Kalpna Dhudhal Article : बीज वाढे बीजापोटी 

गेल्या वर्षीचा थापच्या थाप भुईमूग अजून डोळ्यापुढं दिसतोय. पाणी, खुरपणी वेळच्या वेळी झाली होती. शेंगा काढताना भारी उल्हास वाटत होता. भूईमूग उपटायलापण हलका जात होता. त्याच्यामुळं कणाकणा उपटून आपापल्या सा-यात ढीग घालून ठेवलं की बसून आपलं सरासरा तोडायचं, हातानं पिरगाळलं तरी तोडणं उरकायचं.
Women Farmer
Women FarmerAgrowon

- कल्पना दुधाळ

उन्हाळी भुईमूग पेरायचाय म्हणून आम्ही बाया शेंगा फोडतोय.  गेल्यावर्षीच्या उपट्या तिनदाणी  शेंगा घोळून, चांगल्या वाळवून पोती भरून ठेवल्या होत्या. यंत्रानं शेंगा भरडणं  उरकतं खरं पण शेंगदाणं उगवायला मार खातेत. म्हणून आम्ही हातानं फोडतोय. पेरणीसाठी ठोकाळ शेंगदाणं निवडून काढतोय. फोडताना फाकळ्या झालेलं शेंगदाणं, सुरकुतलेलं,  बारीकसारीक वेगळं काढतोय.

गेल्या वर्षीचा थापच्या थाप  भुईमूग अजून डोळ्यापुढं दिसतोय. पाणी, खुरपणी वेळच्या वेळी झाली होती. शेंगा काढताना भारी उल्हास वाटत होता. भूईमूग उपटायलापण हलका जात होता.  त्याच्यामुळं कणाकणा उपटून आपापल्या सा-यात ढीग घालून ठेवलं की बसून आपलं सरासरा तोडायचं, हातानं पिरगाळलं तरी तोडणं उरकायचं. निपाळीच्या  रानातला एकेक टगळा उपटून नुसता झटकला की खळाखळा माती गळून पडायची. एकाएका टगळ्याला चांगल्या ओंजळ, दोन ओंजळी शेंगा निघायच्या.  टपोऱ्याच्या टपोऱ्या घुंगरासारख्या शेंगानी लगेचच पाटीभर शेंगा व्हायच्या. जरा खालीवर घोळसल्या तर उरलीसुरली माती पडून पांढऱ्याफेक शेंगा निघायच्या. कुठंतरी कवळी शेंग नायतर सगळं निब्बार शेंगदाणं. कोवळं गुलाबी शेंगदाणं चवीलापण चवदार लागायचं. आम्ही घरच्याघरी खायला तर लवकरच सुरुवात केली होती. उकडून, भाजून खायला तडाका लावला होता. कुठंतरी एखादी शेंग उगवलेली घावायला लागली मग मात्र भुईमूग काढायची घाई करायला लागली होती. शेंगा काढायला दोघीजणींला सांगितलं तर चौघीजणी यायच्या. ओल्या शेंगाचा पाव्हण्यारावळ्यांला वानवळा दिला.बाजारला नेल्या. वाळवून वर्षभर घरी खायला ठेवल्या, पेरायला ठेवल्या.

आत्ता शेंगा फोडता फोडता असं वाटतंय की एका शेंगदाण्याच्या ह्या इतक्या शेंगा होतेत. ह्यातल्या एकेकाच्या इतक्या धरल्या तर किती होतील ? माझ्या डोळ्यापुढं शेंगाचा मोठाच्या मोठा ढीग दिसायला लागला. असं वाटतंय की मातीचं पापुद्रं अलगद उचलून सपताळ भुईमूग उगवायला लागलाय. कुठं दाट नाय का पातळ नाय.  मी हळूच एखादा पापुद्रा उचलून बघतेय तर तपकिरी टरफल उकलून शेंगदाण्याच्या पांढऱ्या पाकळ्या हिरवट झाल्यात. मधला वाकलेला कोंब लुसलुशीत पोपटी होऊन मातीतनं उभं रहायला बघतोय. तान्हं बाळ कसं आईला ओळखत बारीक हुंकार देतंय तसा कोंब खाली मुळ्या फोडून मातीसंगं बोलायला बघतोय. असा अंकुर आधीपास्नंच बियाच्या पोटात असतोय. तेव्हा त्याचं हिरवं रुपडं दिसत नाय कुणाला. पण त्याला त्याचं रुप  माहीत असतं म्हणून ते आपलं बीमधे मुरलेलं असतं. माती, पाण्याचा मेळ बसून एकदा का अंकुर बाहेर पडला की त्याची वाढ चालू झाली म्हणायची. खरंतर बीमधेच पानं, फूलं, फळं आणिक पुन्हा बी असं सगळं असतं. बी पास्नं बी पतोर एक चक्रच असतं म्हणा की. आपल्या  तुकोबांचे कितीतरी  अभंग बीभोवती फिरतेत- 

