बुमरँग...!

पृथ्वीवासीयांनी तयार केलेला कचरा त्यांनाच साफ करावा लागणार आहे. वनस्पतींचा कचरा प्राणी, प्राण्यांचा कचरा कीटक आणि इतर जीवांनी साफ करून या ग्रहाला स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. झाडं, पशुपक्षी, किडे आणि सूक्ष्मजीव प्रामाणिकपणे आपलं काम करताहेत. माणसासारखी आपली जबाबदारी ते झटकत नाहीत.
बुमरँग...!
EnvironmentAgrowon

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सायकलवरच्या प्रभातफेरीला निघालो. आज रविवार असल्याने जरा लांबचा पल्ला गाठणार होतो. मावळातल्या खेड्यापाड्यातून सकाळी सकाळी सायकल चालवायचा आनंद काही वेगळाच. मंदिराच्या घंटानादाशी जुगलबंदी करणारा बैलांच्या गळ्यातला घंटेचा आवाज. थंड हवेवर पसरलेला गोठ्यातील गोमुत्राचा गंध. अंगणात पहाटेची झाडलोट सुरू होती. एवढ्यात, अशा सुरेल सकाळी (बे)सूर कानावर पडले. समोरच्या गल्लीत दोन बायका हे (बे)सूर आलापत होत्या. एवढ्या सकाळी भांडण? अशा रामप्रहरी या बायांना भांडणासाठी कोणता वैश्‍विक मुद्दा मिळाला असेल? या कुतूहलाने कडेला थांबून भांडणानंद घेऊ लागलो. दोन्ही शेजारणी होत्या. हातात झाडू घेऊन त्या कडाकडा भांडत होत्या. एकीने अंगण झाडताना तिचा कचरा दुसरीच्या अंगणात ढकलला होता. मग दुसरीने हळूच तो वानोळा तिच्याकडे साभार परतवला होता. तुझा कचरा माझ्या अंगणात का टाकला? यावरून हे भांडण पेटले होते. बायांनो, कचऱ्यावरून तुम्हीच काय पण मोठमोठाले देशदेखील भांडताहेत असं मनातल्या मनात म्हणत विचार आणि सायकल दोघांच्या चाकाला गती दिली.

खरंच, आपला कचरा दुसऱ्याच्या अंगणात टाकायची खोड जागोजागी दिसते. बऱ्याच ठिकाणी घरं चकाचक असतात आणि अंगणात मात्र कचऱ्याचा ढीग साठलेला असतो. एवढंच काय, पण बस, रेल्वेच्या खिडकीतून पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक कागद, फळांच्या साली फेकणारे फेकू सर्रास दिसतात. ही झाली पहिली पातळी. पुढच्या पातळीवर वातावरणात फेकले जाणारे धुराचे लोट, शेतीतील रसायनांचा मारा, घराघरांतून निघणारे, नद्यानाले आणि समुद्र प्रदूषित करणारे साबणी सांडपाण्याचे लोट. म्हणजे आपल्या घराबाहेर कचरा टाकला, की प्रॉब्लेम संपला असं त्यांना वाटतं. पण मग हा कचरा साफ तरी कोणी करायचा? आणि तो खरंच साफ केला जातो का?

निसर्ग ही समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना करत असेल? निसर्गाने प्रत्येक जिवाचा पाय एकदुसऱ्याशी बांधून या ग्रहावर पाठवलंय. हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांसह पंचमहाभूतीय तत्त्वांना एकत्र बांधून वनस्पती अन्न तयार करतात. मग शाकाहारी, मांसाहारी जिवांच्या मार्गे हे अन्न सूक्ष्मजीवांपर्यंत पोहोचतं. वनस्पतींनी बांधलेली अन्नद्र्यव्यांची माळ सूक्ष्मजीव सोडवतात आणि त्यांना परत वातावरणात मुक्त करतात. एका जिवाने जसं दुसऱ्या जिवाच्या अन्नाची जबाबदारी घेतलीय, तशीच त्याच्या कचरानिर्मूलनाची देखील घेतलीय. अन्नसाखळीच्या पहिल्या स्तरावर, झाडाच्या पालापाचोळ्याला प्राणी, पक्षी, किडे आणि सूक्ष्मजीव अन्न म्हणून संपवतात. आपली घरं बांधण्याबरोबर दैनंदिन कामासाठी त्याचा उपयोग करतात.

वनस्पतीच्या कचऱ्याची विल्हेवाट तर लागली पण प्राणी, किडे आणि इतर जिवांचं काय? या शाकाहारी आणि मांसाहारी जिवांनी तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट वनस्पती, किडे, पक्षी, जलचर आणि सूक्ष्मजीव लावतात. माणसाने फेकलेल्या किचनमधल्या कचऱ्यापासून ते मानवी विष्ठेपर्यंत प्रत्येक गोष्टीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी निसर्गातील घटक घेतात.

निसर्गाच्या योजनेनुसार या ग्रहावर तयार होणारा कचरा येथील रहिवाशी आपल्या शरीरात सामावून घेतात. त्यातील प्रदूषण गाळून घेऊन उरलेला माल अन्नसाखळीतील पुढच्या मेम्बरकडे सफाईसाठी पाठवला जातो. शेतातील भाजीपाल्यावर लवकर विघटित न होणारं, चुकीचं कीटकनाशक फवारलं असेल, तर त्याचे अंश पिकांमध्ये साठून राहतात. सफाईच्या नादात त्या रसायनाला आपल्या शरीराच्या चाळणीत अडकवून ठेवतात. मग हा भाजीपाला माणसाच्या जेवणात येतो. आपलं शरीर त्यातील बरीचशी रसायने गाळून उरलेला रसायन विरहित किंवा कमी रसायन असलेला भाग विष्ठेवाटे बाहेर टाकते. या विष्ठेवर वनस्पती आणि किडे प्रक्रिया करून साफसाईच्या कामाला हातभार लावतात. सर्वांत शेवटी सूक्ष्मजीव त्या पदार्थातील घटकांना वेगळे करून त्यांच्या मूळ स्वरूपात मुक्त करतात. झाडांनी बांधलेले पंचमहाभूतं सूक्ष्मजीव मोकळे करतात आणि निसर्गचक्राचे आवर्तन पूर्ण होते.

