त्रिपुरातील शेतीला ‘एसआरआय’ पद्धतीचे वरदान

केवळ वातावरण बदलासंदर्भात अहवाल तयार केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीवरही प्रचंड दिले पाहिजे. हेच त्रिपुराच्या उदाहरणावरून दिसून येते. त्रिपुराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला भात लागवडीच्या ‘एसआरआय’ पद्धतीचे वरदान मिळाल्याने अन्नसुरक्षेच्या दिशेने पावले पडू लागली आहे.
SIR Method
SIR MethodAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

२१ व्या शतकाच्या आरंभीच जागतिक पातळीवर वातावरण बदलाची ओळख झाली. २००८ मध्ये भारतीय केंद्र सरकारने सर्व संलग्न राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भौगोलिक परिस्थितीनुरूप वातावरण बदलाच्या पुढील दहा वर्षांत होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यास सुचवले. हा अहवाल राज्य शासनाने एखाद्या संशोधन संस्थेच्या सहकार्याने करणे अनिवार्य होते. यामध्ये आयआयटी, भारतीय विज्ञान संस्था, टेरी आणि काही पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विदेशी संस्थाचाही समावेश होता. सर्वच राज्यांनी त्यांचा अहवाल २०१० पर्यंत सादर केला. त्यातील विविध सूचनांवर कामाला सुरवातही केली. त्रिपुरानेही वातावरण बदलाचा २०१२ ते २०१७ या वर्षासाठीचा सविस्तर अहवाल जर्मन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन या विदेशी संस्थेच्या मदत तयार केला होता.

या अहवालातील ठळक पाच बाबीः

१. त्रिपुरामध्ये घनदाट जंगल असूनही, पाऊस हवा तेवढा पडत नाही.

२. डोंगर, पर्वतराजीमधून मोठ्या प्रमाणावर सुपीक माती वाहून नदीत मिसळली जात आहे.

३. उत्तर त्रिपुरामध्ये यापुढे दुष्काळ वाढणार आहे.

४. शेतकऱ्यांचे भात पिकांचे उत्पादन यापुढे कमी होणार आहे.

५. राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे.

त्यावर अहवालात अशा उपाययोजना सुचविल्या आहेत.

१. त्रिपुरामधील आदिवासींची जूम किंवा शिफ्टिंग कल्टिव्हेशन (जंगलाचे भाग जाळून त्यावर शेती करण्याची) पद्धती त्वरित बंद करावी.

२. डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणावर चर खोदावेत. ‘जूम’ पद्धतीमुळे उजाड जंगले पुन्हा हरित करावी.

३. उत्तर त्रिपुरामध्ये रब्बी आणि उन्हाळी भातासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे.

४. राखीव जंगलामधून कापले जाणारे वृक्ष आणि नदीमार्गे बांगलादेशात होणारी तस्करी त्वरित थांबवावी.

SIR Method
साखर उत्पादनात ओलांडला ३५० लाख टनांचा टप्पा

त्रिपुरा शासनाने हा अहवाल स्वीकारून त्यावर त्वरित अंमलबजावणीस सुरुवात केली.पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे आदिवासींच्या ‘जूम’ शेतीवर मर्यादा आणल्या गेल्या. परिणामी, या जमाती आणखी घनदाट जंगलात स्थलांतरित झाल्या. तिथे वन्यप्राण्यांसोबत संघर्ष सुरू झाला. मात्र त्रिपुरामधील वृक्षांची तोडणी करून वाहत्या वाहत्या नदीमार्गे बांगलादेशात पाठवले जाणे फारसे रोखता आले नाही. राखीव जंगलाचा ऱ्हास होत राहणे, हे त्रिपुरावरील वातावरण बदलाच्या संकटाला आमंत्रणच देणारे ठरत आहे. त्रिपुराच्या सीमेवरील बांगलादेशातही वातावरण बदलाचे संकट अधोरेखित झाले आहे. सातत्याने येणारे महापूर, चक्रीवादळे, समुद्राची वाढलेली पातळी यासोबत स्थानिकांचे स्थलांतर या समस्या दिसतात. याचा परिणाम त्रिपुरावर होत आहे.

मुख्य पीक असूनही तांदूळ आयातीची वेळ

भात हे त्रिपुरामधील मुख्य पीक असून, वर्षात तीन वेळा घेतले जाते. मॉन्सूनवर आधारित भाताचे उत्पादन चांगले असले तरी रब्बी आणि उन्हाळी भाताची स्थिती पाण्याअभावी बिकट राहते. उत्तम त्रिपुरामधील लोकसंख्येमध्ये आदिवासींचे प्रमाण अधिक असून, हा भाग कायम दुष्काळी आहे. आधीच अर्धपोटी असलेल्या या बागांमध्ये नक्षलवाद्यांनी ठाण मांडलेले आहे. अहवालानुसार, वातावरणातील बदलामुळे या भागात भविष्यात अन्न सुरक्षेचे संकट वाढू शकते. येथील नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अगदी लष्करी बंदोबस्तात राजधानी आगरतळापासून अन्नधान्याचे ट्रक इकडे न्यावे लागतात, यावरूनच शेती आणि एकूण लुटालुटीच्या वातावरणाची जाणीव होते.