तरूवर बीजापोटी। बीज तरूवरा शेवटी ।

फळ तेची बीज, बीज तेची फळ । उपनावे न पालटे  ।

बीज नेले तेथे येईल अंकुर ।जतन ते सार करा याची ।

माझ्या मनात एकीकडं तुकोबाचे अभंग आन् दुसरीकडं हातानं टचाटचा शेंगा फोडणं चालूय. शेंगदाण्यानं मूठ भरली की मी पाटीत टाकतेय. मुठीमागणं मुठी पाटीत पडतेत. टरफलांचा ढीग मागं सरतोय. शेंगांची गोणी मधी वतून असं शेजारी शेजारीच आम्ही सगळ्याजणी शेंगा फोडायला बसलोय. कुणी काय, कुणी काय आपलं सांगतंय, बोलतंय. जरावेळानं माझ्या लक्षात आलं की माझ्या शेजारची  मंदाबाय शेंगा फोडता फोडता चांगलं ठोकाळ शेंगदाणं दिसलं की तोंडात टाकतेय. एकदा झालं, दोनदा झालं. तिनदा झालं. तिचं तोंड सारखं चालूच होतं.  म्हणलं,

Women Farmer
Wheat Sowing : उशिरा गहू पेरणीचे नियोजन

 का ग मंदाबाय, बारकं शेंगदाणं चावत नायत का काय तुला ? चांगला शेलका दिसला की टाकतीस तोंडात. हे पेरणीचं कामय. 

 तर म्हणती कशी, वो ताई कवातरी एखादा शेंगदाणा तोंडात टाकला तर एवढं काय खायचं काढताय ? खायची जिन्नस हाय म्हणूनच खातंय की माणूस.

आगं, खाऊ नको नाय म्हणत तुला. पेरायसाठी चांगलं शेंगदाणं लागतेत. मघाशीपास्नं मी बघते नेमका शेलका शेंगदाणा तुझ्या तोंडात जातोय. खायचं तर फाकळ्या खा, टरफलं निघालेलं शेंगदाणं खा, बारीकसारीक शेंगदाणं खा. हे निवडून बाजूला काढलंय ना यातलं खा की पायजे तेवढं. सुरकुतलेलं शेंगदाणं उलट गोड लागतेत खायला.

अगं बया,  तुमच्या इथं लै नेम असतेत बघा. मी मूठभर शेंगदाणं खाल्लं तर लगीच पेरायला कमी पडत्यान का. असल्याह्यानंच तुमच्याकडं मजूर यायला कानकून करतंय.

अगं, तू सूतावरनं स्वर्ग गाठू नको. चांगला शेंगदाणा मातीत पडला तरच चांगला उगवंल. तुकोबा म्हणलेत ना, शुद्ध बिजापोटी, फळं रसाळ गोमटी. इथं शुद्ध बी तर जायला लागलं तुझ्या पोटात. 

मी असं म्हणल्यावर बाकीच्या बाया लागल्या हसायला तसा मंदाबायला अजून आला राग. तिला म्हणलं, शेंगा काढायला ये. तेव्हा काय खायच्या तेवढ्या खा.  आताचा एकेक शेंगदाणा म्हंजी एकेक भुईमूगाचा टगळा असतोय म्हणून तुला म्हणलं बाई.

बघा आता मी तिला सांगायला गेले एक आन् झालं दुसरंच.  मंदाबाय बसली फुगून. कुणासंग एक नाय, दोन नाय. उगं तोंड पाडून मुकाट्यानं शेंगा फोडायला लागली. संध्याकाळपतोर माझ्या संगं बोलली नाय का काय नाय. म्हणलं, आज नाय बोलली तर चट उद्या बोलंन. शेतकऱ्याला मजूराची गरज असते तशी मजूरालापण कामाची गरज असतेच की. आपुण शेतकरी म्हणून बी- बियाण्याची तळतळ करतोय. बी चांगलं तर धान चांगलं. आता मजूर कुठं इतका इचार करतंय का ? शेतकऱ्याला एकेका कणसाचा, एकेका दाण्याचा इचार करावा लागतो.

