गर्भाशयाचं संपादन

एका मित्राचे वडील आहेत. सत्तरीच्या पुढचं वय आहे. मित्र शेतकरी कुटुंबातला असला तरी तो केवळ ‘शेतकरी’ नाहीय.
farmer
farmer Agrowon

- बालाजी सुतार

एका मित्राचे वडील आहेत. सत्तरीच्या पुढचं वय आहे. मित्र शेतकरी (Farmer) कुटुंबातला असला तरी तो केवळ ‘शेतकरी’ नाहीय. मुदलात त्याची शेती फारशी नाही आणि त्याने पर्यायी व्यवसाय उभा केलेला आहे. त्यात त्याचं ब-यापैकी भागतं. पण म्हणून त्याचं शेतीकडे ठार दुर्लक्ष आहे असं नाही. रोजगारी लावून तो शेती करून घेतो. शेती फार मोठी नाहीय.

काहीतरी तीनचार एकर असेल. मुळातली जिरायत जमीन. कधीतरी एक बोअर घेतलेला. त्याला पावसाळ्यापुरतंच पाणी असतं, तरीही त्या पाण्याच्या जीवावर मित्र शेतीत काहीबाही करत राहतो. अर्थात त्याच्या कामाचा मुख्य वेळ त्याच्या व्यवसायात जातो. शेतीकडे तो आता दुय्यम व्यवसाय म्हणूनच पाहतो. मित्राच्या वडलांना हे आवडत नाही.

शेतीच्या धंद्यात हातात फार काही लागत नाही, शिल्लक उरण्याची तर गोष्टच सोडा; हे त्यांना चांगलं माहित आहे. त्यांची सबंध हयात शेतीतच गेलेली आहे. आता वय झालेलं असल्यामुळे ते शेतीत राबत नसले तरी शेतीवर त्यांचा जीव आहे. ते अजूनही रोज शेतात जातात. त्यांनी करण्यालायक काही काम नसतंच तिथे.

तरीही जातात. कुठलं तण उपट, कुठले वावरातले बारीकसे दगडगोटे उचलून बांधावर फेक असं त्यांचं चाललेलं असतं.एकदा मी म्हणालो, नाना, आता निवांत घरी आराम करत जावा की. कशाला वावरात फे-या मारून बेजारी करून घेता? नाना म्हणाले, बेजारी कसली आली राजा ह्यात? उलट इथं येत जात राह्यलो तर चार वर्ष जास्त जगेन मी.

farmer
e-crop survey : ई-पीकपाहणी अॅपद्वारे पीक पेऱ्याची नोंद असलेला सातबारा ग्राह्य धरावा

आयुष्य गेलं इथंच ह्या वावरात. इकडं आलो नाही तर चुकल्यासारखं वाटतं मला. आणि घरी बसून तरी काय करू? कुणब्याची माती शेतातच व्हावी गड्या.. त्यानं घरात खाटल्यावर बसून मरू नये. ऐकता ऐकता मी स्तब्ध झालो. जातिवंत कुणब्याचं त्याच्या वावरावर किती विराट प्रेम असतं! ‘गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे..’ - अशा उत्कट शब्दांत वावरावर असलेलं भावोत्कट प्रेम सांगून जाणारे ना. धों. महानोर हे ख्यातकीर्त कवी आणि ‘इकडं आलो नाही तर चुकल्यासारखं वाटतं मला.

कुणब्याची माती शेतातच व्हावी गड्या.. ‘असं म्हणणारा, कवितेशी आयुष्यात कधी संबंध न आलेला हा एक सत्तरीपार सामान्य म्हातारा; या दोघांच्याही खोल खोल मातीत रुजलेल्या रुतलेल्या नाळेत कसं नि काय डावं-उजवं करावं आपण? रान, झाड, शेती, निसर्ग, त्यातलं सुख आणि त्यातल्या वेदना जगत राहून, त्यातल्या अस्मानी-सुलतानीशी मरेस्तोवर झुंजत, झगडत राहणारा

एक अस्सल आणि चिरंतन जीवनप्रवाह शेती आणि तिच्यात राबणारा कुणबी यांच्यातून या भूमीवर पिढ्यानपिढ्या जन्मत, जगत, रहिवास करत आलेला आहे. ही माणसं शेतीला ‘धंदा’ म्हणत नाहीत. धंदा म्हटलं की नफेखोरी करावी लागते. नीतिमत्तेसकट सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पैशाला पैसा जोडत किंवा पैशातून पैसा निर्माण करत केवळ मुर्दाड धंदेवाईक वृत्तीने जगत राहण्याची कला साध्य करावी लागते.

ही कला शंभरातल्या निदान नव्व्याण्णव कुणब्यांकडे नसतेच नसते. हे लोक अजूनही शेतीला जीवनशैली मानतात. ‘जीवनशैली’ हा पुस्तकी शब्द कदाचित त्यांना माहित नसेल, पण या शब्दाचा अर्थ त्यांच्या जगण्यात भिनलेला असतोच. कधीकाळी शहरी कल्पनेतली शेतीतली रोमांटिक सुखं वाचकांना अवर्णनीय वाटत असत.

farmer
Lumpy Skin Disease : मेहकर तालुक्यात वाढतोय ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

त्या सुखांमागचा दाह मागच्या कित्येक दशकांपासून आता नागासारखा फणा उगारून कुणब्याच्या आयुष्यात जहरपेरणी करताना दिसण्याचे हे दिवस आहेत. ‘दु:ख दे अवकाशव्यापी नेत्र माझे, बुब्बुळे जळलीत जळले चंद्र माझे..’ या ना. धों. महानोरांच्याच कवितेतल्या ओळींचा संदर्भ कुणब्याइतका समर्पकपणे दुस-या कुणाच्या जगण्याला लागू करता येईल? या चंद्र जळण्याची काही किंमत असू शकते का?

