Arvind Kejriwal : केजरीवालांचे मुखवटे

गुजरातमध्ये हिंदूंची मते मिळविण्यासाठी चलनावर देवदेवतांचे फोटो छापण्याचा केजरीवाल यांचा आग्रह हा राजकीय ढोंगीपणा आहे. लोकांच्या श्रद्धेला हात घातला, तर लोकांच्या अधिक जवळ जाता येते, याचे सूत्र त्यांना गवसले आहे. याच मार्गाचा अवलंब करीत त्यांना गुजरातची निवडणूक जिंकायची आहे.
Aravind Kejariwal
Aravind KejariwalAgrowon

एकदा सत्तेची चटक लागली, की माणूस आपली मूल्ये, आचार, विचार सगळं विसरून जातो. विवेकहीन होऊन जनमताचा अनादर करण्याची वृत्ती त्याच्यात बळावते. लोकांनी आपल्याला इथवर कसे आणले, या बाबींवर विचार करणे त्याच्यासाठी दुय्यम ठरते. तो खराखुरा ‘सेवक’, ‘चौकीदार’ उरत नाही, पक्का राजकारणी होतो. असे करणारेच राजकारणात स्थिरावतात. आठ वर्षांपूर्वी असाच एक ‘आम आदमी’ उदयास आला, त्यांचे नाव अरविंद केजरीवाल!

‘लोकांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी कटिबद्ध आहोत आणि राज्यघटनेवर आपली निष्ठा आहे’, असे सांगणारे केजरीवाल आता पूर्णत: बदलले आहेत. पंजाबच्या निवडणुकीपासून त्यांच्यातील बदल जाणवतो. गुरू ग्रंथसाहिब आणि धर्माचा आधार घेत त्यांनी पंजाब जिंकला. लोकांच्या श्रद्धेला हात घातला, तर लोकांच्या अधिक जवळ जाता येते, याचे सूत्र त्यांना गवसले. याच मार्गाचा अवलंब करीत त्यांना गुजरात जिंकायचे आहे. पैशाशिवाय निवडणूक जिंकणे ही बाब सोपी नाही.

मोदींच्या गुजरातमध्ये जाऊन आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या भाजपला आव्हान देणे म्हणजे अरबी महासागराला दिल्लीतील यमुनेने खिजवण्यासारखा प्रकार आहे. अशावेळी धर्माशिवाय दुसरा मार्ग तरी कोणता, असा विचार केजरीवाल यांनी केलेला दिसतो. सत्तेसाठी त्यांची मूल्ये बदलली आहेत; हे लोकांनाही ठाऊक झाले आहे. त्यामुळे भारतीय चलनावर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणे यात आश्‍चर्य वाटत नाही.

मतांसाठी केजरीवाल धर्म आणि देवदेवतांचा आधार घेतात, असा भाजपचा आरोप आहे. धर्माचार्यांना धक्का देणारे तंत्र वापरल्याने केजरीवाल स्वत:च खुश झाले आहेत. लोकांना लीलया बनविण्याचे तंत्र ज्या पक्षाला अवगत असते, तोच पक्ष पुढे राजकारणात स्थिरावतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि सत्तेत आल्यानंतरची कॉँग्रेस आठवा. सत्तेसाठी त्यांना अनेक सोंगे करावी लागली. गांधीजींच्या मूळ विचारधारेला त्यांनी संपवून टाकले. वेळेनुरूप सतत बदलावे लागले. त्यामुळेच कॉँग्रेसला इतके वर्षे देश चालविता आला.

Aravind Kejariwal
Agricultural Laborers : भात कापणीसाठी कामगार मिळेना

भाजपकडे तर हिंदुत्वाचे पेटंट आहे. भाजपशिवाय ज्या पक्षांनी हिंदुत्वावर अधिकार दाखविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ते अंगलट येत गेले. २०१९ मध्ये मतांसाठी कॉँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा प्रयोग केला; परंतु अपेक्षाभंग झाला. रामराज्याची कल्पना मांडणाऱ्या भाजपच्या विचारांमध्ये जराही ‘राम’ नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. तरीही याच बळावर अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्तमपणे देश चालविला. मोदींनी हिंदुत्व व धर्माचा वापर करीत महाकाल, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ, मथुरा आदींचे दर्शन घडवून आणले. त्यांच्या विचारधारेला ते शोभतेही.

परंतु भाजपची ‘बी टीम’ म्हणून नावारुपास येत असलेल्या केजरीवालांच्या ‘आम आदमी पार्टी’ने गुजरातेत धर्माचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. केजरीवालांनी आतापर्यंत सामाजिक दायित्वाचा जो आव आणला होता, त्यापासून दूर जात गणपती, लक्ष्मीच्या नावाने मतांचा जोगवा मागितला आहे. अशा कृती घटना आणि लोकशाहीसाठी घातक आहेत. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी त्याचा विचार कोण करतो?

Aravind Kejariwal
Agriculture : शेती शोषणमुक्त कधी होणार ?

धर्माचे राजकारण

प्रारंभीचा केजरीवालांचा प्रवास अभिमानास्पद वाटत होता. मात्र सत्तेसाठी धर्माचे राजकारण करणाऱ्या केजरीवालांचा मुखवटा देशहिताचा नाही. कॉँग्रेसने धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगणे किंवा भाजप, संघाची प्रखर हिंदुत्वाची भूमिका लोकांना माहिती आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी गांधीजींची विचारधारा सांगायला सुरूवात केली. हातात झाडू पकडला; परंतु गांधी यांचा कधी नव्हताच म्हणून लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही.

