
Prataprao Pawar : सन १९७७-७८ ची गोष्ट. जनता सरकार निवडून आलेलं होतं. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सादिक अली यांची नेमणूक झाली होती. ते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शांता सादिक अली सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ते एकदा पुणे दौऱ्यावर होते. राजभवनात उतरले होते. त्यांनी काही व्यक्तींना भेटीसाठी निमंत्रित केलं होतं. पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रथितयश लोकांचा, संस्थांचा परिचय व्हावा हाही एक उद्देश त्यामागं होता. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांनी यमुताई किर्लोस्कर, शरद गोखले आदींना बोलावलं होतं.
राजभवनाच्या भिंतीला खेटून दोन-अडीच एकरांचा प्लॉट रिकामाच होता. हा प्लॉट कुणाचा हे गुलदस्तात होतं. कारण भोवती संरक्षणखात्याचा वेढा आहे. मात्र हा राजभवनाचाच भाग आहे, हे एका सरकारी बाबूच्या ध्यानात आलं.
आता भिंत तोडून त्या पडीक जागेचा काय उपयोग, असाही विचार झाला. तथापि, दुसरा काही चांगला उपयोग करता येईल का, याबद्दलही राजभवनात चर्चा सुरू झाली. काही खास सामाजिक कामांसाठी उपयोग करावा, असं शांता सादिक अली यांना वाटलं. याबद्दल चर्चेसाठी यमुताई आदींना बोलावण्यात आलं होतं.
मी आणि यमुताई ‘अंधशाळे’चे विश्वस्त होतो. दिव्यांग मुलांसाठी काहीतरी करावं, असं राजभवनात चर्चेअंती ठरलं, त्यामुळे पुढच्या चर्चेच्या वेळी यमुताईंनी त्यांच्याबरोबर मला राजभवनात नेलं. अर्थात, इतरही लोक होतेच. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या व्यथा आम्हाला माहीत होत्या. शिवाय, इच्छा असली तरी या संस्थांकडे पैशाचं पाठबळ नसे. अशा ६०-६५ संस्था पुण्यात काम करत होत्या.
आमच्या सर्वांच्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला, की सर्वांना उपयुक्त अशी एक योजना या शेजारच्या जागेत करावी, त्यासाठी राज्य सरकारनं सर्व जबाबदारी घ्यावी.
जागा वगैरे सरकारची असल्यानं सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे विश्वस्त असावेत आणि त्याचबरोबर या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी ही संस्था चालविण्याची जबाबदारी घ्यावी. यमुताईंनी मला न विचारता कार्यकारी विश्वस्त म्हणून माझं नाव सुचवलं.
त्याला शरद गोखले, तत्कालीन आयुक्त गुप्ते यांनी व इतरांनी लगेच पाठिंबा दिला. मला ‘होय-नाही’ म्हणायची संधीच दिली नाही! तेव्हापासून ते आजतागायत, म्हणजे ४५ वर्षं, मी ती जबाबदारी आमच्या इतर विश्वस्तांच्या साह्यानं पार पाडतो आहे.
जागा या नवीन संस्थेच्या नावे - म्हणजे बालकल्याण संस्था, पुणे, हिच्या नावे - करणं, इमारतीचा आराखडा, तिचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागानं करणं, नियमावली ठरवणं, सर्व अधिकार आम्हा बिगरसरकारी विश्वस्तांना देणं वगैरे गोष्टी करण्यात पाच वर्षं गेली. आयुक्त गुप्ते यांचा यात सर्वांत महत्त्वाचा वाटा होता.
कारण त्यांना सर्व सरकारी नियम, अडचणी, उपाय वगैरे माहीत होते. आमच्या निदान ६०-७० मीटिंग्ज झाल्या. सरकारी कामाची पद्धत, दिरंगाई मला नवीन होती, त्यामुळे अनेकदा गुप्तेसाहेब थट्टेनं म्हणत : ‘‘अरे, आपल्याबद्दल प्रताप पवारांचं काय मत होत असेल?’’
सुरुवातीला संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिक्षक, पालक यांचे महाराष्ट्रभर प्रशिक्षण घेण्याचे कार्यक्रम राबवले. पालकांना दिव्यांग मूल म्हणजे गेल्या जन्मातील कर्माचं फळ वाटत असे.
अनेक पालक घरी पाहुणे आले, की असं मूल त्यांच्या नजरेस पडणार नाही अशी व्यवस्था करत. या मुलांचं जीवन आपण सुसह्य करू शकतो हे आम्हाला सर्वांना सांगायचं होतं, त्यासाठी हे प्रशिक्षण घेतलं जात असे.
