Backyard Management : कुटुंबाच्या पोषणासाठी परसबागेचे नियोजन

ग्रामीण भागामध्ये घराभोवती मोकळी जागा असते. या जागेमध्ये कुटुंबांच्या पोषकतेची गरज भागवणारी बाग उभी करता येते. या बागेलाच परसबाग म्हणतात. यामुळे ताज्या, सकस आणि कीडनाशकमुक्त भाज्या आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. खर्चातही बचत होते.
Backyard Management
Backyard ManagementAgrowon

कुटुंबाच्या पोषकतेची (Nutrition) काळजी ही घरातील महिला वर्ग घेत असतो. मात्र शेतीची कामे (Agriculture Work), घरातील कामे यातून उपलब्ध होणाऱ्या भाजीपाला (Vegetable) किंवा तिखट तेलावर तडजोड करावी लागते. यामुळे अंतिमतः घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. लहान मुले, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पोषणामध्ये झालेल्या कमतरतेचे परिणाम दीर्घ राहू शकतात. (Backyard Management)

Backyard Management
सामूहिक पाणी योजनेतून फुलली परसबाग

परसबागेचे महत्त्व ः

-रोज ताज्या व सकस भाज्या स्वयंपाकासाठी उपलब्ध होतात.

-कीडनाशकमुक्त जोपासना केल्यास त्यांचे अंश खाद्यपदार्थामध्ये येण्याची शक्यता कमी होते.

-आठवडी बाजारापर्यंत जाण्यायेण्याचा वेळ व खर्चात बचत होते.

-घरीच उपलब्धता असल्यामुळे भरपूर भाज्या खाल्या जातात, परिणामी भरपूर जीवनसत्त्वे मिळतात.

-परसबागेची जोपासना हा एक उत्तम छंद असून, त्यातून विरंगुळा, व्यायाम आणि निसर्गाशी जवळीक अशा बाबी साधल्या जातात.

जागेची योग्य निवड

परसबागेसाठी जागेची निवड करताना सुपीकता, पाण्याचा निचरा, भरपूर सूर्यप्रकाश व मोकळी हवा यांच्या उपलब्धतेचा विचार करावा. घरच्या जवळ किंवा मागे परसबाग केल्यास अन्य कामांसोबत व्यवस्थापन करणे सोपे जाते. उपलब्ध जमीन जर परसबागेसाठी योग्य नसल्यास, त्यात थोडी सुपीक माती, नदीतील गाळ किंवा सेंद्रिय पदार्थ यांचा वापर करता येतो.

Backyard Management
सेंद्रिय परसबाग उभारून कुटुंबाची गरज भागवा : पाटील

पिकाची निवड

आपल्या हवामानात चांगल्या प्रकारे वाढणारी, कुटुंबाची पोषकता आणि आवडी निवडीप्रमाणे पिकांची निवड करता येते. लागवडीसाठी निवडलेल्या जाती शक्यतो रोग, कीड प्रतिकारक्षम असाव्यात. यामुळे कोणत्याही फवारणीची गरज कमी होते.

पिकातील फेरबदल

एका जागेवर एकच प्रकारचा भाजीपाला सतत घेऊ नये. त्यात हंगामानुसार फेरबदल करावा. पिकातील अंतर हे शक्यतो योग्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपे व प्रकार कसे लावता येतील, याकडे लक्ष द्यावे.

परसबागेतील भाज्याचे हंगामी वर्गीकरण

-खरीप (पावसाळी) हंगामातील भाज्या (जुलै ते ऑक्टोबर) : पालक, शेपू, धने, आंबटचुका, भेंडी, चवळी, गवार, अंबाडी, वाल, टोमॅटो, मिरची, दोडकी, कारली, काकडी, दुधी, वांगी, फुलकोबी इ.

- रब्बी (हिवाळा) हंगामातील भाज्या (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) : पालक, मेथी, धने, चाकवत, चवलाई, मुळा, बीट, गाजर, अंबाडी, कांदा, मिरची, लसूण, कारली, काकडी, वाटाणा, टोमॅटो, वांगी, फुलकोबी, कोबी इ.

