आला श्रावण...

श्रावण नव्या वेगळ्या ढंगात आपल्यासमोर येतोय. श्रावण म्हटलं, की भाज्यांची रेलचेल जरा जास्तच वाढू लागते. विशेषतः रंगीबेरंगी अळंब्या म्हणजे मश्रूम या काळात भरपूर उगवतात. गवतभरल्या हिरव्या माळरानावर गवतात अचानक उगवलेल्या या अळंब्या सापडतात. या अळंब्या पौष्टिक तर आहेतच, पण चविष्ट देखील असतात. अळंबीप्रमाणेच निसर्गाचा आणखी एक ठेवा म्हणजे रानभाज्या.
Wild Vegetable
Wild Vegetable Agrowon

श्रावण महिना सुरू झालाय. ऊन-पावसाचा खेळ म्हणजे श्रावण. आज सकाळी उन्हाने कहर केला होता. पावसाळा सुरू आहे तरीही ऊन, दमट हवा, उष्णतेने जीव हैराण झालाय. याआधी असं कधी घडलं नव्हतं. पावसाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात ऊन असायचं. इथे डोंगरात तर सुरवातीचे दोन-अडीच महिने पाऊस नकोसा होईतो असतो. सतत गारव्यात राहून हाडं गोठून जातात. मग आपसुकच शेकोटीच्या उबेला बसावं वाटतं. यंदा ती वेळ कमीच. कारण सूर्य आपल्या किरणांनी चांगलीच शेकोटी पेटवतोय. त्याची ऊब कमी आणि दाहकता जास्त जाणवतेय. इतक्यात दुपारी कुठुनसे ढग जमा झाले आणि रिमझिम पावसाने जोर धरला. अर्धा-पाऊण तास बरसलेल्या या पावसाने भातशेतीला पाणी दिलं.

‘‘उन्हामुळे भात सुकायला लागला होता. पाऊस आला तर जरा पाणी तुंबवलं वावरात,’’ महेश भाऊ सांगत होता. उद्या कड्यावरच्या शेताकडे जाऊन तिथंही पाणी अडवून येतो, असं तो म्हणाला. एरवी या दिवसांत लाल पाण्याचे लोट खळखळून वाहणारे ओढे-नाले, शेतं सगळं काही कोरडे आहेत यंदा. हा बदल पुन्हा नवीन. शेतीचा जुगार काय असतो, याची ही छोटीशी झलक.

चविष्ट, पौष्टिक अळंबी

असा हा श्रावण नव्या वेगळ्या ढंगात आपल्यासमोर येतोय. श्रावण म्हटला की भाज्यांची रेलचेल जरा जास्तच वाढू लागते. विशेषतः रंगीबेरंगी अळंब्या म्हणजे मश्रूम या काळात भरपूर उगवतात. गवतभरल्या हिरव्या माळरानावर गवतात अचानक उगवलेल्या या अळंब्या सापडतात. या अळंब्या पौष्टिक तर आहेतच, पण चविष्ट देखील असतात. काही अळंब्याची माहिती जाणून घेऊ.

- भुईफोड ः जमिनीला गोल आकाराच्या फुग्यासारखा हा भुईफोड येतो. ब्रिटिश गोलाकार बनपाव असावा, अगदी तसा. ही अळंबी चविष्ट असते. अगदी मटनाची भाजी करावी, तशी या अळंबीची भाजी केली जाते.

- सत्तर/छतरा ः कुत्र्याच्या छत्रीसारखी दिसणारी ही अळंबी असते. यामध्ये वेगवेगळ रंग दिसतात. सुंदर, आकर्षक, चमकदार अशी ही सत्तरं भाजी करून किंवा नुसतीच पळसाच्या पानात बांधून आरावर (विस्तवावर) भाजून खाल्ली जातात.

- वारूळाची अळंबीः रिकाम्या जागी, जंगलांत मुंग्यांची अनेक वारुळं बघायला मिळतात. पूर्वी नदीच्या कडेला वारूळ असायचे. तिथे नागपंचमीच्या पूजेसाठी लोक जायचे. गावठाणात अशी मोठी वारुळं कधी दिसलेली आठवत नाही. जंगलभागात मात्र अशी वारुळं भरपूर असतात. श्रावणात या वारूळांच्या मुखांभोवती अळंबी उगवतात. या अळंब्यांचं वैशिष्ट्य म्हणजे वारूळाच्या वरच्या टोकाला त्या उगवतात, त्यापेक्षा आतल्या भागात देखील त्या भरपूर असतात. या अळंबीची भाजी केली जाते. या अळंब्या खास करून श्रावणातच दिसतात.

अळंबीकडे प्रथिनांचा मोठा स्त्रोत म्हणून बघायला पाहिजे. जगभरात वेगवेगळ समूह अनेक खाद्य अळंबी वापरत असतात. खाद्य अळंबींची खूप मोठी विविधता आहे. त्यापैकी अगदी शंभरच्या आसपास अळंबींची लागवड करून त्या उगवता येतात. बाकी अळंबी जिथं पोषक पर्यावरण असेल तिथं जंगल भागात, माळरानावर नैसर्गिकरीत्याच उगवतात.

