
Solapur APMC News : सोलापूर जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचे (Agriculture Produce Market Committee Election) निकाल जाहीर झाल्यानंतर आता या बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडींकडे लक्ष लागले आहे.
पुढील आठवड्यात त्यासाठी तारखा निश्चित करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. पण एकूण निवडणुकीतील कौल पाहता, बहुतेक सर्व ठिकाणी या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अकलूज, कुर्डुवाडी, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला आणि दुधनी या आठ बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. पंढरपूर, अकलूज, कुर्डुवाडी आणि मोहोळमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपापले गड राखले आहेत. त्यामुळे येथे नेतेमंडळी जे उमेदवार देतील, तेच सभापती आणि उपसभापती होतील.
पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक, अकलूजमध्ये मोहिते पाटील, कुर्डुवाडीत आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे आणि मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या हातात ही नावे आहेत.
अक्कलकोट आणि दुधनीमध्ये माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि भाजपचे आमदार कल्याणशेट्टी यांनी पहिल्यांदाच परिवर्तन केले आहे. त्यामुळे इथल्या दोन्ही नावावरही पाटील-कल्याणशेट्टीच निर्णय घेणार आहेत.
मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे आणि त्यांचे काका बबनराव आवताडे यांच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे इथेही काका-पुतणेच ही दोन्ही नावे ठरवतील. त्यामुळे या सातही बाजार समित्यांमध्ये नेतेमंडळी जी नावे निश्चित करतील, त्यांना संधी मिळणार आहे.
एकमेव सांगोल्यात मात्र सर्वपक्षीय आघाडीला कौल मिळाल्याने इथे काहीशी चुरस असणार आहे. बाकी बहुतेक सर्व ठिकाणी या निवडी बिनविरोध होणार आहेत.
इच्छुकांची संख्या वाढली
बाजार समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीत नेतेमंडळीकडून नावे निश्चित होणार असली, तरी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मुदत संपूनही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वरचेवर लांबणीवर पडत असल्याने बाजार समितीत इच्छुकांची संख्या वाढली आहे.
त्यामुळे नेत्यांना कार्यकर्त्यांच्या नावासाठी आगामी या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच योग्य ‘मध्य’ साधावा लागणार आहे. किंबहुना, त्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे, असे दिसते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.