळणारा साम्यवादी देश मात्र आपल्या खिजगणतीतही नसतो. हल्ली पुतिनबाबांच्या धसमुसळ्या कारभारानं आणि अरेरावीनं देखण्या लोकांचा हा निसर्गरम्य देश साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतो आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा सर्व प्रांतात लिलया मुशाफिरी करणारे तगडे सारस्वत रशियाच्या मातीत निपजले. त्यांच्या काल आणि पात्ररचनेचा व्यापक पट असलेल्या किमान पाचशे-सहाशे पृष्ठसंख्येच्या भरभक्कम कादंबऱ्या जागतिक साहित्यात अजरामर झाल्या.

Anna Karenina
Sugarcane Transport : ‘ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टरची मोहीम राबवावी’

साहित्य विश्‍वातला अढळ तारा म्हणून लौकिक लाभलेल्या काउंट लिओ टॉलस्टॉयचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी सेंट पीटसबर्गजवळ उमराव घराण्यात झाला. लहानपणीच मातृछत्र हरपल्यानं आलेल्या पोरकेपणानं त्याच्या आयुष्यावर सखोल परिणाम झाला. लिखाणातून युद्धविरोधाचा, शांततेचा, मानवतेचा, नैतिकतेचा पुरस्कार करणाऱ्या टॉलस्टॉयचं आयुष्य मात्र अंतर्विरोधानं भरलेलं होतं. तो छंदीफंदी आयुष्य जगला. जुगार, मद्यपान, मनसोक्त स्त्रीसंग करण्यात त्यानं थोडीही हयगय केली नाही.

अनेक लढायांमध्ये त्यानं भाग घेतला. युद्धातलं क्रौर्य, सामान्य माणसांचं होरपळणं पाहून तो युद्धविरोधी बनला. अखेरपर्यंत त्यानं शांततेचा, अहिंसेचा पुरस्कार केला. महात्मा गांधींनीही त्याची तत्त्वं अनुसरली. सविनय कायदेभंगाचा मंत्र देणाऱ्या हेन्री डेव्हीड थोरोप्रमाणं टॉलस्टायलाही गांधी गुरू मानत. अनुभवाची भरभक्कम शिदोरी गाठीशी असल्यानं टॉलस्टॉयच्या प्रतिभेला सातत्यानं धुमारे फुटायचे. पण आळसामुळं बऱ्याचदा तो लिखाणाकडं दुर्लक्ष करायचा. ‘वॉर अँड पीस’ ही त्याची सगळ्यात गाजलेली कादंबरी. तब्बल १२०० पानांच्या या महाकादंबरीत ५८० व्यक्तिरेखा आणि त्यांच्या परस्पर संबंधाचं चित्रण आहे. जागतिक साहित्य विश्‍वातील पहिल्या दहा कलाकृतीत तिचा समावेश करता येईल, इतकी ती मोलाची आहे.

Anna Karenina
Onion Market : ‘महावितरण’च्या वेळकाढूपणामुळे कांदा उत्पादकांवर संकट

मानवी संबंधांतील बारकावे टिपणारी, नैतिक-अनैतिकतेच्या कल्पनांवर रोकडं भाष्य करणारी ‘ॲना कॅरेनिना’ ही टॉलस्टॉयची तितकीच महत्त्वपूर्ण कादंबरी. प्रेमाचा त्रिकोण आणि त्याची शोकांतिका हा या महाकादंबरीचा विषय आपल्यासाठी तसा जुनापुराणाच, मात्र टॉलस्टॉयच्या परिसस्पर्शानं या कथानकाचं सोनं झालं आहे. रशियातच नव्हे तर जगभरात ती प्रचंड लोकप्रिय ठरली. सुरुवातीला तिचे भाग ‘रशियन हेरॉल्ड’ या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध व्हायचे. त्यासाठी या नियकालिकाचा संपादक काटाकोव्ह यानं टॉलस्टॉयला तब्बल २० हजार रुबल्स ही त्या काळातील भलीभक्कम रक्कम दिली होती. तेव्हा तो लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होता.

