उत्तरं शोधणाऱ्या समूहाचा भाग बनूया

माझा मुलगा कामाला लागला हे महत्त्वाचं नाहीय, तो आज पैसा कमावतोय ह्याचंही मला कौतुक नाहीय, तर मला आनंद अन् अभिमान ह्याचा आहे, की तो ज्या गरीब परिस्थितीतून पुढे गेला त्या परिस्थितीला न विसरता गरजूंसाठी स्वतः काहीतरी करण्यासाठी पुढे सरसावला हे लाख मोलाचं आहे.
उत्तरं शोधणाऱ्या समूहाचा भाग बनूया
HappinessAgrowon

देवा झिंजाड

‘सहनशीलता वाढविण्याचे प्रयोग’ हा माझा लेख वाचून राज्यभरातून २२४ फोन आले. त्यातले काही जण आपापल्या अनुभवाची शिदोरी सांगताना मला म्हणाले, ‘आम्हीही ह्यातून गेलोय, पण तुम्ही मात्र ते शब्दात गुंफून आमच्या भावनांना वाचा फोडता! धन्यवाद !’

या सगळ्या प्रतिक्रियांपैकी सर्वांत महत्त्वाचा फोन होता तो सिन्नर तालुक्यातल्या एका व्यक्तीचा. ते कंठ दाटल्या स्वरातच माझ्याशी बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून लेख आवडला इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांच्या रडण्यामागचं खरं कारण मला समजेना. त्यांना कसंबसं शांत केलं अन् विचारलं ‘का रडताय दादा?’ तेव्हा त्यांनी स्फुंदतच छोटीशी आठवण सांगितली.

ते म्हणाले, ‘देवाजी, सात वर्षांपूर्वी माझ्या मुलाला मिल्ट्रीत भरतीला जायचे होते, पण घरच्या गरिबीमुळे त्याला बेळगावला जाण्यासाठीसुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. काही जणांकडे मागूनही ते मिळाले नाहीत. भरतीला जायचा दिवस तर जवळ आलेला अशा वेळी माझ्या बायकोनं तिच्या गळ्यातील उरलेले दोन मणी मोडून मुलाला पैसे दिले.’

मी सगळं ऐकत होतो व मनात म्हणत होतो ‘ह्यात काय विशेष?’ ‘कुठलीही आई हे मुलासाठी करतेच ना?’ पण ते पुढं म्हणाले, की ‘मुलगा भरतीला जाऊन आला. अथक मेहनत व परिश्रम ह्याचं फळ म्हणून त्याची सैन्यदलात निवडही झाली. आमच्या आनंदात भर पडली. गावातही मान वाढला. ट्रेनिंग संपून तो ड्यूटीवर रुजू झाला. काही महिन्यांनी जेव्हा तो सुट्टी घेऊन पहिल्यांदा गावी आला तेव्हा त्याने कुठल्याही नातेवाइकांकडे न जाता गावातल्याच गरीब व गरजू कुटुंबांमध्ये जाऊन शाळेत शिकणाऱ्या लेकरांना दप्तरं घेऊन दिली, कुणाला वर्षभरासाठी लागणारं शालेय साहित्य घेऊन दिलं, युनिफॉर्म घेऊन दिले.’

‘देवाजी, खरं सांगू का तुम्हाला, मला माझ्या बायकोच्या त्यागापेक्षा त्याची ही कृती फार अभिमानास्पद वाटली.’ त्यांना अजून जास्त गहिवरून आलं. माझेही डोळे पाणावले. फोन ठेवताना ते म्हणाले, ‘माझा मुलगा कामाला लागला हे महत्त्वाचं नाहीय, तो आज पैसा कमावतोय ह्याचंही मला कौतुक नाहीय, तर मला आनंद अन् अभिमान ह्याचा आहे, की तो ज्या गरीब परिस्थितीतून पुढे गेला त्या परिस्थितीला न विसरता गरजूंसाठी स्वतः काहीतरी करण्यासाठी पुढे सरसावला हे लाख मोलाचं आहे. मित्रहो, मला असं वाटतं, की केवळ व्यवस्थेला प्रश्‍न विचारत बसण्यापेक्षा आपण उत्तरं शोधणाऱ्या समूहाचा भाग बनूया. त्यातूनच खूप मोठं काम उभं राहिलं ह्यात शंका नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com