रसायन अवशेषमुक्त शेतीसाठी जागृती करावी

कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाचा (देशी) पदविका प्रदान समारंभ संपन्न
Atul Benke
Atul BenkeAgrowon

नारायणगाव : आरोग्याचे महत्त्व, शेतीतील वाढत खर्च लक्षात घेता विषमुक्त शेती काळाची गरज बनली आहे. त्यामुळे कृषी निविष्ठाधारकांनी शेतकऱ्यांना रासायन अवशेषमुक्त शेतीकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाच्या (देशी) तिसऱ्या बॅचेसचा पदविका प्रदान समारंभ जुन्नर तालुक्याचे आमदार श्री. बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार विषयतज्ज्ञ राहुल घाडगे, योगेश यादव, भारत टेमकर, डॉ. दत्ता गावडे, प्रा. हेमंतकुमार डुंबरे, प्रा. राधाकृष्ण गायकवाड, वसंत कोल्हे, मीनल मेहेत्रे, समीर रासकर आदी मान्यवर आणि १२० कृषी निविष्ठाधारक उपस्थित होते. आमदार बेनके यांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या डीलर्सना प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह आणि आंब्याचे रोपटे देऊन सन्मानित केले.

कृषिरत्न अनिल मेहेर म्हणाले, कि शेतकऱ्यांना इनपुट डीलरकडून निविष्ठांच्या वापराबद्दल, गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत प्राथमिक माहिती घेत असतो. परंतु यापैकी अनेक कृषी निविष्ठाधारकांकडे औपचारिक कृषीचे शिक्षण नसते. अर्धवट माहिती, चुकीची माहिती अथवा ऐकीव माहिती यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे आणि त्यांचेही नुकसान होते. क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी हा अभ्यासक्रम २०१८ साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर एक्स्टेंशन मॅनेजमेंट हैदराबाद यांच्या मान्यतेने एक वर्षाचा ‘डिप्लोमा इन अॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स’ डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला. आजवर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव खेड, मावळ, मुळशी आणि शिरूर तालुक्यातील २४० डीलर्सने हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असून सुमारे एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हेच डीलर्स योग्य सल्ला देऊन मार्गदर्शन करीत आहे आणि आपला व्यवसायदेखील करीत आहे.

कार्यक्रमात कृषिविस्तार विषयतज्ज्ञ राहुल घाडगे यांनी प्रास्ताविक केले, तर वसंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

‘सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा’

‘भविष्याचा वेध घेऊन कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योग्य व माफक सल्ला मिळावा. तसेच, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत व्हावी यासाठी कृषी विस्तार कार्यकर्त्यांची मोठी फौज या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उभी करण्याचे काम केले जात आहे. याचा फायदा जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी व शिरूर या सहा तालुक्यांतील शेतकरी व व्यापाऱ्यांना होत आहे, याचा मला अभिमान आहे. शेतकऱ्यांनी या केंद्राकडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पाहावे,’ असे आमदार श्री. बेनके म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com