हे भाग वाचण्यासाठी लोक उत्सुकतेने ‘रशियन हेरॉल्ड’च्या अंकाची वाट पाहायचे. उमराव घराण्यातील काही स्रिया तर आपल्या नोकरांना छापखान्यात पिटाळून या लेखांकांची मुद्रित प्रुफे मिळवून वाचायच्या. त्यावर सार्वत्रिक चर्चा घडत. पतीला, मुलाला सोडून प्रियकराच्या मागं लागलेल्या ॲनाचं पुढं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. असं अहोभाग्य वाट्याला येणं ही लेखकाच्या दृष्टीनं किती मोलाची गोष्ट. टॉलस्टॉयला मात्र त्याचं फारसं कौतुक नव्हतं. तो साध्या राहणीचा पुरस्कार करायचा. प्रत्यक्षात मात्र तो ऐषआरामी आयुष्य जगला.

Anna Karenina
Chana Sowing : ‘शेतकऱ्यांनी हरभरा पिकास युरिया खताची मात्रा देऊ नये’

त्याच्या दिमतीला नोकर-चाकरांची फौज असायची. कोणत्याही कर्तृत्ववान पुरुषांप्रमाणं त्याला प्रचंड कामेच्छा होती. या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणं त्याला कधी जमलं नाही. परिणामी, त्याच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेली त्याची पत्नी सोफायाला १३ मुलांना जन्म द्यावा लागला, त्यातली आठ जगली. आयुष्यातला सुमारे १० वर्षांचा काळ त्या बिचारीला गर्भारपणात घालवावा लागला. त्यांचं वैवाहिक आयुष्य टॉलस्टॉयच्या मृत्यूपर्यंत टिकलं असलं, तरी ते फारसं सुखाचं नव्हतं. त्याला उभयतांत सातत्यानं होणाऱ्या भांडणांची करकरीत काळी किनार होती. जगण्यातले हे सारे कटू-गोड अनुभव टॉलस्टॉयच्या साहित्यात या ना त्या प्रकारे प्रकटले.

ॲनाची गोष्ट घडते एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, साधारणतः सन १८७० च्या आसपास. अमीर-उमरावांचं प्राबल्य असलेल्या, रूढीप्रिय रशियन समाजातील एका देखण्या तरुणीची ही शोकांत कहाणी. अॅना ही अॅलेक्सी कॅरेनिना या उमरावाची तरुण आणि देखणी पत्नी. श्रीमंत रशियन खानदानात जन्मलेला कॅरेनिना तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा असतो. या लग्नात ती फारशी सुखी नसते. आपल्या मुलावर मात्र ती मनापासून प्रेम करते. आपल्या भावाच्या वैवाहिक जीवनात आलेलं विघ्न दूर करण्यासाठी म्हणून ती सेंट पीटसबर्गहून मॉस्कोला रेल्वेनं जाते.

Anna Karenina
Tur Disease : ‘फायटोप्थोरा ब्लाइट’चा तुरीवर मोठा प्रादुर्भाव

तिथं रेल्वे स्टेशनवर तिची नजरानजर होते ॲलेक्सी व्रोन्स्की या रुबाबदार सैन्य अधिकाऱ्याशी. तोही तिच्या वरताण देखणा. सोनेरी केस, निळे डोळे, रेखीव चेहरा लाभलेल्या व्रोन्स्कीच्या रूपाचा एखाद्या रूपगर्वितेनंही हेवा केला असता. पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते. त्याचीही हालत फारशी वेगळी नसते. साहजिकच एका नृत्याच्या कार्यक्रमात दोघे एकत्र येतात आणि त्यांच्यातील जवळीक वाढतच जाते. मोहाच्या एका क्षणी ते रत होतात. घसरण्याचा क्षण बेसावधपणे माणसाला गाठतो. त्याचं सुरेख वर्णन टॉलस्टॉयनं या कादंबरीत केलं आहे...

‘मला दिवस गेले आहेत. तुमच्या बाळाची मी आई होणार आहे!’ ती म्हणाली; परंतु त्याच्या मुखावरची तिची दृष्टी क्षणभरही ढळली नाही. या बातमीचा तो कसा काय स्वीकार करेल? ती उत्सुकतेनं बघत होती. व्रोन्स्कीचा चेहरा पडला. काहीतरी तो बोलणार; परंतु त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले नाहीत. त्याने मान खाली घातली.