ही बुब्बुळं जळण्याची भरपाई कोणत्या मोबदल्याने नक्की होऊ शकते? ‘माझं वावर तुम्ही संपादन करून ताब्यात घेतलं आहे, त्याची पैशातली किंमत ही अमुक इतकी आहे, तेवढी तुम्ही मला द्यायला हवी..’ असं म्हणत म्हणत आपल्या रास्त आणि न्याय्य हक्कासाठी एक सत्तरी-ऐंशीतला धर्मा पाटील नावाचा म्हातारा घरात खाटल्यावर पडून राहण्याच्या ऐवजी किंवा थकल्या पावलांनी वावरात जाऊन तिथले खडेगोटे उचलून बांधावर टाकत

निर्भ्रांतपणे आयुष्याची उरली पानं शांतपणे उलटवत राहण्याच्या ऐवजी, रुक्ष कोरड्या आणि निव्वाद पाषाणी काळजांची माणसं बसत असलेल्या मंत्रालयाच्या पाय-या झिजवत राहतो आणि तिथल्या दगडांना कशानेही पाझर फुटत नाही हे लक्षात आल्यावर तिथल्या पत्थरांसमोर कवडीमोल ठरलेला आपला जीव आपल्या हातांनी संपवून टाकतो, तेव्हा त्याला किती असहाय्य, केवढं निराधार वाटलं असेल?

कृषिसंस्कृती ही इथली जीवनशैली आहे असं म्हणत राहून, त्या शैलीने इथल्या कोट्यावधी अश्राप माणसांच्या आयुष्यात पेरलेल्या डू:खाचं उदात्तीकरण करत स्वत: मात्र केवळ सत्तेच्या गुबगुबीत खुर्च्या उबवत बसलेल्या नेत्यांपासून नोकरशहांपर्यंतचा प्रत्येकजण धर्मा पाटलांचा मारेकरी आहे. ज्या कागदी नोटांसाठी धर्मा पाटलांनी प्राण पणाला लावले त्या नोटा आता त्यांना दिल्या जाणार असल्याचं वृत्त अगदी कालच्या वृत्तपत्रांतून आलं आहे.

farmer
Crop Damage : अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी पन्नास कोटींची मागणी

या नोटा कदाचित धर्मा पाटलांना हव्या होत्या त्याहून अधिकही असण्याची शक्यता आहे. अठ्ठेचाळीस लाख एकोणसाठ हजर सातशे चौपन्न रुपयांच्या नोटांचं सानुग्रह अनुदान आता त्यांना दिलं जाईल असं सबंधित कुणीतरी जाहीर केलं आहे. ही रक्कम जर धर्मा पाटलांच्या जीवाचं मोल म्हणून किंवा त्यांना फुकापासरी जीव गमवावा लागल्याच्या टोचणीतून किंवा ही अमुक एवढी रक्कम त्यांच्या वारसांना दिली म्हणजे आपण त्यांच्या हत्येच्या पातकातून मुक्त होऊ अशा पश्चातबुद्धीने त्यांना दिली जाणार.

असेल तर धर्मा पाटलांच्या बलिदानाला कितपत अर्थ उरतो?माणूस मेल्यावरच त्याची दखल घेणारी कसली उलट्या काळजाची यंत्रणा कार्यरत आहे इथे? नक्की केवढी रक्कम दिली तर व्यवस्थेचा बळी ठरलेल्या एखाद्या माणसाच्या हतबल आत्मनाशाची किंमत पुरेपूर वसूल झाली असं म्हणता येईल? मुदलात वावर हा केवळ जमिनीचा तुकडा नसतो.

ते आणखी काहीतरी वेगळं प्राणतत्व असतं, हे कधी कळणार आहे की नाही सरकारला किंवा तलाठ्यापासून मंत्रालयात बसलेल्या सचिवापर्यंतच्या सरकारी नोकरांना? केशव खटिंग या कविमित्राच्या एका कवितेत हे प्राणतत्व फार नेमक्या शब्दांत येऊन गेलं आहे - “तुम्ही वावर घेताय म्हणजे नुसतं वावर घेताय का?

वावर म्हणजे नुसती जमीन, नुसतं लँड नाही हो सरकार, माझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलय, इतिहासय, सगळी शास्त्रं-पुराणं, सगळं सगळंय हो, दुर्बिनीनं नका बघू, माझ्या नजरेनं बघा ना, नजरेच्या एका टप्प्यात अख्खं वावर मला गर्भाशयासारखं दिसतं मायीच्या, अन तुम्ही अचानक संपादन करणार या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या गर्भाशयाचं?” वावर म्हणजे नुसती जमीन नसते. ते मागच्यापुढच्या हजार पिढ्यांचं गर्भाशय असतं. सत्तेच्या पाळण्यातच जन्म घेतलेल्या लोकांच्या हे लक्षातयेईल कधी?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com