पाटी-पेन्सिल अन् दप्तर

शेतकरी (Farmer)व शेतमजुरांची (Farm worker) मुले महिनाभर आधीच नव्याने दप्तर आणि वह्या पुस्तके आणायचा तगादा आईवडिलांकडे लावत असत. आताच्या सारखी रंगीबेरंगी, आकर्षक दप्तरे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला नव्हते.
Blackboard-pencil
Blackboard-pencilAgrowon

शेखर गायकवाड

आपल्या दैनंदिन जीवनातील कित्येक गोष्टींमध्ये गेल्या १०० वर्षांत बराच बदल झाला आहे. शाळेतले दप्तरसुद्धा त्याला अपवाद नाही. मे महिन्याची सुट्टी संपली की मुलांना शाळेचे नव्या वर्गाचे, शिक्षकांचे आणि पुस्तकांचे वेध लागायचे. शेतकरी (Farmer)व शेतमजुरांची (Farm worker) मुले महिनाभर आधीच नव्याने दप्तर आणि वह्या पुस्तके आणायचा तगादा आईवडिलांकडे लावत असत. आताच्या सारखी रंगीबेरंगी, आकर्षक दप्तरे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला नव्हते.

नेहमीच्याच कापडी पिशवीत सर्व साहित्य एकत्र टाकले जाई. दुसरी आणि तिसरीपर्यंत फक्त पाटी, पेन्सिल व बसायचे बस्तर एवढेच दप्तरामध्ये असायचे. थोडे वरच्या वर्गात गेल्यावर पूर्ण वेळ शाळा भरायची. त्यामुळे जेवणाचा डबा दप्तरामध्ये आला. १९७५-८० पर्यंत डबा हा मुख्यतः स्टीलचाच असायचा. चपाती, भाकरीचा मलिदा, चटणी, लोणचे, दुमडलेली भाकरी, हे बहुसंख्य मुलांच्या डब्यामध्ये असायचे.

आतासारखे डब्यात दररोज वेगवेगळे खाऊ किंवा पदार्थ देण्याएवढा वेळ व साधने आईला उपलब्ध होत नव्हती. मला डब्यात हे देऊ नको, इतर मुले चिडवतात ही गोष्ट नक्की कधी सुरू झाली हे सांगता येत नाही. आता मुले आईला एक दिवस अगोदर मेनू सांगतात. ही गोष्ट अलीकडे १९९० पर्यंत अस्तित्वात नव्हती.

१९७० पर्यंत आठवड्यातून एक दिवस फडक्यात गुंडाळलेले शेण सुद्धा दप्तराबरोबर आणावे लागायचे. मास्तर वर्गातल्या ५ ते ६ मुलांना शेण आणायला सांगत आणि काही मुली वर्ग सारवायचे काम करत. शेण घेऊन गेले तरी शेण नेण्याबद्दल आई-वडिलांचा आक्षेप नसायचा. पण फडके किंवा पिशवी मात्र धुऊन आण, अशा सक्त सूचना असायच्या. वर्ग सारवून वाळेपर्यंत मुले मैदानावर खेळत असत. प्रत्येक मुला- मुलीकडे एक पाटी (Blackboard), एक पेन्सिल असायची.

बहुतेक मुलांच्या खाकी पँटवर पेन्सिलच्या रेघोट्या दिसायच्या. एकाच वेळी २-३ पेन्सिल असणारा मुलगा हा फार श्रीमंत घरचा आहे हे लक्षात यायचे. मुलींच्या दप्तरात हमखास फणी, बोरं, चिंचा आढळायच्या. अनेक कप्प्यांचे खाकी दप्तर ५ वी ६ वीच्या पुढे वाट्याला यायचे. नदीतून पोहून जाताना दोन्ही हातांनी दप्तर डोक्यावर ठेवून ओढे किंवा नदी ओलांडायची कसरत चालायची.