- उन्हाळी हंगामातील भाज्या (मार्च ते जून) : पालक, धने, घोळ, भेंडी, चवळी, गवार, अंबाडी, वाल, टोमॅटो, मिरची, दोडकी, कारली, काकडी, दुधी, वांगी, कोहळे, ढेमसे इ.

Backyard Management
प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये विद्यार्थ्यांनी फुलविली परसबाग

परसबागेचा आकार व प्रकार ः

-परसबागेचा प्रकार मुख्यतः जागेची उपलब्धता व घरातील एकूण सदस्य संख्या यावर ठरविता येईल.

घरातील सदस्य संख्या जास्त असल्यास जागेच्या उपलब्धतेनुसार परसबाग २० गुंठे ते एक एकर जागेवर करता येते.

-५ गुंठे जागेमध्ये मध्यम आकाराची, साधारणपणे १.५ ते ५ गुंठे जागेमध्ये छोटी परसबाग तयार करता येते.

-शहरी भागामध्ये जागेची कमतरता लक्षात घेता आपल्याला गच्चीवरही परसबाग करता येते. पसरट कुंड्या, फुटलेले ड्रम, रिकाम्या पॉलिथिन बॅग, कुलर टब इ. घटकांमध्येही काही भाजीपाल्यांचे उत्पादन घेता येते.

व्यवस्थापन ः

-विविध पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती यांची हंगामानुसार लागवड करावी. लागवडीसाठी सपाट व वाफे किंवा सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा.

-योग्य अंतरावर लागवड करावी. गरज पडल्यास रोपांची विरळणी करावी.

-तणांच्या नियंत्रणासाठी निंदणी व खुरपणी वेळच्या वेळी करावी.

- या रोपांना कमी किंवा अधिक पाणी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सुरुवातीच्या काळामध्ये झारीने पाणी द्यावे. पिकांना एकाच वेळेस भरपूर पाणी न देता अनेक वेळा हलके पाणी द्यावे. मोठी परसबाग असल्यास ठिबक लॅटरल लावाव्यात. पावसाळी हंगामामध्ये परसबागेला पाण्याची गरज भासत नाही. मात्र पावसामध्ये आठ दिवसांपेक्षा अधिक खंड पडत असल्यास सिंचनाची व्यवस्था करावी. हिवाळा, उन्हाळ्यात रोज दोन वेळा (सकाळी व सायंकाळी) पाणी द्यावे.

-वेलवर्गीय पिकांना मातीची भर घालणे, वाढीसाठी आधार देणे ही कामे करावीत. यामुळे फळे मातीच्या संपर्कात येऊन खराब होणार नाही.

-कमी जागेत व कमी कालावधीत येणाऱ्या पालेभाज्यांना प्राधान्य द्यावे. हिरव्या भाज्यांमुळे भरपूर जीवनसत्त्वे व तंतुमय पदार्थ मिळतात.

-परसबागेला कुंपण करणे महत्त्वाचे आहे.

खताचे व्यवस्थापन

-परसबागेसाठी रासायनिक खताचा वापर करण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करावा. घरगुती उपलब्ध सेंद्रिय पदार्थांतून गांडूळ खताचा एखादा बेड तयार केल्यास घरचे गांडूळ खत उपलब्ध होत राहते.

-फळ पिकांना वर्षातून किमान दोनदा खते द्यावीत. वर्षातून १ टोपले गांडूळ खत द्यावे.

-परसबाग तयार करताना मातीमध्ये भरपूर शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत, लेंडी खत, निंबोळी खत, हिरवळीची खते यापैकी उपलब्ध घटकांचे नक्की वापर करावा.

काढणी ः

परसबागेमधील पालेभाज्यांची काढणी करताना फक्त पानांची खुडणी करावी. उदा. आंबट चुका, पालक, कोथिंबीर, मेथी इ.

दररोज गरजेइतकी भाजी काढावी. शक्यतो ताज्या स्वरूपातच वापरावी. त्यामुळे त्यातील पोषक घटकांचा ऱ्हास होणार नाही.

वेलवर्गीय पिकाची काढणी करताना कोवळी फळे तोडावी.

नम्रता राजस, ९११९४२३७९० (विषय विशेषज्ञ -गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी - रेल्वे, ता. दारव्हा, जि. यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com