Ashadhi Wari : गोलरिंगणाने फेडले डोळ्यांचे पारणे

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अकलूजमध्ये आगमन
Ashadi Wari
Ashadi WariAgrowon

अकलूज, जि. सोलापूर ः

या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ।

गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना।।,

अशी भावना मनी ठेवत ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर अशा उत्साही वातावरणात मंगळवारी (ता.५) अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भव्य गोल रिंगण जणू डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यातील सराटीचा मुक्काम उरकून पालखीसोहळ्याचे सकाळी सोलापूर जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले.

Ashadi Wari
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा

कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर हा वारी सोहळा अनुभवला जात असल्याने वारकऱ्यांमध्ये एक उत्साह आहे. पुणे जिल्ह्यातील सराटीत (ता. इंदापूर) नीरा नदीच्या तीरावर पालखी सोहळ्याचा सोमवारचा मुक्काम होता. मंगळवारी भल्या पहाटेपासूनच पंढरीची ओढ लागल्याने नीरा नदीवर स्नानासाठी वारकऱ्यांचा मेळा जमला. त्यानंतर हळूहळू वारकऱ्यांची पावले अकलूजच्या दिशेने सरकू लागली. सकाळी पालखीतील पादुकांनाही नीरा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर सराटीकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळा अकलूजकडे मार्गस्थ झाला. नीरानदीवरील पूल ओलांडून सोहळ्याने सकाळी सव्वाआठ वाजता जिल्ह्यात प्रवेश केला आणि वेगळाच उत्साह वारकऱ्यांमध्ये दाटून आला.

विठुरायाची पंढरी आता अवघ्या काही अंतरावर आल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पालखीतील पादुकांचे व अश्वपूजन करून सोहळ्याचे स्वागत केले.

रंगला भव्य रिंगण सोहळा

पालखी सोहळ्याच्या स्वागतानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्यातील पहिले भव्य असे गोल रिंगण पार पडले. तत्पूर्वी झेंडेकरी, टाळकरी, पखवाजवादक, तुळशी वृंदावन व कळस घेतलेल्या महिलांच्या स्वतंत्र ओळी लावण्यात आल्या. पखवाज आणि टाळांनी चांगलाच ताल धरला. सर्व दिंड्या प्रांगणात आल्या आणि सर्वांच्या नजरा रिंगणावर खिळल्या. तसे ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’, ज्ञानोबा-तुकारामाचा अखंड जयघोष करत वारकऱ्यांनी रिंगणात धावून प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यांच्यापाठोपाठ विणेकरी, टाळकरी धावू लागले. त्यानंतर मानाच्या अश्वाने एक फेरी पूर्ण केली. स्वाराच्या अश्वाने दोन फेऱ्या पूर्ण केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखीचे सारथ्य

सराटी (ता. इंदापूर) येथून पालखी माळशिरस तालुक्यातील अकलूज हद्दीत आल्यानंतर पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनाने केले. पालखीच्या स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. या वेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com