शेवटी मोदींना सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्याकडे मोर्चा वळवावा लागला. केजरीवालांनी गांधीजींचा फोटो वापरून दिल्लीत सत्ता मिळवली. त्यांनतर पंजाबमध्ये शीख, दलितांच्या मतांसाठी शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावत गांधीजींना क्षणात हटवले. केजरीवालांमध्ये भगतसिंगांचा कोणता विचार दिसून आला? डॉ. आंबेडकर पाहिजेत; परंतु त्यांचा विचार नको, अशी त्यांची वृत्ती दिसते.

Aravind Kejariwal
Agriculture Business : स्वॉट ॲनालिसिसने ओळखा व्यवसायातील बलस्थाने

अलीकडेच डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा म्हटल्या म्हणून दलित मंत्र्यास घरी बसवणाऱ्या केजरीवालांचा विचित्र मुखवटा दिसून आला. आंबेडकर कोणतेही देव मानत नव्हते. ते मूर्तिपूजेच्या विरोधात होते. अशावेळी त्यांच्या विचारांची अवहेलना करीत फोटो लावणारे केजरीवाल घातक ठरतात. गुजरातमध्ये हिंदूंची मते मिळविण्यासाठी चलनावर देवीदेवतांचे फोटो छापण्याच्या त्यांचा आग्रह राजकीय ढोंगीपणा आहे.

दिल्ली आणि पंजाबमध्ये केजरीवालांसोबत मोठ्या प्रमाणात मतदार आलेत ते त्यांचे चांगले प्रशासन, विश्‍वास, उत्तम शाळा, आरोग्य सेवा, वीज, पाणी यासाठी. परंतु गांधी, आंबेडकर, भगतसिंग यांना सोईपुरते वापरण्याच्या कृतीतून केजरीवालांचा मुखवटा देशहिताचा नक्कीच नाही, हेही स्पष्ट होते. देशात देवाधर्माच्या नावावर खूपदा भोंदूगिरी केली जाते. महाराष्ट्रातील एका माजी मुख्यमंत्र्याच्या गणपतीने दूध प्यायले होते. त्यानंतर घरीदारी दुधाच्या वाट्या गणपतीच्या तोंडाला लावल्या जाऊ लागल्या.

प्रा. श्याम मानव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी दूध पिण्यामागचे विज्ञान सांगितले. तोपर्यंत कोट्यवधी लीटर दूध वाया घालवण्यात आले होते. महत्त्वाच्या गंभीर विषयांना बगल देण्यासाठी राजकारण्यांकडून असे उपद्रव होत राहतात. गेले काही दिवस अस्मानी संकटाचे आहेत. त्यातच महागाई, रोजगारासाठी सुलतानी फटक्यांची भर पडली आहे. अतिवृष्टी, महापुरात कष्टकरी, शेतकऱ्यांचे दु:ख विसरून बेभानपणे उत्सव साजरे होतात. ‘आनंदा’च्या शिध्यातून आनंद गायब असतो.

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना दिल्लीचा उच्चशिक्षित मुख्यमंत्री नोटांवर गणपती-लक्ष्मीचे फोटो लावल्यास देशातील दारिद्र्य दूर होईल, अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या देवांचे आशीर्वाद मिळतील, रुपया डॉलरच्या स्पर्धेत उतरेल, असे तारे तोडणाऱ्या केजरीवालांना हेही माहिती आहे, की आपण जे काही बोलतो ते शंभर टक्के थोतांड आहे. त्यांच्यापुढे एकमेव विषय आहे तो म्हणजे गुजरातची निवडणूक!. लोकांच्या भावनेशी खेळत का होईना; परंतु अगदी तब्येतीने त्यांना ही निवडणूक लढवायची आहे.

देशाला खऱ्या अर्थाने गुजराती चालवतात. १००पैकी ९० उद्योगपती गुजराती आहेत. देशातील पहिल्या १० श्रीमंतांपैकी आठ गुजराती आहेत. गुजरातमध्ये सहा हजार उद्योगांकडून राजकीय पक्षांना निधी प्राप्त होतो. त्यातील ९० टक्के रसद ही एकट्या भाजपला मिळते. विशेष म्हणजे गुजरातमधील विधानसभेच्या १७५ जागांवर उद्योगांची मजबूत पकड आहे. दोन हजार उद्योजक २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींच्या पाठीमागे धनशक्ती म्हणून उभे होते. या वेळीही गुजरातेत प्रचंड अर्थसाह्य होणार आहे. मोदी-शहांना कोणत्याही परिस्थितीत गुजरात जिंकावाच लागेल.

अन्यथा, त्याचा मोठा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसू शकतो. भाजपशी तुल्यबळ लढत देण्यासाठी पैशांशिवाय गुजरात जिंकायचे स्वप्ने पाहणाऱ्या केजरीवालांना धर्माच्या नावावर भावनिक साद घालणे हा एकमेव पर्याय उरला आहे असे वाटत असेल. परंतु असा केजरीवाल लोक कितपत स्वीकारतील हेही पाहावे लागेल. कितीही पैसा आणि उन्माद असला तरी मतदार राजा सर्वश्रेष्ठ आहे. या निमित्ताने केजरीवालांच्या वेळोवेळी बदललेल्या घातक मुखवट्यांची देशाला ओळख झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com