अस्सा लहरी पाऊस!

शब्दांचे थवे पांगत जातात, तुला लिहायला घेतलं की. तू मनात रिमझिमत राहतोस.
अस्सा लहरी पाऊस!

जयश्री वाघ

शब्दांचे थवे पांगत जातात, तुला लिहायला घेतलं की. तू मनात रिमझिमत राहतोस. ही श्‍वासांची विटकी माळ आता कुठंवर मिरवावी मातीने या क्षीण देहावर? ती तुटली की वेचायला नको येऊस, ही जी तिच्या उदरात पेरली गेलीय ना ती स्वप्नं आहेत उपाशीपोटी पाहिलेली. त्यांना अंकुर फुटून इवलासा हात वर काढून ते जेव्हा आभाळाला साद घालतील ना, तेव्हा मात्र पाठ फिरवू नकोस. तशी करपण्याची सवय झालीय आता, पण जीवनावरचा विश्‍वास कायम राहायला हवा या लवलवत्या पात्यांचा.

धरणीच्या अकराळविकराळ भेगा उद्या भरून निघतील. मातीचा कणन् कण सुजलाम् सुफलाम् होईल या आशेवरच तर तग धरून आहे जग. तू मात्र नेहमीच ओढ लावतोस, लुकाछुपी खेळतोस. लहरी कुठला. फरफट होते रे विनाकारण, तुझी आस लावून बसलेल्या साऱ्या जीवमात्रांची!

तुझे अप्रूपही आता कुणाला राहिले नाही

फुलांनी टाकल्या माना मुके आक्रोश करताना

असे आळवण्याची वेळ यावी हे केवढे दुर्दैव! तुझ्या जीवनदायी वृत्तीवर उठलेलं प्रश्‍नचिन्हच नाही का हे? समुद्र आहेत महाकाय अवतीभवती, पण या माळरानाची तहान तू आहेस. तुझ्या अमृतधारांनी पल्लवित होणारे हे वठलेले झाड कधीचे तुझ्या प्रतीक्षेत आहे. कधीकाळी दवबिंदूचे मोती माळून भवताल प्रफुल्लित करणारी तृणपात्यांची निष्प्राण कलेवरं तुझ्या वाटेकडे डोळे लावून आहेत. हुलकावणी देऊ नकोस. ढगांचे चौघडे, विजांची झुंबरे, गारांचे मोती नि वाऱ्याचे संगीत घेऊन ये. असंख्य नेत्रांच्या ज्योती मग अनिमिष नजरांनी ओवाळतील तुझी ही पालखी. दृष्ट काढतील अलाबला घेतील.

नावालाच बळीराजा असलेल्या आणि सततच्या दुष्काळाने रापलेल्या चेहऱ्यांवर उमटू दे हास्याची वक्र रेषा. सारं काही सरळ नि सुरळीत होईल या अपेक्षेने! पण तू धसमुसळेपणा काही सोडत नाहीस. अचानक येऊन धांदल उडवतोस, कधी तर पार दाणादाण होते रे तुझ्या बेसावध लेकरांची. जे येईल ते वाहून नेतोस. दगडमाती, भांडीकुंडी, मुके हतबल असहाय पशू तर कधी जितीजागती माणसं सुद्धा.

सुरुवातीला वाट पाहायला लावल्यानंतर जाताना मात्र निलाजऱ्या पाहुण्यासारखा ठाण मांडून बसतोस. मग विस्तव घेऊन पोळवतात तुला नागडी पोरं. जी तू यावंस म्हणून कमरेला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधून नदीकाठच्या शिवमंदिरात गाणी म्हणत नाचत यायची. आणि गाभाऱ्यात पिंडीवर ती बुडेपर्यंत जलाभिषेक करायची. तुझं येणं सुकर सुसह्य आणि वेळेवर व्हावं. पागोळ्या तळहातावर घ्याव्यात तसा तुझा शीतल संजीवक स्पर्श जगाला व्हावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com