
Palghar Market News : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील वैतरणा नदीकिनारच्या प्रसिद्ध बहाडोली गावची टपोरी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत. किलोमागे सहाशे ते सातशे रुपये दराने या जांभळाची विक्री केली जात आहे.
हंगामातील फळ काढणीला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळाच्या फळांची आवक वाढल्यानंतर जांभळाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
यंदाचा हंगाम एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्याने एक ते दीड महिन्यांचा हंगाम मिळणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत.
शेताच्या बांधावरच्या लावलेल्या जांभळाच्या झाडाला येणारी फळे काढून विकणारे बहाडोली गावातील शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन वृक्षलागवड, जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मेहनत घेत आहेत. एकट्या बहाडोली गावात जांभळाच्या सहा हजार झाडांची लागवड आहे; तर नव्याने दोन हजार झाडांची लागवड केली आहे.
भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न
जांभळाच्या झाडाचा इतिहास, जांभूळ फळाचे वैशिष्ट्य, जांभूळ लागवड असलेल्या परिसराचा नकाशा, जांभूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबतची वर्तमानपत्रांतील कात्रणे, कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या जांभूळ बागेतील भेटींची छायाचित्रे आदी माहिती शेतकऱ्यांनी गटामार्फत एकत्र करून, भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक माहितीसह प्रस्ताव सादर करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने गावातील शेतकऱ्यांना दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.