Wild Vegetable
Wild Vegetable : शाश्वत आरोग्यासाठी रानभाज्या

रानभाज्यांची पर्वणी

अळंबीप्रमाणेच निसर्गाचा आणखी एक ठेवा म्हणजे रानभाज्या. जिथे ओसाड माळरान आहे, पाऊस अगदीच जेमतेम पडतो अशा कोरडवाहू भागात देखील आपल्याला रानभाज्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्यातल्या माझ्या आवडत्या रानभाज्या म्हणजे फांदभाजी किंवा फांजी, कोळूची भाजी आणि शिंदळमाकड. या तिन्ही भाज्या मला प्रचंड आवडतात.

फांदभाजी/फांजीः या वनस्पतीची पानं आपट्याच्या पानांसारखी असतात. गर्द हिरव्या रंगाची पानं, त्याला पांढरी फुलं. ही फुलं पावसाळ्यातच येतात. हा वेल झुडपावर, झाडावर चढलेला दिसतो. वर्षभर याला भरपूर पानं असतात. असं म्हणतात की याचं सोटमूळ जमिनीतीच जिथपर्यंत पाणी असतं, तिथपर्यंत पोहोचतं. याच्या पानाचे मुटके केले जातात. ते खायला एकदम वेगळ्या चवीचे आणि सुंदर लागतात. जंगलात याची दुसरी प्रजाती सापडते. तिचा रंग फिकट पोपटी असतो. शिवाय हे छोटेसे भरगच्च झुडूप असते. दोन्हीही भाज्या चवीला मात्र सारख्याच असतात.

Wild Vegetable
Wild Vegetable : रानभाज्यांची श्रीमंती

कोळू ः ही भाजी कांद्याच्या पातीसारखी दिसते. आम्ही लहानपणापासून कोळूची भाजी खात आलोय. डोंगर भागात ती भरपूर उगवते. स्थानिक आदिवासी ती बाजारात विकायला आणतात. या वनस्पतीला सुंदर पांढऱ्या रंगाचा नाजूक फुलोरा येतो. याचे कंद जमिनीत वर्षभर सुप्त अवस्थेत असतात. थोडी हवा बदलली की पानं फुटतात. त्यामुळे भाजी खाण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीचे काही दिवस महत्त्वाचे. नंतर भाजी निबर झाली की ती खाता येत नाही. या वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार असतात, जसे की देवकोळू, कोळू, सफेद मुसळी, काळी मुसळी इ.

देवकोळूची पानं रुंद व जाडसर असतात. कोरडवाहू तसेच जास्त पाऊस असणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशांत कोळू भाजी सापडते. तर देवकोळू ही जास्त पावसाच्या ठिकाणी डोंगरावर विशेषतः पठारावरच सापडते. कांद्याच्या पातीच्या भाजीप्रमाणे याची भाजी करतात.

शिंदळमाकड ः ही भाजी तशी न्यारी आहे. आंबट, गोड, कडू, तुरट अशा सगळ्या चवींचं मिश्रण या भाजीत आढळतं. ती कोवळी असताना आंबट, गोड असते. तर जसजशी निबर होत जाते तसतशी कडू चव वाढत जाते. छोटी साबर कांडे असावेत तसे याचे झुडूप दिसते. ही भाजी कोवळी कच्ची खाता येते. पित्तनाशक म्हणून काही लोक हिचा रस काढून पितात. पण भाजी खूपच सुंदर होते. जिभेला चव आणणारी ही भाजी ठेचून नुसतीच कांद्यावर परतवून घेतली तरी खायला अप्रतिम लागते.

निसर्गाचा तोल

इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी. कोळू, फांदभाजी, शिंदळमाकड या भाज्या त्यांच्या वस्तिस्थानातच आढळतात. जिथे माणसाने शेती करायला सुरुवात केली, तिथे कदाचित फांदभाजी बांधावर सापडू शकते. परंतु हल्ली शेतकऱ्यांनी बांध न ठेवण्याची प्रथा सुरू केलीय. त्यामुळे बांधावरचे हे वैभव देखील कमी होत चालले आहे. बाकी कोळू व शिंदळमाकड तर शेतात, बांधावर अजिबात दिसत नाहीत. ते फक्त नैसर्गिक अधिवासातच आढळतात.

हल्ली पडीक टेकड्या, माळराने गौण खनिजासाठी विकण्याचा सपाटा सुरू आहे. विकलेल्या टेकड्या सुरुंग लावून किंवा बुलडोझर लावून फोडल्या जातात. त्यामुळे अशा रानभाज्यांची नैसर्गिक वस्तिस्थाने मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. पूर्वी गायी-म्हशींना चरण्यासाठी गायरान, गवताळ टेकड्या राखल्या जायच्या. आता बंदिस्त गायपालन केले जाते. त्यामुळे गवताळ टेकड्यांचे प्रमाण कमी होत आहे. शिवाय शेतीत रासायनिक निविष्ठांचा वापर बेसुमार वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून खाद्य अळंबी उगवण्याचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे. जिथं रासायनिक निविष्ठांचा वापर कमी किंवा अत्यल्प आहे, अशा ठिकाणीच खाद्य अळंबी उगवलेल्या दिसतात. तर जिथं रासायनिक निविष्ठा वापरून नगदी पिकं घेतली जातात, तिथं खाद्यच काय कोणत्याच अळंबी उगवलेल्या दिसत नाहीत.

रानभाज्या, अळंबीची श्रीमंती अनुभवायची असेल, आपला आहार समृध्द करायचा असेल तर निसर्गाचा तोल जपणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com