या सुरुवातीच्या दहा-वीस वर्षांमध्ये आम्हाला सर्व सोई - मुलांना शाळेतून आणणं-सोडणं वगैरे - पैसे गोळा करून कराव्या लागल्या. माझ्याबरोबर काम करणाऱ्या विश्वस्तांमध्ये गुप्ते, बी. व्ही. जोशी, शीला पद्मनाभन, माझी पत्नी भारती आणि वाळिंबे यांनी भरपूर कष्ट घेतले.
गुप्ते व जोशी यांचं निधन झाल्यावर डॉ. संजीव डोळे आणि डॉ. चारुलता बापये या तज्ज्ञ डॉक्टरांची आम्ही विश्वस्त म्हणून निवड केली. त्यांनी उत्तम योगदान दिलं.
बालकल्याण संस्थेत पोहण्याच्या तलावापासून अनेक व्यवस्था आहेत. त्यात काळानुसार संगणक, ॲक्वा, ट्रेड मिल, व्हेस्ट्युबुलेटर अशा आधुनिक व्यवस्था आम्ही केल्या.
यामुळे संस्थेत येणाऱ्या मुलांशिवाय इतरांनाही त्या सुविधांचा माफक दरानं वापर करता आला. शेजारी असलेल्या ‘यशदा’ या संस्थेत त्यांच्यासाठी पोहण्याचा तलाव बांधायचा निर्णय झाला. गुप्ते त्यात होतेच.
मला हे समजल्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘या दोन्ही संस्था सरकारी आहेत. आपल्या संस्थेत सकाळी साडेनऊ ते दहापर्यंत मुलं येत नाहीत. त्याआधी आपला तलाव ‘यशदा’नं वापरावा. बालकल्याण संस्थेला पाणी स्वच्छ वगैरे करण्यासाठी महिन्याकाठी २५-३० हजार रुपये द्यावेत.
सरकारचा ७०-८० लाखांचा खर्च वाचेल आणि आपल्या तलावाचा पूर्णपणे वापर होईल.’’ ही सूचना लगेचच मान्य झाली. आजतागायत ती व्यवस्था सुरू आहे. आपण एकत्र काय करू शकतो हा विचार कुणीही व्यक्ती किंवा संस्था सहसा करत नाही.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक सुधारणांसाठी ‘बालकल्याण’च्या वतीनं आम्ही जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली. तिथल्या शिक्षकांना यासाठी प्रशिक्षित केलं.
सांगायला आनंद वाटतो, की या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या ॲबलिम्पिक, म्हणजे दिव्यांगांच्या जागतिक स्पर्धेमध्ये, भारतातर्फे सात जणांची निवड झाली. त्यात ‘बालकल्याण’चे चार विद्यार्थी होते.
मिळालेल्या पदकांमध्ये संस्थेच्या मुलांनी एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि उत्तम कामगिरीबद्दल एक उत्तेजनार्थ अशी चार पदकं पटकावली. अर्थात, संस्थेनं गेल्या तीन ते चार जागतिक स्पर्धांमध्ये अशीच पदकं मिळविली आहेत. राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं नुकतंच कौतुक करण्यात आलं.
हे सर्व करत असताना संस्थेच्या विश्वस्तांनी, म्हणजे डॉ. संजीव डोळे आणि डॉ. चारुलता बापये यांनी, पुढाकार घेऊन मुला-मुलींच्या आरोग्याबद्दल प्रशिक्षण-कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. इतर शाळांमध्ये जाऊन चर्चासत्रे, तपासण्या वगैरे केल्या. त्यांना त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा, सल्ले दिले (विशेषतः अंध मुली).
देशातील आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले कोलकत्याचे होमिओपॅथिक डॉक्टर सरकार यांना बोलावून १६० विद्यार्थ्यांची होमिओपॅथीच्या तत्त्वानं प्रथमच तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले. त्यातील १२० मुला-मुलींमध्ये उत्तम सुधारणा दिसून आल्या. त्यामुळे गेल्या महिन्यात दुसरं सत्र घेण्यात आलं.
या वेळी पुण्यातील आणि देशातील होमिओपॅथीच्या साठ डॉक्टरांना बोलावून, प्रत्येक मुलाची व्यथा काय आहे, कोणतं औषध आणि का द्यायचं याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामुळे पुण्यातील २० डॉक्टर आता मुलांशी संपर्क ठेवतात. दोन सत्रांमधून सुमारे ३५० मुला-मुलांची तपासणी झाली. बहुतेक मुलांना चांगला उपयोग झाला.