तिला वाटलं, ‘जिंकले,’ तिच्या अडचणी त्याला समजल्या. परंतु स्त्री या दृष्टीने तिला वाटणारे या प्रसंगाचे महत्त्व तो त्या रीतीने समजू शकला नव्हता. त्याला एवढेच समजले होते, की काही तरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नवऱ्याच्या छायेत ॲना फार काळ राहू शकणार नाही आणि ही अवघड, अधांतरी अवस्था संपवलीच पाहिजे. व्रोन्स्कीला तो दिवस आठवला. ज्या दिवशी ॲना सर्वस्वाने त्याची झाली होती. संपूर्णपणे त्याच्या आधीन झाली, तो दिवस, तो क्षण. त्या वेळी तिची झालेली ती दयनीय अवस्था, सोफ्यावरून ती त्याच्या पायाशी कोसळली होती.

Anna Karenina
Cotton Market : कापसाला काय मिळतोय दर?

‘अॅना, ॲना फॉर गॉड सेक -’ तिच्यावर ओणवून तो म्हणाला होता.

‘माय गॉड, फरगिव्ह मी,’ हुंदके देत देत ती शोक करीतच राहिली.

खून केल्यानंतर प्राणविरहित कलेवराकडे बघून एखाद्या खुन्याला जे वाटावं, तसंच काहीतरी तळमळून रडणाऱ्या ॲनाकडे बघून व्रोन्स्कीला वाटत होतं आणि मग खुन्याने त्या प्रेतावर स्वतःला लोटून द्यावं तसाच व्रोन्स्की ॲनावर कोसळला होता आणि त्याने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला होता. काही क्षणानंतर ॲना सावरली होती. व्रोन्स्कीला दूर ढकलत कापणाऱ्या स्वरात त्याला ती म्हणाली होती, ‘सगळं काही संपलंय. तुझ्याशिवाय मला कुणीही उरलं नाही हे लक्षात ठेव.’

ती त्याच्या समोरून दूर झाली होती. तिला वाटले होते, या नवीन नात्यात शिरताना तिच्या मनात जो भावनांचा कल्लोळ उडाला होता - शरम, राग, तिरस्कार, भीती, आनंद तो ती योग्य शब्दातून साकार करू शकणार नाही. तिला वाटलं, उद्या बघू, जरा मन शांत झाल्यावर! परंतु तो उद्या कधीच उजाडला नव्हता. आपल्या हातून हे काय अघटित घडलं आणि पुढे आपलं कसं व्हायचं? याच विचाराच्या चक्रात ती गरगर फिरत राहिली होती. रात्री स्वप्नात जेव्हा ॲनाचे विचार स्थिर असत, तेव्हा तिने स्वतःची करून घेतलेली खरीखुरी अवस्था नागड्या उघड्या स्वरूपात तिच्यासमोर येऊन धीटपणे उभी राहत असे. एका स्वप्नात (जे रोज रात्री तिला पडे) तिला दोन नवरे असत. एक व्रोन्स्की आणि दुसरा - ? आणि दोन्ही तिच्यावर एकदम प्रेम करीत. ते दुःस्वप्न तिला विलक्षण भयभीत करी.

Anna Karenina
Soybean Market : सोयाबीन बाजारात आठवडाभर काय घडलं?

व्रोन्स्कीच्या मोहपाशातून दूर होणं कठीण असल्याची जाणीव ॲनाला होते. पण पती आणि लाडक्या मुलाचं प्रेम तिचे पाय मागे खेचत असतात. शेवटी ती आपल्या गावी परतायचा निर्णय घेते. पण व्रोन्स्की तिचा पाठलाग करत रेल्वेमध्ये दाखल होतो. ती त्याला झिडकारायचा प्रयत्न करते, पण ते तिला जमत नाही. सेंट पीटसबर्गमध्ये तिच्या पतीसमोरही व्रोन्स्की तिचा अनुनय करत राहतो. ॲलेक्सी कॅरेनिनाला दोघांच्या संबंधाचा सुगावा लागतो. त्याला न जुमानता दोघे उघडपणे भेटत राहतात. त्यांच्या संबंधाचा समाजात गवगवा होतो. याच काळात व्रोन्स्कीपासून तिला एक मुलगीही होते. ॲलेक्सी कॅरेनिना ॲनाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती ऐकत नाही.

