भटाचा माळ...

एखाद्या दिवशी ऊन खूप तावायचे आणि वारा पूर्ण थांबायचा. अंगाची लाही लाही व्हायची. आभाळ भरून गदगदायला व्हायचे आणि दुपारनंतर जोरात वाऱ्यासह पावसाचे मोठे मोठे थेंब नांगरलेल्या ढेकळात पडायला सुरुवात व्हायची. मातीचा मस्त वास सुटायचा. लगेच मोठे थेंब विजांसह कोसळायला लागत. खोपीत पाय दुमडून छातीशी गुडघे धरून बसून राहायचे. सोसाट्याचा वारा अन् उभा आडवा जोरदार वळीव तासभर झोडायचा. आभाळ मोकळे व्हायचे. लिंबाच्या, बाभळीच्या फांद्या तुटून पडायच्या. आंब्याखाली कच्च्या कैऱ्यांचा ढीग लागायचा. ताली पाण्याने भरून जायच्या. रानाकडेचे पाट गढूळ पाण्याने भरून वाहत पांदीकडे जायचे. वरच्या तुकड्यात बाभळीचे काटे आणि पिवळी फुले पसरायची. आणि स्वच्छ न्हावून माळ तरतरीत झाल्यासारखा दिसायचा.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

जयंत खाडे

आमच्या खाडे कुटुंबीयांच्या मालकीचा मोठा जमिनीचा डाग हा भटाचा माळ होता. गावापासून दक्षिणेला एक दीड मैलावर असलेला हा शेतीचा तुकडा आम्हा सर्व भावंडांसाठी आजच्या डिस्ने लॅण्डपेक्षा जास्त प्रिय होता. शाळेला सुट्टी पडली की सर्व भावंडे माळाची वाट धरीत.

माळाची खरेदी कथा तर खूपच विलक्षण होती. गावातील जोशी भटांना १९३८ च्या दरम्यान मोठी आर्थिक अडचण आली. त्यांनी माझ्या आजोबांना हा २५ एकर डाग खरेदी करण्याची गळ घातली. वास्तविक माझे आजोबा जोशी भटांच्या शेतात काम करायचे आणि इतके पैसे त्यांच्याकडे नव्हते. भटांनी टप्प्याटप्प्याने पैसे देण्याची सवलत दिली; पण इतरांना कळू न देण्याचीही सूचना केली.

आजोबांनी पोखरणीचे त्यांचे मित्र दाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधला. आजोबांनी आपल्या सोबत दाजी अप्पांना खरेदीसाठी तयार केले. खरेदीसाठी मामलेदार कचेरी गाठली. पैसे घेताना मामलेदारांनी दाजी अप्पांनी पैसे कुठून आणले, असा प्रश्‍न केला. दाजी अप्पा गडबडले. पैसे घरात बऱ्याच वर्षांपासून होते. आता काय सांगायचे असा प्रश्‍न पडला. वैतागलेल्या अप्पांचा आजोबांमुळे या प्रकरणात अडकलो, असा गैरसमज झाला. पण मग आजोबांनी यशस्वी शिष्टाई केली. अडचण अशी होती की पैसे खूप कालावधीपूर्वीचे असल्याने चलनातून रद्द झालेले होते. मामलेदारांनी पैसे बदलण्याची व्यवस्था केली व खरेदी पूर्ण झाली.

पूर्ण २५ एकरांत प्रत्येकी साडेबारा एकरची वाटणी झाली. वाटणी पण रुमालघडीप्रमाणे झाली. जसे वरच्या तुकड्यात दक्षिणेला आम्ही तर खालच्या तुकड्यात अप्पा. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठा व महार समाजाच्या व्यक्तींनी एकत्रित केलेली खरेदी पाहून मामलेदारसुद्धा स्तिमित झाले होते.

Indian Agriculture
Food security: अन्नसुरक्षेसाठी भारतीय शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची

माझ्या लहानपणीच्या बऱ्याच आठवणी माळाशी जोडलेल्या आहेत. शाळेला सुट्टी पडली की सगळी भावंडं माळाची वाट धरीत. माळाला दोन विहिरी होत्या; पण आमच्या लहानपणी त्यातलं पाणी खूपच कमी झालं होतं. त्यामुळे माळाला बारमाही पीक नसायचं. खरिपात हायब्रीड, भुईमूग, मूग, उडीद, चवळी तर रब्बीत गहू, हरभरा, शाळू असे. उन्हाळ्यात माळ पुरता बोडका होई. अगदी विहिरीजवळ मिरच्या, वांगी, गवारीचे एखादे तळकट माळव्यासाठी ठेवले जाई.

