
Medicinal Plants : पुदिना हे पीक मुळचे युरोप, पश्चिम व मध्य आशिया येथील असून आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेतील समशितोष्ण प्रदेशांत आढळते.ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे.
औषधी गुणधर्म
१) पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. उत्तेजक, वायुनाशी व आकडीरोधक असून पोटदुखी, अर्धशिशी, सांधेदुखी, बद्धकोष्ठ, अतिसार, पोटातील व्रण व सर्दी अशा विकारांवर गुणकारी.
२) पाने स्वयंपाकात स्वादाकरिता वापरतात. पानातून बाष्पनशील मिंट तेल काढून ते सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. पानांपासून मिळवलेल्या तेलात ७० टक्के मेंथॉल असते.
३) चहा, सरबत, जेली, कँडी, सूप आणि आइस्क्रीम यांत पानांचा सुगंध मिसळतात. काही पेयांना सुगंध देण्यासाठी मिंट तेल वापरतात.
४) गांधील माश्या, मुंग्या व झुरळे यांचा नाश करण्यासाठी पुदिन्याचे तेल कीटकनाशकांमध्ये मिसळतात.
पीक व्यवस्थापन
१) चिकणमाती किंवा वालुकामय, निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त खोल जमीन लागवडीसाठी निवडावी. काळ्या आणि लाल दोन्ही प्रकारच्या जमिनीवरही पुदिना लागवड करता येते.
२) जमिनीची नांगरट करून पुरेसे शेणखत मिसळावे.
३) लागवडीसाठी रनर्स वापरले जातात.
४) पावसाळ्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी लागवड करावी. उत्तर भारतात जपानी पुदिना लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करतात.
५) पेरणीपूर्वी मुनवे १० ते १४ सें.मी. लांबीमध्ये कापून घ्यावेत. मुनव्यांची लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. ६० सेंमी अंतराच्या ओळीत ४० सेंमी अंतराने मुनव्यांची लागवड करावी.
६) लागवडीच्या वेळी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. प्रतिहेक्टरी १२५ किलो नत्र, ४५ किलो स्फुरद, ६५ किलो पालाशची आवश्यकता आहे. लागवडीच्या वेळी, स्फुरद आणि पालाश संपूर्णपणे आणि नत्र १/५ भाग मातीत मिसळावे. उर्वरित ४/५ नत्र प्रत्येक कापणीनंतर दोनदा द्यावे.
७) साधारणत: पुदिन्याची वर्षातून २ ते ३ वेळा काढणी केली जाते. पहिली कापणी मे - जूनमध्ये करावी. दुसरी कापणी सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये करावी. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये तिसरी कापणी करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.