उलट घटस्फोटाची मागणी करते, त्यानं मुलालाही आपल्याकडं सोपवावं असं तिला वाटत असतं. अलेक्सी कॅरेनिना या दोन्ही गोष्टींना नकार देतो. त्यामुळे ती व्रोन्स्कीबरोबर लग्नाविनाच राहण्याचा निर्णय घेते. पण रूढीप्रिय समाजात व्रोन्स्कीची रखेल म्हणून तिची पदोपदी हेटाळणी होत राहते. त्यातून व्रोन्स्कीचे बाहेर कोणाशी संबंध आहेत की काय, असा संशय तिला यायला लागतो. त्यासाठी ती त्याच्यावर पाळतही ठेवते.

या साऱ्या परिस्थितीमुळं मानसिक संतुलन ढळल्यानं ती शेवटी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्त्या करते. एका तरुण, देखण्या आणि घरंदाज स्त्रीचा अशा प्रकारे अंत व्हावा ही घटनाच धक्कादायक. त्यामुळं ही दुःखान्त कादंबरी लोकांच्या मनात घर करून बसली. रशियातील तत्कालीन समाज रचना, प्रथा-परंपरा, चालीरीती, लोकांचे षौक, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती असा व्यापक पट डझनाहून अधिक प्रमुख पात्रांच्या साह्यानं टॉलस्टॉयनं या कादंबरीत ताकदीनं रेखाटला आहे. त्यामुळं हे पुस्तक आपल्याला वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातं. चित्रदर्शी शैलीमुळं ते आणखी वाचनीय झालं आहे.

ही गोष्ट इथंच संपत नाही. ॲनाच्या मृत्यूमुळं व्रोन्स्की भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो. बाल्कन युद्धात भाग घेण्यासाठी जात असताना रेल्वे स्टेशनवर त्याचा सामना कॉन्स्टँटिन लेव्हीनशी होतो. लेव्हिननं व्रोन्स्कीची पूर्वाश्रमीची प्रेयसी किट्टीशी लग्न केलेलं असतं. शेतीभातीत रमलेल्या या कुटुंबाचा संसार सुखाचा असतो. टॉलस्टॉय केवळ ॲनाची शोकांत प्रेमकहाणी सांगून थांबत नाही. लेव्हीन आणि किट्टीची सफल संसारगाथा सांगून तो चिरस्थायी प्रेमाचं समर्थन करतानाच भ्रमरवृत्तीमुळं घडलेल्या सर्वनाशाकडं मूकपणे अंगुलीनिर्देश करतो. एकनिष्ठता हाच चिरस्थायी गुण असल्याचा संदेश देणारा टॉलस्टॉय प्रत्यक्षात मुक्त लैंगिक आयुष्य जगला, हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा. याउलट त्याची पत्नी सोफाया मात्र डघनभर पोरांना जन्म देत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली.

प्रेम माणसाला उभं करतं, तसं ते आडवंही करू शकतं हे सांगणारी ॲनाची कहाणी चटका लावून जाते. ‘प्रेम कर भिल्लासारखं’ या कवितेत आपले कुसुमाग्रज म्हणतात...

मोरासारखा छाती काढून उभा राहा,

जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा

सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा।

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं।

या कादंबरीची मराठी प्रत मला महत्प्रयासानं मिळाली. ललितागौरी कवली यांनी तीस-बत्तीस वर्षांपूर्वी भाषांतरित केलेल्या या कादंबरीची छायाप्रत अनेक प्रयत्नांनी हाताशी आली. आणखी एका प्रकाशकाने ती मराठीत आणली आहे, पण ती बाजारात कोठे उपलब्ध नाही. आपल्याकडं अनुवादित पुस्तकांचा बाजार सध्या तेजीत असला, तरी रशियन साहित्यातल्या खूप कमी कलाकृती मराठीत अवतरल्या आहेत. दोन-तीन दशकांपूर्वी प्रकाशित झालेली बहुतांश रशियन भाषांतरित पुस्तकं आता बाजारातून गायब झाली आहेत.

