
Chhatrapati Sambhajinagar : गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचला जावा या हेतूने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
पात्र लाभार्थींना थेट लाभ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय (Collector Astikkumar Pandey) यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियानांतर्गत ‘शासकीय योजनांची जत्रा’ व ‘बळिराजा सर्वेक्षण’ कार्यक्रमाबाबत आयोजित बैठकीत श्री पांडेय बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदी उपस्थित होते.
शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यत शासन योजनांचा लाभ पोहचला पाहिजे. प्रत्येक गावनिहाय, तालुकानिहाय, नियोजन आराखडा तयार करावा लागणार आहे. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनांचा आराखडा तयार करावा.
वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून दिला जाणार आहे. १५ मे रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. शासकीय योजनांची जत्रा हे अभियान मिशन मोडवर राबविले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय यांनी सांगितले.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाची रूपरेषा, जबाबदारी, लक्ष्य, कार्यक्रम व टप्पे याबाबत त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
शासकीय योजनांचे सुलभीकरण अभियान राबविताना जलद, कमी कागदपत्रे विचारात घेतले जाणार असल्याचे सांगितले. सर्व कार्यक्रमांची रूपरेषा, अंमलबजावणी, नियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष असणार आहे.
विभागीय पातळीवर विभागीय जनकल्याण कक्ष, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावरही जनकल्याण कक्षांची स्थापना करून याद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे. यावेळी कृषी, ग्रामविकास, महसूल विभागांसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी दूरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.