वरच्या बाजूने विहिरीच्या कडेला आमची वस्ती. त्यामध्ये एक खोली विटांचं कच्चं बांधकाम केलेली आणि एक मोठा गोठा काडाने शेकारलेला. विहिरीवर दाट बांबूची बेटं होते तर छपरापुढे चाफ्याचे, दोन कडूनिंब व दोन देशी लिंबाची झाडे होती. मधल्या तालीवर एक-दोन बाभळी तर खालच्या विहिरीवर एक मोठा पिंपळ, एक आंबा आणि उंबर. आंबा मोठा डेरेदार होता. त्याला दोन वर्षांतून एकदा फळं यायची. एवढे सोडले तर संपूर्ण माळ नावाप्रमाणे बोडका. एका बाजूला मात्र दाजी अप्पाच्या हिश्‍शात पांद होती व तेथे कडेला मोठ्या आंब्याची झाडे, सीताफळ, चिंच होत्या.

माळाला फक्त फिरणे हाच मोठा विरंगुळा होता. मुलं आंब्याच्या झाडावर कधीतरी सुरपारंब्या खेळायची तर कधी शेतीची मशागत सुरू असताना बैलाच्या नांगर, कुळवामागे फिरत. हिवाळ्यात विहिरीत पाणी असल्यास दुपारी पोहणे होई. मुली बऱ्याच वेळा शेतातील कामे करत, जनावरांच्या शेणाच्या गोवऱ्या करून थापीत आणि वेळ मिळाला की वरच्या खळ्यावर काचाकवड्या आणि इतर खेळ चाले. यातच दिवस मजेत जात असे. संध्याकाळी माळ सोडताना मोठी उदासी येई.

Indian Agriculture
Sesame: भारतीय बाजारात तिळाचे दर तेजीत राहण्याचा अंदाज

मला तर मोठे झाल्यावर रात्रंदिवस माळाला राहायचे, हे स्वप्न होते. मोठे चुलते, आण्णा व चुलत आजोबा, बापू वस्तीवर राहायचे. मला त्यांचा हेवा वाटे. मी दिवसभर, मला वस्तीला ठेवून घ्या म्हणून त्यांच्या मागे लागे. पण मग संध्याकाळी पुढच्या वेळी राहूया, या आश्‍वासनासह घरी जावे लागे. तरी भाऊंना सुट्टी असली की ते आवर्जून मला वस्तीला घेऊन राहत. मला त्या वेळी कोण आनंद होई! वस्तीवर रात्रीचे जेवण व मुक्काम हा विलक्षण अनुभव असे. पण असे प्रसंग अगदी क्वचित येत. एकदा उन्हाळ्यात खूप मोठा पाऊस झाला. वस्तीवरील खोलीत खूप पाणी गळायला लागले. अंथरूण-पांघरूण पूर्ण भिजले. मी आणि भाऊ आमच्या शेजारी असणाऱ्या माझ्या आत्याच्या मुलीच्या वस्तीवर गेलो. माझ्या मोठ्या आत्याची मुलगी भाऊंच्या वयाची आहे. तिने अशा स्थितीत आलेले पाहून मला जवळ घेतले व भाऊंना चांगलेच सुनावले. तिच्या मते आम्ही वस्तीवर योग्य व सुस्थितीत व्यवस्था करणे गरजेचे होते. तिचे अद्वातद्वा ग्रामीण भाषेत बोलणे ऐकून मला खूपच मजा वाटली. मग मी हे सर्व आजीला सांगायचे ठरवले. कारण मला खात्री होती की आजी तिच्या मुलांना असे बोललेले ऐकले की चिडेल व ती माळाला येणार नाही; पण माझ्या आत्याच्या गावातील घरी जाऊन तिला या बाबत जाब विचारेल. त्या रात्री मला गरम भाकरी, दूध, गूळ जेवणात मिळाले. त्याची चव आजही माझ्या स्मरणात आहे.

Indian Agriculture
भारतीय शेती बहरत आहे...

