Indian Agriculture : रोज पहाटे चार वाजता उठतो, ७५ भाकऱ्या थापतो...

आठवड्यापूर्वी माझ्या गावातील वडणगे (ता. करवीर) येथील शहाजी व्हरगे यांच्या गुऱ्हाळघरावर जाण्याचा योग आला. गुऱ्हाळघरावर गुळ तयार करण्याची लगबग सुरु होती. प्रत्येक घाणकरी आपापल्या कामात दंग होते.
Indian Farmer
Indian FarmerAgrowon

भिकाजी चेचर

आठवड्यापूर्वी माझ्या गावातील वडणगे (ता. करवीर) येथील शहाजी व्हरगे यांच्या गुऱ्हाळघरावर जाण्याचा योग आला. गुऱ्हाळघरावर गुळ तयार करण्याची लगबग सुरु होती. प्रत्येक घाणकरी आपापल्या कामात दंग होते.

सहजपणे आडकरी राजू पाटील यांना विचारले, ‘‘काय, जेवला काय?'' ते उद्गागारले, ‘‘नाही. अजून जेवण तयार व्हायचं हाय.'' मी म्हटलं, ‘‘येथून पुढे कधी जेवण करणार? फार वेळ लागत असेल.'' वेळ तशी सायंकाळची होती.

पण पुन्हा विचारले, ‘‘तुम्ही स्वतः जेवण करता काय?'' ते म्हणाले, ‘‘ सावेकरमामा करतात. ती खोप हाय न्हवं का तिकडं.''

मी खोपीकडे बघितलं तर एक वयस्क मामा चुल पेटवण्याच्या तयारीत होते. चिपाडाची जुळवाजुळव चालू होती. मी खोपीजवळ पोहचलो. काय चाललंय मामा, म्हणून विचारलं. ‘‘काय नाही, जेवाण करतोय,'' असं उत्तर आलं.

काय काय करताय, म्हणल्यावर मामा म्हणाले की भाकरी, भात, भाजी, आमटी करतो. तुम्ही काय चांगलं आणि तुमची स्पेशालिटी काय असं विचारल्यावर मामा म्हणाले, ‘‘मी बघा ज्या गड्यासनी बाजरीची भाकरी लागतीया त्यासनी बाजरीची, असं बघा तांदळाची, ज्वारीची, नाचनीची असं च्यार प्रकारच्या भाकऱ्या करतोय .

Indian Farmer
Indian Agriculture : या शेती क्षेत्राचे नक्की काय करायचे?

पहाटे चार वाजता उठायचे. एक, दोन नव्हे तर ७५ भाकरी थापटायच्या. दहा वाजेपर्यंत चोवीस जणांचे जेवण तयार करायचे. पुन्हा सायंकाळच्या जेवणाच्या तयारीला लागायचे. तसे भाकरी थापटणे सोपे काम नाही.

त्यातही ती एकाच धान्याची असेल तर अडचण नाही. चार प्रकारच्या धान्यांच्या भाकऱ्या करायच्या हे नक्कीच अवघड काम. हे काम एखादी महिला करत असेल, असे वाटणे साहजिक आहे. मात्र, ही किमया साधली आहे एका स्वयंपाक्याने. त्यांचे नाव भिमराव विठू सावेकर.

Indian Farmer
Indian Agriculture : शेती व्यवसाय बंधनमुक्त करावा

सावेकर शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रेपैकी हणमंतवाडीचे. गेली पस्तीस वर्षे ते वडणगे (ता. करवीर) येथील शेतकरी शहाजी व्हरगे यांच्या गुऱ्हाळघरावर काम करतात. तेथील फडकरी, आडकरी, घाणकरी यांना जेवण करून देण्याचे काम त्यांच्याकडे आहे.

गुऱ्हाळघरावरील मजुर हे घाणकरी, फडकरी, गुळव्या, आडकरी अशी कामे करतात. उसाच्या फडातील ऊस तोडणे, चुल मारणे, उसाच्या मोळ्या मशिनमध्ये टाकणे, गुळ तयार करणे या प्रक्रियेतील हे मजूर काम करत असतात. हे तसं कष्टाचे काम असल्याने त्यांची वेळेवर जेवणाची सोय व्हावी म्हणूनच त्या टोळीत खास स्वयंपाकी म्हणून सावेकर काम करतात.

सावेकर यांच्या हातच्या जेवणाची चव ही काही औरच असल्याने भात, आमटी, भाजी तेच बनवतात. आणि त्यांची स्पेशालिटी ही भाकरी बनविण्याची आहे. जेवणात गरम-गरम टम्म फुगलेली भाकरी म्हणजे घाणकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

सावेकर यांना दोन मुले आहेत. दोघेही खासगी काम करतात. त्यातून त्यांची पोटापुरती कमाई होते. गावाकडच्या तुटपुंज्या शेतीवर ते पिके घेतात. ही शेती पावसावर अवलंबून असल्याने त्यातून उत्पन्न फारसे मिळत नाही. त्यामुळे सावेकर स्वयंपाकी म्हणून काम करतात. या कामातून त्यांना मिळणारा आनंद मोठा आहे. त्यांचे त्यात कौशल्य आहे. ते मसाल्याशिवाय मटणाचा खुळा रस्साही तितकाच चवदार बनवितात.

(संपर्कः ९८८११२९२३४)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com