त्या वेळी आणि आजही जर कोणत्या गोष्टीत साम्य दिसत असेल, तर ते म्हणजे घरी आल्या आल्या मुले दप्तर अक्षरशः फेकून द्यायचे आणि मुली मात्र हळुवारपणे ठरावीक नेमून दिलेल्या जागेवर दप्तर ठेवायच्या. मोठ्या दादाला किंवा ताईला ५ वीनंतर स्वतंत्र कपाट मिळायचे आणि कधी एकदा आपण मोठे होतो आणि आपल्याला स्वतंत्रपणे कपाटामध्ये दप्तर लावायला मिळेल यासाठी चढाओढ चालायची. ज्यांची आई थोडी शिकलेली आहे व तिच्याकडे थोडी कलाकुसर असेल तर ती दप्तराची पिशवी हाताने विणून द्यायची व त्याच्यावर त्या मुलाचे नाव लिहायची.

शालेय पुस्तके घेता घेताच आईवडिलांच्या नाकीनऊ यायचे. त्यामुळे अवांतर वाचनासाठी एकही पुस्तक विद्यार्थ्यांकडे नसायचे. वर्गातच आठवड्यातून एकदा शाळेच्या ग्रंथालयातून मुलांना वाचण्यासाठी वर्गात पुस्तके देण्याची पद्धत होती. कित्येक शिक्षक मुलांना गोडी लावण्यासाठी चांगल्या पुस्तकातील परिच्छेद मोठमोठ्याने वाचायला सांगत. दुसरीनंतर कागदावर बोरूने लिहायला सुरुवात व्हायची. तिसरीपर्यंत फक्त पाटी-पेन्सिल होती.

५ वीनंतर दप्तरामध्ये पेन आणि कंपास आले. बोरूसाठीची बांबूची काडी विकत मिळायची. बोरू बुडवण्याची शाई ही पावडरच्या स्वरूपात १०-२० पैशाला मिळायची. दौतीमध्ये पाणी टाकून ही शाई बनवावी लागायची. एकदा बोरू बुडवून लिहायला घेतला की दोन-तीन अक्षरे घट्ट शाईमध्ये यायची आणि हळूहळू अक्षरे फिकट होत जायचे. त्यामुळे वही मधल्या ओळी ह्या गडद आणि फिक्कट अशा अक्षरांनी सजलेल्या दिसायच्या. अनेक महिने बोरूने घोटून अक्षर काढल्यामुळे बहुसंख्य मुलांचे अक्षर चांगले असायचे. चांगले अक्षर असलेल्या मुलांना शिक्षक फळ्यावर सुविचार लिहायला सांगत.

Blackboard-pencil
Wheat Export Ban :निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना नाही: तोमर

जशी मुलांना वस्तूची कमतरता असायची तशीच शाळेमध्ये सुद्धा साहित्याची कमतरता असायची. कधीतरी मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक आले, की रंगीत खडूने फक्त फळा सजायचा. त्या रंगीत खडूचा पडलेला तुकडा घेण्यासाठी मुले एकमेकाला ढकलाढकली करायची. ७००-८०० मुलांच्या शाळेमध्ये एकाच कपाटात खेळण्याचे साहित्य भरलेले असायचे.

बहुतेक खेळसुद्धा साधनांचा वापर न करता खेळले जात. उदा. कबड्डी, हुतुतु, शिवनपाणी. विशेष प्रसंगी व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल बघायला मिळायचा. तो सुद्धा हवा गेल्यावर कपाटात जाऊन बसायचा. वर्षातून एकदा देवीची लस टोचण्याचा कार्यक्रम व्हायचा. मास्तरांचा मार खाल्ल्यानंतर किंवा लस घेतल्यानंतर रडणारी काही मुले असत आणि त्याला चिडवणारी असंख्य मुले असत. त्या वेळी रडणारा मुलगा कोणाला फारसा आवडायचा नाही.

Blackboard-pencil
Compensation : झारखंडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

कदाचित हेच त्यांच्या जीवनाचे सार म्हणून मागच्या काही पिढ्यांमध्ये निर्माण झाले असावेत. कितीही संकट आली तरी त्याला सामोरे जाण्याचे बाळकडू मागच्या पिढ्या यामधूनच शिकल्या असाव्यात असे वाटत राहते. आताची रंगीबेरंगी आधुनिक दप्तरे, कंपासपेटी, नॅपकीन, पेन्सिल बॉक्स, क्रेयॉन्स, हायलायटर पेन, ओळखपत्र, शूज, टिफीन, युनिफॉर्म, पिनाफॉक, टाय, पुस्तके आदी पाहिले की आपण काही वर्षे अगोदर जन्माला आलो याची खंत वाटल्याशिवाय राहत नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com