दहावी झाल्यानंतरच्या मोठ्या सुट्टीत मी पूर्ण काळ माळाला मुक्काम ठोकला. मी मोठा झालो असल्याने वस्तीला राहण्याबद्दल कोणाचा आक्षेप नव्हता. मी आणि माझा चुलत भाऊ वस्ती राहत असे. दिवसभर काही काम नसे. मग त्या बोडक्या रानात फिरणे, आंब्यावर चढून निवांत बाबा कदम, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव यांची पुस्तक वाचत बसणे, कधी दुपारी कैकाड्याच्या विहिरीवर पोहायला जाणे, पांदीमध्ये फिरून आंबे, चिंचा, सीताफळ शोधणे, मशागतीची कामे सुरू असताना बैल हाकणे, कुळवावर बसणे, जनावरांना चारा-पाणी करणे असा कार्यक्रम चाले.

सकाळचे जेवण घरून येई. संध्याकाळी गावाकडे जाऊन जेवण घेऊन यावे लागे. जेवण करून बैलगाडीत रात्री पथारी पसरून मस्त झोपी जात असे. वस्तीवर दोन बैलं, म्हशी, रेडी, एक भाकड गाय, कोंबड्या, शेळ्या, मांजर असा मुका लवाजमा सोबतीला असे. या गोतावळ्याच्या काही सवयी, लकबी, खोडी माझ्या लक्षात आल्या होत्या. कोंबडा एकाच पिलाला सारख्या टोच्या मारायचा. इतक्या की कोंबडीला हस्तक्षेप करावा लागे. पण मात्र मांजर जरा जरी कोंबडी अथवा पिलांकडे गेले की कोंबडा चवताळून आक्रमण करायचा. रात्री खुराड्यात यांना डालताना मांजर आवर्जून मदतीला यायचे आणि पिलांना पळू द्यायचे नाही. मग सगळ्यांना डालून टाकले की मांजर उगीचच शेपटी फुगवून त्यांच्या भोवती फिरत राही. जोडीतील एक बैल कोणाचेही उष्टे पाणी प्यायचा नाही. जरी दुसऱ्या जनावराने तोंड लावलेली बादली त्याच्या नजरेआड नेऊन परत त्याच्या समोर ठेवली तरी तो पाणी प्यायचा नाही. अगदी हट्टाला येऊन तोच प्रकार पुन्हा पुन्हा केल्यास तो तोंड घालून बादली सांडून देई. गायीचा एक पाय मोडला होता. त्यावर तात्या घरगुती उपचार करीत. तिचा पाय बांधला होता. त्यामुळे तिला सतत उभे राहावे लागे. अगदीच बसली तर ती तिचा दुखरा पाय एका दगडाच्या उंचवट्यावर ठेवी. यामुळे तिची जागा बदलता येत नसे. या सर्व गोतावळ्यात रात्री निवांत झोप होई.

माळाला काही गंमती घडत. काही वेळेला जनावरांना चरायला मोकळे सोडले जाई. आम्हाला एकेका जनावराची जबाबदारी असे. या जित्रापात रेडी मात्र खूप खट्याळ होती. तिला मोकळे सोडले की ती पुरती उधळायची. आमच्या मोठ्या बहिणीचे मात्र ती ऐकायची. अगदी थांब म्हणाले की थांबायची, बोलावले की तिच्याकडे जायची. मोठी माणसंसुद्धा तिला क्वचित मोकळं सोडायची. त्या दिवशी सगळं जित्रापं चरायला सोडलं होतं आणि रेडी फिरत विहिरीकडे गेली. सगळे ओरडायला लागले. माझ्या बहिणीने तिला हाक दिली पण ती वैतागून म्हणाली ‘जा पुढं आणि पड विहिरीत, मर एकदाची.’ क्षणात रेडीचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली.