‘ॲना कॅरेनिना’ची कहाणी चित्रपट सृष्टीला भुरळ न घालती तरच नवल! या कथानकावर सन १९११ पासून आजवर पंधराच्या वर चित्रपट निघाले. रशियनबरोबरच इंग्लिश आणि विविध युरोपीयन भाषांत ही कहाणी चित्रपटांच्या माध्यमातून पोहोचली. दूरचित्रवाणी मालिका, नाटकं, नृत्य रूपांतरं यांची तर गणतीच नाही. हॉलिवूडमध्ये १९२७ मध्ये निघालेला चित्रपट विशेष गाजला. प्रख्यात अभिनेत्री ग्रेटा गार्बो हिनं त्यात ॲनाची भूमिका साकारली. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दोन शेवट चित्रीत केले गेले, एक शोकांत आणि दुसरा सुखांत. खास अमेरिकन प्रेक्षकांसाठी सुखांत शेवटाची योजना केली होती.

सन २०१२ मध्ये आलेला या कथानकावरचा चित्रपट अधिक प्रभावी ठरला. त्याला आॅस्करसाठी चार नामांकनं मिळाली. पैकी वेशभूषेसाठीच्या आॅस्करवर त्याला मोहोर उठवता आली. इंग्रजीत ‘ॲना कॅरेनिना’ची पंधराहून अधिक भाषांतरं झाली आहेत. शिवाय जगभरातील प्रमुख भाषांत ही कादंबरी पोहोचली आहे. एका महान लेखकाची महान कृती म्हणून जगभर ही महाकादंबरी आजही आपला रुतबा राखून आहे.

लोकहो, लौकिकार्थानं ज्याला व्यभिचार म्हटलं जातं ती वाकडी वाट माणूस का निवडतो, याचं उत्तर नितिशास्त्र कदाचित देणार नाही. मानसशास्त्र आणि जीवशास्त्र मात्र याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतं. माणूस हा कितीही समाजशील असला तरी शेवटी प्राणीच आहे. त्याच्या नैसर्गिक जनुकांत मुक्त संबंधाचा हुंकार सातत्यानं गुंजत असतो. बंधनं त्याला काचत असतात. समाजानं नितिनियम बनवायच्या आधी तो लक्षावधी वर्षं असंच मुक्त आयुष्य जगायचा. विवाह संस्कृती तर अलीकडची, काहीशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली. समाजमान्य असो की अमान्य आपल्या आजूबाजूला हे सारं घडतं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. अर्थात, त्याचं समर्थन करायचं की नाही यासाठी प्रत्येकानं आपापली मोजपट्टी वापरावी. ‘रोटी’ या चित्रपटात राजेश खन्नाच्या तोंडी आनंद बक्षी यांनी लिहिलेलं एक गीत आहे...

यार हमारी बात सुनो, ऐसा इक इंसान चुनो

जिसने पाप ना किया हो, जो पापी ना हो

कोई है चालाक आदमी, कोई सीधा सादा

हममें से हर एक है पापी, थोड़ा कोई ज़्यादा

इस पापन को आज सजा देंगे, मिलकर हम सारे

लेकिन जो पापी न हो, वो पहला पत्थर मारे

असेल असा कोणी चोख आणि हिंमतबहाद्दर तर त्यानं जरूर ॲनाच्या चारित्र्यावर दगड फेकावा. ॲना खरंच चुकली होती. पण ती एकटीच या चुकीला जबादार होती का; तिचा पती, प्रियकर, समाज यांचा या चुकीतला वाटा किती होता, त्याचं माप त्यांच्या पदरात बांधण्याची आपली तयारी आहे का, की पुरुषी वर्चस्व दाखवत तिला एकटीलाच दोषी धरून आपण झोडपणार? हे प्रश्‍न एकांतात स्वतःलाच विचारून पाहा. तरीही नैतिकतेचा किडा वळवळत असेल तर मग खुशाल ॲनाला झोडपा!

वर्षभर चाललेल्या ‘मला भावलेलं पुस्तक’ या लेखमालेतील हा अखेरचा लेखांक.

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com