अर्जफाट्यांच्या गमती-जमती

महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात झालेले बदल शोधताना सामान्य माणसाचे सरकार अशा दरबारी होत असलेले पत्रव्यवहार व त्यासाठी चालणारे अर्जफाटे यामध्ये सुद्धा प्रचंड बदल झाला आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात झालेले बदल शोधताना सामान्य माणसाचे सरकार अशा दरबारी होत असलेले पत्रव्यवहार व त्यासाठी चालणारे अर्जफाटे यामध्ये सुद्धा प्रचंड बदल झाला आहे. १०० वर्षांपूर्वी शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे सरकारी कार्यालयात फारसे अर्ज येत नसत. त्या वेळी अर्ज देण्यापूर्वी प्रचंड तयारी केली जात असत. अर्ज हा नेहमी स्वतः समक्ष देऊन सादर करायची पद्धत होती. अर्जाची सुरुवात त्या वेळी मेहरबान हुजूर, राजमान राजश्री, मेहरबान अशा शब्दांनी होत असे. त्या काळात विकास योजना नव्हत्या. त्यामुळे त्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करण्याचा फारसा प्रश्‍न उद्‍भवायचा नाही. मुख्य पत्रव्यवहार हा जमीन सारा माफी, तगाई अशा विषयांशी मर्यादित होता. जसजशी स्वातंत्र्य चळवळ जोम धरू लागली तसतशी प्रशासकीय चळवळ दडपण्यासाठी लोकांवर अत्याचार वाढू लागले. त्याबरोबरच भारतात कोठेही नवीन कायदा, हुकूम, अन्याय किंवा अत्याचाराच्या घटनेबाबत निषेधाचे अर्ज ब्रिटिश अधिकाऱ्यांना जाऊ लागले.

Rural Development
Dairy Development: राष्ट्रीय डेअरी योजनेत दूध भेसळ रोखण्यावर भर

स्वातंत्र्यानंतर मात्र जसजशा विकास योजना राबविल्या जाऊ लागल्या तसतसा विकास योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज वाढू लागले. अर्थातच या काळातील बहुसंख्य अर्ज हे सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासंबंधी होते. त्या नंतरच्या काळात वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आल्या व त्याचा लाभ मिळविण्यासाठी लोकांचे अर्ज सुरू झाले. रेशनकार्ड व्यवस्था १९४५ मध्ये सुरू झाली आणि रेशनकार्ड चा फायदा मिळावा म्हणून लोकांचे तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू झाले. रेशन कार्ड व्यवस्थेमध्ये स्थलांतरित कुटुंबांची कार्डे कमी करणे, नावे कमी करणे, काही नव्याने वाढविणे, जन्म व मृत्यू झाल्यावर काही नावे कमी करणे अशा पद्धतीने पत्रव्यवहार वाढू लागले. स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन जाहीर झाल्यावर, एसटीचा लाभ मिळण्यासाठी, वैयक्तिक लाभाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज वाढू लागले.