निसर्गाची ही वैश्‍विक कचरानिर्मूलन योजना तोपर्यंत सुरळीत सुरू होती जोपर्यंत अन्न बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून निसर्गात उपलब्ध गोष्टींचा उपयोग व्हायचा. पण मेंदूबरोबर मानवाची दादागिरी वाढली आणि निसर्गात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची निर्मिती त्याने करायला सुरुवात केली. पृथ्वीच्या पोटात खोलवर दडलेल्या बाटलीबंद पेट्रोलियम पदार्थाच्या सैतानाला बाहेर काढून त्यापासून हजारो वेगवेगळी रसायनं बनवली गेली. त्यांचा वापर दैनंदिन जीवनात होऊ लागला. प्लॅस्टिक हे पेट्रोलियम पदार्थांचाच एक भाऊबंद. नवरासायने बनवली, पण त्यांची विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेविणा. आता गोची ही झाली, की निसर्गनिर्मित कच्च्या मालापासून बनलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावायची यंत्रणा जिवांकडे होती. पण निसर्गात अस्तित्वात नसलेले हे पदार्थ कसे विघटित करायचे याची तोड मात्र त्यांच्याकडे नव्हती. सध्या वातावरणात पसरलेल्या रसायनांच्या विल्हेवाटीसाठी प्रत्येक जीव झटतोय. त्याच्या शरीरात या रसायनांची मात्र वाढतेय. हे रासायनिक भूत कसे उतरवावे हे माहीत नसल्याने त्यांच्या शरीरातील संस्था गोंधळली आहे. त्यामुळे कॅन्सर, मधुमेहासारख्या रोगांचा विळखा पडतो आहे.

वायुप्रदूषणाचीही तीच कथा. हवा शुद्ध करायचे कामही सर्व जीव करतात. पक्षी, प्राणी, किडे, सूक्ष्मजीव यासारखा प्रत्येक जण वातावरणातील हवा आपल्या शरीरात शोषून घेतो आणि परत बाहेर टाकतो. माणसाला निसर्गाने हवा साफ करण्यासाठी फुफ्फुसं दिलीयेत. प्रदूषित हवा आपण आपल्या फुफ्फुसात भरून घेतो आणि ऑक्सिजन बरोबरच त्यातील धूर, धूळ आणि रसायनं देखील फुफ्फुसात शोषून घेऊन स्वच्छ हवा बाहेर टाकतो. फॅक्टरीतला, कचरा जाळतानाचा, गाडीच्या धूरकांडातून सोडलेला आणि लग्नात उडवलेल्या फटाक्यांच्या बारांबरोबर हवेत सोडलेला धूर, धूळ, वायू फुफ्फुसाच्या गाळणीने आपल्याला गाळावा लागतो. फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे.

जसं प्राण्यांचं तसंच जलचरांचंदेखील आहे. पाणी हीच त्यांची हवा. पाण्यातून ऑक्सिजन गाळून घेताना त्यातील रसायनेदेखील गाळले जातात. ही रसायने त्यांच्या शरीरात साठवली जातात. अन्नसाखळीच्या उतरंडीत मासा हा सर्वांत जास्त संवेदनक्षम आहे. पाण्यातील प्रदूषके शोषून घेत त्यांचे जलजीवनमान सुरू असते. आजमितीला जड धातू आणि रसायने मोठ्या प्रमाणात माश्यांमध्ये आढळतात. हेच मासे आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये येऊन रसायनशुद्धीसाठी आपल्या शरीराच्या चाळणीतून जातात.

माणसापुरतं बोलायचं झाल्यास आपण जमिनीत, पाण्यात टाकलेला जैविक, रासायनिक कचरा आपल्या अन्नामार्गे आपल्याला शरीरात जाणार आहे. आपलं फुप्फुस, लिव्हर, चरबी आणि शरीराच्या इतर भागांमध्ये तो साठवला जाईल. निसर्गाने नेमून दिलेलं सफाईकाम आपण करणार आहोत.

याचा अर्थ, पृथ्वीवासीयांनी तयार केलेला कचरा त्यांनाच साफ करावा लागणार आहे. वनस्पतींचा कचरा प्राणी, प्राण्यांचा कचरा कीटक आणि इतर जिवांनी साफ करून या ग्रहाला स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. झाडं, पशुपक्षी, किडे आणि सूक्ष्मजीव प्रामाणिकपणे आपलं काम करताहेत. माणसासारखी आपली जबाबदारी ते झटकत नाहीत. आज भल्या पहाटे आपलं अंगण साफ करण्याच्या प्रयत्नात, आपला कचरा दुसरीच्या अंगणात ढकलणाऱ्या बाईला काय माहित की ती हा कचरा कुठेही ढकलू शकत नाही. तिचा हा कचरा एक दिवस तिच्याकडे परत येणार आहे. आपण केलेलं कचराकर्म आपल्याला याच जन्मात भोगायचं आहे. आपण वातावरणात फेकलेली प्रत्येक गोष्ट बुमरँगसारखी आपल्याकडे परत येणार आहे. जर फेकलेली गोष्ट परत येणार असेल तर मग चांगली गोष्ट फेकूयात. मग होऊन जाऊदे चांगलं बुमरँग !

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com