मुलांमधील सुधारणा पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहून आम्हा सर्वांना खूप समाधान वाटलं. आता फिजिओथेरपीसाठी शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या लोकांकडून संस्थेतील मुलांच्या शारीरिक क्षमता वाढविण्याबाबतचं काम सुरू झालं आहे.
एक अनुभव आवर्जून नमूद करावासा वाटतो. नुकतेच निवर्तलेले खासदार गिरीश बापट यांचे आणि माझे स्नेहपूर्ण संबंध होते. मी राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ती व्यक्ती हाडाचा कार्यकर्ता आहे की नाही हे पाहतो.
‘बालकल्याण’मधील कमतरता आणि अजून कशाची आवश्यकता आहे याबाबत बापट यांना संस्थेत प्रत्यक्ष बोलावून माहिती दिली.
त्यांच्याबरोबर आयुक्त चौकलिंगम यांनाही बोलावलं होतं. या दोघांच्या मदतीनं, विशेषतः बापट यांच्या पुढाकारानं, पावणेदोन कोटी रुपये खर्चून एक सुंदरसं ऑडिटोरियम बांधण्यात आलं.
याशिवाय, रस्तेही सिमेंट-क्रॉँकीटचे झाले. त्यामुळे ‘बालकल्याण’च्या सौंदर्यात भर तर पडलीच; शिवाय आणखी सहाशे मुलांची व्यवस्थाही होऊ शकली. बापट यांचं ऋण आमच्या कायम स्मरणात राहील.
संस्थेतील फक्त पगार आणि देखभाल यांचा खर्च सरकार करतं. लाखो रुपयांची मदत, तसंच विश्वस्त, स्टाफ यांनी मिळून ‘बालकल्याण’चं रूपांतर देशपातळीवरील एका उत्कृष्ट संस्थेत केलं आहे. सुमारे पाच हजार विद्यार्थी याचा लाभ घेतात.
जागतिक अपंग दिन तीन डिसेंबरला असतो, त्या दिवशी ही सर्व मुलं एकत्र असतात. दिव्यांग मुलांच्या सुखात, आनंदात सहभागी होण्याचं भाग्य आम्हा विश्वस्तांना मिळतं.
आता ‘सीएसआर’मधून उद्योजक, संगणक कंपन्या, बांधकाम व्यावसायिक असे अनेक घटक संस्थेच्या वाढीसाठी, गुणवत्तेसाठी आर्थिक मदत करू लागले आहेत.
वेगवेगळ्या खास उपकरणांमुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळतं. अशी अत्याधुनिक व्यवस्था देशातील अन्य कोणत्याही संस्थेत अस्तित्वात नाही.
या विषयात ज्यांना रस, सहानुभूती, प्रेम आहे त्यांनी संस्थेला जरूर भेट द्यावी, मदत करावी हे आवर्जून सांगावंसं वाटतं. आम्हा विश्वस्तांबरोबरच सर्व स्टाफही संस्थेत येणाऱ्या मुलांसाठी आपलं सर्वोत्तम ते देत असतो.
याचमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर यंदाच नव्हे, तर गेली बारा-पंधरा वर्षं संस्थेनं अनेक सुवर्णपदकं पटकाविली आहेत. तुम्हीसुद्धा या मोहिमेत कशा प्रकारे सहभागी होऊ शकाल, याचा विचार करा.
‘बालकल्याण’मध्ये पुणे आणि परिसरातील ८५ शाळांमधील मुलं-मुली येतात, अनेकदा राज्यांतील अन्य भागांतील मुलंही येऊन तीन-चार दिवसांसाठी मुक्काम करतात. एकदा दिल्लीतील मुलंही आली होती. दिल्लीतील सलाउद्दीन पाशा यांच्या मार्गदर्शनात या सर्व शाळांतील दीडशे मुला-मुलींनी रामायण सादर केलं.
सीतास्वयंवरापासून ते राम लंकेतून परत येईपर्यंत केलेलं ‘डोळस’ सादरीकरण मनाचा ठाव घेणारं ठरलं. उपस्थित तीन हजार प्रेक्षकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसू नये असा हा कार्यक्रम होता.
या सादरीकरणानं मुला-मुलींचंच नव्हे, तर पालकांचंही आणि समाजाचंही आत्मबळ वाढलं. तुमच्या भागात दिव्यांगांसाठी, वृद्धाश्रमासाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था असतील तर त्यांनाही आपलं योगदान जरूर द्या. तुम्ही या आवाहनाचा मनापासून विचार कराल अशी खात्री आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.