आपुण ज्याचं बी लावलं तेच रोप उगवतंय. उन, वारा, पाऊस सोसून मोठं होतंय. नाहीच जुळलं सूत्र तर जळून जातंय. जुळलं तर  बहरतंय. कळ्या, फुलात येतंय. पुन्हा फळ म्हंजी बी होतंय. आता मला सांगा, एका बी ला जर एकच बी आलं असतं तर हातातलं खावं का लावावं असं झालं असतं का नाय ? पण एका दाण्याचं मोजता यायचं नायीत इतकं दाणं होतेत म्हणून माणूस लावतोय, पेरतोय, कष्ट करतोय, धडपडतोय. एका बी मधी एक झाड असतं. एक आंब्याची कोय उगवली, वाढली तर आंब्याचं झाड होतंय. एक मोहरीचा दाणा उगवला तर त्याचा डोलारा जेवढा मोठा तेवढ्या मोहरीच्या शेंगा आन् तेवढी मोहरी जास्त. आता हे गणित काय पुस्तकात शिकायचं गणित नाय. ते इथं मातीत शिकावं लागतं. आपुण तर रोज बघतोय हे. मूठभर लावलं तर पसाभर तरी कुठं गेलं नाय. लावून गेलं न् काढणीला आलं असं होत नाय ना. त्याच्यासाठी त्या पिकासाठी आपुण आधी मातीत राबावं लागतं. 

आता भुईमूग करायचा म्हणल्यावर नुसतं बी चांगलं असून चालतंय का ? पुढचं किती डोंगर पार करावं तेव्हा टगळा उपटायला येतोय. एकसाल हुमनीनं नाकीनऊ आणलं होतं. एकसाल रानडुकरांनी उकरून अख्ख्या भुईमूग रिकामा केलता. तोंडात घालायलासुद्धा शेंग हाती लागून दिली नव्हती. रिकामं टगळं गोळा करून आणलं न् जित्रांबांला टाकलं. कधी पावसानं आठमुठ्यागत केलं की सारखी रिपरिप चालूच राहती. मग अर्ध्या शेंगा उगवून बसतेत. कशाबशा काढल्या तरी  बाजारात न्यायच्या कशा ? वाळवायच्या म्हणलं तरी उन्हाचा पत्ता नसतो. बुरंगाटात वाळवायच्या कशा ? नीट खळाखळा वाळल्या नाय तर शेंगदाणं खऊट होतेत. एखादं पीक नीटनीटकं हाती लागणं सोपं नसतं.  तुकोबा म्हणालेत

बीज तेची फळ येईल शेवटी। लाभहानितुटी ज्याची तया।

त्यातल्या त्यात उन्हाळी भुईमूग बरा पडतोय म्हणून एवढं आदबायचं. बाकी कांद्याचा न् तरकारीचा कसा चुतडा होतोय ते तर बघतोयच आपुण. 

उगवलेलं सगळं लावावं लागत नाय. काही मनानं उगवतंय, तगून राहतंय, वाढतंय, पसरतंय. आता ही आपल्या रानातली तणं बघा. कुणी काय लावतंय होय ? पण पिकाच्या आधी उगवून येणार. तणनाशकानं जळणार. खुरपल्यावर निपटणार. पण परत उगवणार. तणाचं बी तर मातीच्या पोटातच असतंय. माती तणालापण तिचं गणगोत समजती. माती कधी भेदभाव करत नाय की बाबा तू तण हायीस उगवू नको आन् तू धान हायीस उगव उगव. ती तिची उब सगळ्यांला सारखीच देती. 

आज दिवसभर हेच चाललंय डोक्यात. बाया म्हणतेत, शेंगा फोडून फोडून बोटं दुखतेत. माझीपण बोटं दुखतेत. एका जाग्यावर बसून बसून मान, पाठ भरून आलीय. बाकीच्या कामांलापण उत आलाय.  बीमधनं बी हे चक्र जसं चालू रहातं तसं कामामागणं कामं चालू राहतेत. आपल्या कामांलापण बी म्हणलं तर त्यातनं येणारं फळ म्हणायचं. 

तुका म्हणे बीज न्यावे। तेथे यावे फळाने।                       

 घ्यावे जेणे न ये तुटी । बीज वाढे बिजापोटी ।

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com