विहिरीत एक फूटभर पाणी होते, पडलेली रेडी पाण्यात भीतीने धडपडत होती. आम्ही सर्व काठावर जमलो. विहिरीला बांधीव पायऱ्या नव्हत्या व उतरायची वाटी जेमतेम एका माणसाने अति सावरून चालण्यासारखी. मळ्यात आमची मोठी माणसं कोणच हजर नव्हते म्हणून आम्ही शेजारच्या वस्तीवरून माणसांना बोलवले. कारण प्रसंग अत्यंत अडचणीचा होता. ते अश्राप मुके जनावर वर पाहत होते. घाबरून भेलकांडत होते. बहिणीने खाली उतरून तिला समजावले व मग इतर दोघांनी दावे बांधून तिला वर काढायला सुरुवात केली; पण मध्यावर आल्यानंतर त्या निमुळत्या वाटेवर तिचा पाय घसरला आणि ती परत खाली पडली. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवानं माणसं कोणी पडली नाहीत, पण परत तिला काढायला कोणी तयार होईना. तरी माझ्या बहिणीने धीर सोडला नाही व ती खाली गेली. तिला पाहून पुन्हा माणसं उतरली आणि त्यांनी खुबीने तिला वर काढले.

एखाद्या दिवशी ऊन खूप तावायचे आणि वारा पूर्ण थांबायचा. अंगाची लाही लाही व्हायची. आभाळ भरून गदगदायला व्हायचे आणि दुपारनंतर जोरात वाऱ्यासह पावसाचे मोठे मोठे थेंब नांगरलेल्या ढेकळात पडायला सुरुवात व्हायची. मातीचा मस्त वास सुटायचा. लगेच मोठे थेंब विजांसह कोसळायला लागत. खोपीत पाय दुमडून छातीशी गुडघे धरून बसून राहायचे. सोसाट्याचा वारा अन् उभा आडवा जोरदार वळीव तासभर झोडायचा. आभाळ मोकळे व्हायचे. लिंबाच्या, बाभळीच्या फांद्या तुटून पडायच्या. आंब्याखाली कच्च्या कैऱ्यांचा ढीग लागायचा. ताली पाण्याने भरून जायच्या. रानाकडेचे पाट गढूळ पाण्याने भरून वाहत पांदीकडे जायचे. वरच्या तुकड्यात बाभळीचे काटे आणि पिवळी फुले पसरायची. आणि स्वच्छ न्हावून माळ तरतरीत झाल्यासारखा दिसायचा. हळूहळू दिवस उतरत जायचा आणि रात्री जोरात रातकिड्यांचा आवाज सुरू व्हायचा.

उन्हाळ्यात लग्नाचा हंगाम असतो. आसपासच्या खेड्यात लग्नाच्या समारंभानंतर रात्री वराती निघत. लेझीम, वाजंत्रीवाल्यांची मोठी जुगलबंदी रात्री गावभर फिरे. यामध्ये गाणाऱ्यांचा एक विशिष्ट आवाज असे आणि गाण्यांचा इको रानभर घुमायचा. अशा कित्येक झक्कास मैफिली मी माळाला निवांत झोपून ऐकल्या आहेत.

कधी आकाश शुभ्र चांदण्यानी भरून जायचे. एवढ्या मोठ्या महालातील ती रात्र हा अपूर्व भाग्ययोग असायचा. तो लाभलेला एकांत तुकारामांनी किती अचूक सांगून ठेवला आहे.

येणे सुखे रुचे एकांताचा वास ।

नाही गुणदोष अंगा येत ।

आकाश मंडप पृथिवी आसन ।

रमे तेथे मन क्रीडा करी । ।

कंथा कमंडलु देह उपचारा ।

जाणवितो वारा अवसरु ।।

तुका म्हणे होय मनाशी संवाद ।

आपुलाचि वाद आपणासी ।।

माळाचे दिवस दहावीनंतर संपुष्टात आले. मोठे झाल्यावर माळालाच वस्ती राहण्याचे स्वप्न विरून गेले. पुढे माळाला वस्ती काय साधा संपर्कसुद्धा तुटला. कधीतरी हळूच फेरी मारून येतो; पण आता माळाने कात टाकली आहे. पाणी आल्याने माळ बारमाही झालाय. इंच न इंच जागेवर पिके घेतली जात आहेत. ठिबक, ऑटो स्टार्टरद्वारे आधुनिक शेती केली जाते. आता वस्तीची गरज नाही. जो तो वेळेवर मोटारसायकलवरून येतो आणि परत फिरतो. असो. काही बदल होणे अपेक्षित आहे. नाहीतर केवळ भूतकाळाचा विचार करून कोण माळाला माळ म्हणून ठेवेल?

(लेखक सांगली जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत.) ९४२१२९९७७९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com