Trauma Center Barshi : बार्शीचे ट्रामा सेंटर; गोरगरिबांचे भारी रुग्णालय

चाळीस कोटी रुपये जमऊन उभं केलेलं हे हॉस्पिटल जगातल्या अत्याधुनिक सुविधा पुरविणारं आहे. या सगळ्या निधीतला एकही पैसा सरकारी अनुदानातला नाही.
Trauma Center Barshi
Trauma Center BarshiAgrowon

- इंद्रजीत भालेराव

कर्मवीर व्याख्यानमालेत रात्री व्याख्यान संपल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव मला म्हणाले उद्या वेळ असेल तर आमच्या ड्रामा सेंटरलाही भेट द्या. म्हटलं हे काय आहे ? तर ते म्हणाले, मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभं केलेलं एक अत्याधुनिक असं हॉस्पिटल आहे.

मी म्हटलं, मी तिथं येऊन काय करू ? त्यातलं मला काय कळणार ? ते म्हणाले या तर, पाहून जा सहज म्हणून, तुमची कविता ज्या शेतीमातीतल्या माणसाविषयी पोट तिडीकीनं बोलते त्याच माणसासाठी आम्ही हे ट्रामा सेंटर उभं केलेलं आहे, म्हणून तुम्ही पाहायला या.

दुसऱ्या दिवशी मी त्या ट्रामा सेंटरला भेट द्यायला गेलो. डॉ. यादव स्वतः उपस्थित होते. त्यांनी मला हे पाच मजली हॉस्पिटल संपूर्ण फिरून कानाकोपऱ्यासह दाखवलं.

चाळीस कोटी रुपये जमऊन उभं केलेलं हे हॉस्पिटल जगातल्या अत्याधुनिक सुविधा पुरविणारं आहे. या सगळ्या निधीतला एकही पैसा सरकारी अनुदानातला नाही.

हा सगळा निधी डॉक्टर यादव यांनी देणग्या मामासाहेब जगदाळे यांनी सुरू केलेल्या मधून उभा केलेला आहे.

शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनीही त्याला सढळ हातानं मदत केलेली आहे. हे हॉस्पिटल पाहताना डॉक्टर यादव यांचा इथं गुंतलेला जीव दिसत होता. जणू ते त्यांच्या आयुष्यातलं एक स्वप्नच होतं.

मामासाहेब जगदाळे रुग्णालयाची जन्मकथा सांगताना डॉक्टर यादव म्हणाले, शेवटच्या काळात आजारी असताना जगदाळे मामांना मिरजेच्या मिशनरी हॉस्पिटलमध्ये भरती केलेले होतं.

तिथली सुविधा पाहून त्यांना असं वाटलं की आपल्या बार्शीतही असं एखादं हॉस्पिटल असावं, जिथं गोरगरिबांना कमी खर्चात उपचार मिळेल.

मिरजेच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांना त्यांनी विनंती केली की, तुमची एखादी शाखा माझ्या बार्शीत सुरू करा, आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू, जागा उपलब्ध करून देऊ, मनुष्यबळ देऊ.

तेव्हा ते मिशनरी म्हणाले, तुम्ही तुमचंच एखादं असं धर्मादाय हॉस्पिटल सुरू करा. तुम्हालाही ते करता येईल.

दुरुस्त होऊन बार्शीला आल्यावर जगदाळे मामांनी त्या मिशनरीजना बोलावून घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक साधा दवाखाना सुरू केला.

डॉक्टर यादव हे जगदाळे मामांचे विद्यार्थी. म्हणजे याच संस्थेत शिकलेले. सुरुवातीपासून त्यांनी मामांचा ध्येयवाद पाहिलेला. जगदाळे मामा डॉक्टर यादव यांच्या अंगात कणाकणाने मुरलेले आहेत.

त्यामुळे जगदाळे मामा गेल्यानंतर मामांनी उभ्या केलेल्या सर्वच संस्थांची जबाबदारी डॉक्टर यादव यांच्यावर येऊन पडली.

त्यामुळे ते शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते या दवाखान्याचे अध्यक्ष आहेत. मामांनी उभ्या केलेल्या सर्वच संस्थांचे ते प्रमुख आहेत.

अजून तरी त्यांनी मामांच्या संस्थांना कुठलाही डाग लागू दिलेला नाही. अतिशय निरपेक्ष भावनेने या सगळ्या संस्था यादव सर चालवतात. त्यातलं पावित्र्य टिकवतात

डॉक्टर यादव यांच्याशी बोलताना लक्षात आलं की बार्शीच्या भगवंत मंदिरापासून सुनील दत्त यांनी सुरू केलेल्या नर्गीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ कॅन्सरचा हॉस्पिटलपर्यंत मामा ट्रस्टी आहेत. बार्शीतल्या सर्वच सार्वजनिक न्यासावर मामा कुठं ना कुठंतरी आहेत.

त्यांच्याशिवाय बार्शीत सार्वजनिक कामाचं पान हालत नाही, असं माझ्या लक्षात आलं. खरं तर डॉक्टर यादव यांचं स्वतःचंही मोठं हॉस्पिटल आहे.

तिथंही सकाळी ते महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करीत असतात. त्यांचं वय सत्तरीच्या पुढे गेलेलं असावं. पण अजूनही ते वीस तास काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक बैठकीला उपस्थित राहतात.

मामांनी सुरू केलेला साधा दवाखाना डॉक्टर यादव यांनी ट्रामा सेंटरपर्यंत विकसित केलेला आहे. या ट्रामा सेंटरमध्ये कितीही गंभीर आजारी आला तरी त्याला तातडीने आधी रुजू करून इलाज सुरू केले जातात. पैसे आणलेत का ?

आधी पैसे भरा, मग इलाज सुरू केले जातील, असं इथं सांगितलं जात नाही. जर आजारी माणसाच्या नातेवाईकांकडं पैसे नसतील तरीही इलाज सुरू केला जातो. औषधही उधारीवर दिली जातात. शक्य असेल तेवढा पैसा घेऊन रोगावर पूर्ण इलाज केला जातो.

कुठल्या शासकीय योजनेत, महात्मा फुले आरोग्य योजनेत जर तो रोगी बसत असेल तर त्याचाही त्याला फायदा करून दिला जातो. पण कोणताही रोगी कुठल्याही कारणामुळे इलाजापासून वंचित राहणार नाही याची दक्षता डॉक्टर यादव आणि या ट्रामा सेंटरची टीम घेत असते.

आणखी विशेष म्हणजे या रुग्णालयात प्रत्येक मजल्यावर रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांसाठी सर्व सुविधायुक्त असा हॉल आहे.

या दवाखान्यातले सर्व विभाग किती अत्याधुनिक आहेत ते प्रत्येक विभागात नेऊन मला डॉक्टर यादव यांनी सांगितलं. लोक कसे मदत करतात, किती मदत करतात, आतापर्यंत किती मदत आलेली आहे आणि आणखी किती मदतीची गरज आहे, ते सगळं पोटतिडकीनं डॉक्टर यादव सांगत होते.

रात्री मी जे त्यांना म्हणालो की मी दवाखान्यात येऊन काय करू ? तेच डोक्यात ठेवून मी जर इथं यायचं टाळलं असतं तर आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या अनुभवाला मी मुकलो असतो.

डॉक्टर यादव यांच्यासारख्या एका देव माणसाच्या सहवासात मला इतका वेळ राहता आलं याचा मला खूप आनंद वाटला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात सत्कारणी लागलेला हा वेळ होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com