येथील शेतीची स्थिती आणि उत्पादन सुधारण्यासाठी भात लागवडीचे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याशिवाय पर्यायच नाही. त्रिपुरामध्ये अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर तिन्ही हंगामातही भात उत्पादन घेतले जात असूनही तांदूळ अन्य राज्यातून आयात करावा लागतो. राज्यात अल्पभूधारकांचे प्रमाण जास्त असून, पारंपरिक पद्धतीने भात घेतात. त्यांना खते, यांत्रिकीकरण परवडत नाही. शेतातून येणारे उत्पादन त्यांच्या कुटुंबालाही अनेक वेळा पुरत नाही.

भात उत्पादन वाढविण्यासाठी राज्यापुढे तीन पर्याय होते.

१. संकरित बियाणे वापरणे ः यासाठी खर्च जास्त, जमिनीचा पोतही खराब होण्याचा धोका.

२. ऊती संवर्धनाद्वारे तयार केलेली रोपे वापरणे ः ही पद्धतीही अधिक खर्चिक.

३. ‘एसआरआय’ पद्धती ः यामुळे उत्पादन वाढते, तुलनेने कमी पाण्यातही पीक घेता येते.

या राज्याने आता ‘एसआरआय’ पद्धतीचा स्वीकार केला आहे. डब्लुडब्लूएफ (WWF) या संस्थेने त्रिपुरा राज्यामध्ये एसआरआय पद्धती कशा प्रकारे यशस्वीपणे राबवली, याबाबतचा अभ्यास व यशकथा प्रकाशित केली आहे. More Rice, Less Water, Small State, Big Result या नावाने प्रकाशित यशकथेमध्ये वातावरण बदलामध्येही स्थानिक गरीब शेतकरी कशा प्रकारे अन्न सुरक्षा मिळवू शकतात, याची माहिती दिली आहे.

एसआरआय पद्धतीतून यशाकडे...

System of Rice Intensification ची आद्याक्षरे म्हणजेच एसआरआय पद्धत. १९८० मध्ये मादागास्करमध्ये प्रथम वापरली गेलेली ही पद्धती आज जगामधील १०० राष्ट्रांमध्ये वापरली जाते. या पद्धतीमुळे हेक्टरी ७ ते ८ टन भाताचे उत्पादन मिळते. अमेरिकेतील कॉर्नेल कृषी विद्यापीठातील प्रो. नॉर्मन अपहॉफ (Norman Uphoff) यांनी एसआरआय पद्धती बांगलादेशात रुजवली. बांगलादेश भात उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्रिपुरामधील कृषी विभागाने त्यांचे मार्गदर्शन घेऊन ही पद्धतींचे शासकीय शेतजमिनींमध्ये प्रयोग केले. ते शेतकऱ्यांना दाखवल्याने सकारात्मक परिणाम झाला. तसेच बांगलादेशातून स्थलांतरित झालेल्या मजुरांकडूनही या पद्धतीच्या प्रसाराला बळ मिळाले. एखादी यशकथा कशी फुलत जाते, हे जाणून घ्यायचे असल्यास हे उदाहरण महत्त्वाचे आहे. शासनाच्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर २००१ मध्ये फक्त एक शेतकरी तयार झाला. त्याला मिळालेले यश पाहून २००२ मध्ये २२ शेतकरी पुढे आले. आज वीस वर्षांनंतर ही संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे.

SIR Method
जागतिक व्यापार संघटनेची १२ वी परिषद आजपासून

पूर्व नौगाव जिल्ह्यामधील दूधपाटील (ता. जिरानिया) येथील ४४ शेतकरी शेतकऱ्यांनी भाताचे शताब्दी हे वाण एसआरआय पद्धतीने लावले. भाताच्या वाढीला भरपूर जागा, अधिक फुटवे, अधिक लोंब्या, पूर्ण भरलेल्या लांब लोंब्या मिळतात. पारंपरिक पद्धतीने जेमतेम अडीच टन हेक्टरी उत्पादन देणारे भाताचे वाण या आधुनिक पद्धतीत साडेसात ते आठ टन उत्पादन देते. दोन हेक्टरवर भात घेणाऱ्या करनजीत चौधरी या शेतकऱ्याने हेक्टरी साडेसात टन उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आपण कधी शिकणार?

आपला कोकण पूर्णपणे भात शेतीवर अवलंबून आहे. समुद्र किनाऱ्यालगत असल्याने वातावरण बदलाच्या प्रभावाखालील येथील लाखो शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने भात शेती करतात. अनेक चुकीच्या पद्धती तशाच रेटून वापरल्या जात आहे. त्यात राब भाजणे, एका जागी चार पाच रोपे लावणे, दाट लागवड यांचा समावेश आहे. राब भाजणे ही पद्धत पूर्ण निसर्गविरोधी आहे. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे नुकसान करण्यासोबतच कर्ब उत्सर्जनाचा धोकाही वाढतो. पर्यावरणासाठी निश्‍चितच घातक अशा पद्धती आपण सोडल्याच पाहिजेत. नव्या सुधारित पद्धतींचा स्वीकार केल्याने भाताचे उत्पादनही वाढू शकते, हेच त्रिपुराची यशकथा आपणास समजावत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com