Rural Development
Rural Development : गाव सहभागाने वाढेल

जगातील इतर देशांमध्ये लोक एवढ्या संख्येने अर्ज करीत असतील का? ते अर्ज कशा प्रकारचे असतील? त्यामध्ये गावच्या व सरपंचाच्या भानगडींची चौकशी करण्याची मागणी असेल का, असे असंख्य व नाना प्रकारचे प्रश्‍न डोळ्यापुढे येतात. वाटेल त्या विषयावर तलाठ्यापासून ते मंत्रालयापर्यंत दररोज लाखो निवेदने व अर्ज येतात. वास्तविक अशा अर्जांना जर ‘प्रोसेस फी’ घ्यायला सुरुवात केली तर दररोज कोट्यवधी रुपयांचा टॅक्स सरकारला गोळा होईल. एखाद्याच्या जीवनात फार मोठा प्रश्‍न निर्माण होऊन जगणे असह्य झाल्यामुळे लोक निवेदने किंवा अर्ज देतात असे म्हणावे तर ते पण चुकीचे ठरेल. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात कोट्यवधी लोक बेकार व रिकामटेकडे असून जगातल्या कोणत्याही गोष्टीवर ते कलेक्टरला निवेदन देऊ शकतात. एका नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीत गटार तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरल्याचे निवेदन हे काम ज्या नगरपालिकेकडे आहे त्याचे वॉर्ड ऑफिस सोडून राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, मंत्रालय, विभागीय आयुक्त, कलेक्टर, तहसीलदार इत्यादींना खास विशेषणे लावून पाठवले गेले. त्यानंतर सर्व कार्यालयांची निवेदने सुद्धा ठरावीक अंतराने फिरत फिरत पुन्हा नगरपालिकेकडे आली. या सर्व निवेदनांना उत्तरे पाठवावी लागल्यामुळे तुंबलेली गटारे स्वच्छ करण्याच्या खर्चापेक्षा ८ ते १० पट खर्च हा सर्व ठिकाणी लेखी अहवाल, उत्तरे व खुलासे पाठविण्यासाठी आला. या अर्जाच्या सुनावणीसाठी चीफ ऑफिसर तीनवेळा सुनावणीला वरिष्ठांकडे हजर राहिले तो खर्च निराळाच!

कधी कधी कार्यालयात येणारी निवेदने अतिशय गमतीशीर असतात. कोणत्यातरी भलत्याच देशात घडलेल्या एखाद्या घटनेचा निषेध करणारी निवेदने स्थानिक कलेक्टरला दिली जातात. अशी निवेदने, पुन्हा राज्यातील सर्व कलेक्टरांकडून शासनाला जातात. त्या निवेदनांचे शासन शेवटी काय करते, हा एक दिव्यशोधच ठरावा! एका जिल्ह्यातील एक कर्मचारी पोस्टातून रिटायर झाल्यावर गावी शेतावर राहायला आला. हळूहळू काही वर्षे लोटली. त्याच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला. तो त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला दर आठवड्याला एक पत्र टपालातून पाठवायचा. त्या पत्रावर लाल कागद कापून हायकोर्टासारखे सील तयार करून लावायचा. त्या पत्रात वरच्या कोपऱ्यात मॉस्को, ताश्कंद, रशिया असा पत्ता टाकायचा व सहीच्या खाली गावाचे नांव! त्याच्या पत्राची सुरुवात फार मजेशीर असे ;

‘‘हे यान मॉस्कोपासून ३२ मैलावरून सोडण्यात आले आहे. ते येत्या बुधवारी दुपारी एक वाजून ३२ मिनिटांनी कलेक्टरच्या खुर्चीवर येऊन आदळणार आहे. सर्व भस्मसात, क्षणार्धात... त्या आधी माझी जमीन माझ्या नावाने करा.’’ या अर्जदाराचा शोध घेतला असता थेट एका वस्तीवर हा माणूस आढळून आला. त्याच्या घरचे म्हणाले, की ते आमचे सासरे आहेत. पूर्वी पोस्टात नोकरीला होते. रिटायर झाले. ‘म्हाताऱ्याला थोडे वेड लागलेय. तो दररोज कुणाला तरी बाजेवर बसून पत्र लिहितो आणि बडबडत सुटतो!’

एकदा सोलापूरला १० लोक जीप करून गावातल्या नळकोढाळ्याचे नळ बसवून मिळावेत अशी मागणी घेऊन १०० कि.मी. अंतरावरून निवेदन द्यायला आले होते. नवीन नळ बसवण्याची किंमत त्या वेळी २५० रुपये होत होती आणि सर्वांचा जाण्या-येण्याचा खर्च ६०० रुपये! जगातल्या अनेक देशांमध्ये एवढी गंमत कोठून असणार.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com